नवी दिल्ली (वृत्तसंस्था): दिल्लीच्या जुन्या राजिंदर नगरमधील कोचिंग सेंटरच्या तळघरात पुरामुळे नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या तिघांच्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्वतःहून दखल घेतली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. दिल्लीतील कोचिंग सेंटर्स डेथ चेंबर्स बनली आहेत, असे निरीक्षणही यावेळी खंडपीठाने नोंदवले.
खंडपीठाने नमूद केले की, दिल्लीतील कोचिंग सेंटर्स हे सुरक्षिततेच्या नियमांचे आणि जीवनासाठी मूलभूत मानकांचे पूर्णपणे पालन करत नाहीत तोपर्यंत ते ऑनलाइन काम करू शकतात. या संस्था देशाच्या विविध भागांतून आलेल्या इच्छुकांचा जीव धोक्यात घालत आहेत.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रासह दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगरपालिकेला सध्या अस्तित्वात असलेल्या सुरक्षेच्या नियमांचे तपशीलवार उत्तरे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. खंडपीठाने कोचिंग सेंटर्समधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीच्या जुन्या राजिंदर नगरमधील कोचिंग सेंटरच्या तळघरात पुराचे पाणी घुसल्याने उत्तर प्रदेशातील श्रेया यादव (२५), बिहारमधील तान्या सोनी (२५) आणि केरळमधील नेविन डेल्विन (२४) यांचा बुडून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, विविध कोचिंग संस्थांमधील विद्यार्थ्यांनी वाढीव सुरक्षा उपायांची मागणी करत निदर्शने सुरु आहेत. दरम्यान, तीस हजारी न्यायालयाने जुन्या राजेंद्र नगर येथील तळघराच्या सहमालकांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.