क्राइम – अॅड. रिया करंजकर
मालमत्ता असलेली चांगली आणि नसलेली चांगली. हीच मालमत्ता अनेकांना नातेसंबंधामधला खरेपणा दाखवून देते. मालमत्ता कमवणारे बाजूलाच राहतात आणि त्याच्यावर भलतेच लोक आपला अधिकार गाजवतात.
पुष्पक ही सोसायटी अशाच एका मालमत्तेमुळे अडचणीत आली होती. नेमका काय निर्णय घ्यायचा या सोसायटीतील सभासदांना, अध्यक्षांना समजत नव्हतं. अस्मिता भालेराव आणि दोन मुली पुष्पक सोसायटीमध्ये राहत होत्या; परंतु गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी आपल्या घराचे मेंटेनन्स थकवलेले होते. सोसायटीने अनेक नोटिसा त्यांना पाठवलेल्या होत्या तरी त्या नोटिसांना त्या दाद देत नव्हत्या. त्यांचे पती अरविंद यांनाही याबाबत सांगितले होते. अरविंद हा तिच्यासोबत राहत नव्हता; परंतु ते घर अरविंद भालेराव यांच्या नावावर होते. सोसायटी जे काही लेटर पाठवत होती तर ती महिला ते लेटर फाडून देत असे. म्हणून सोसायटीने त्यांची तक्रार रजिस्टर केलेली होती. ती सोसायटीला पत्र देत असे की माझा आणि माझ्या नवऱ्याचे कोर्टामध्ये डीव्ही मॅटर चालू आहे आणि त्या मॅटरमध्ये मला फक्त ४००० मेंटेनन्स मिळतो. त्या मेंटेनन्समध्ये मी माझ्या घराचे मेंटेनन्स देऊ शकत नाही. माझा पती जर एक घर विकत असेल तर त्याला एनओसी देऊ नका अशी अनेक पत्रे तिने सोसायटीला दिली होती. पण प्रश्न असा होता की, अस्मिता भालेराव ही अरविंद भालेरावची दुसरी पत्नी होती. कारण पहिल्या पत्नीने आत्महत्या केली होती. अरविंद भालेराव यांच्या पहिल्या पत्नीचे दोन मुलगे होते. अरविंद भालेराव याच्या नावावरती घर होते आणि त्या घराला नॉमिनी त्याच्या पहिल्या पत्नीचे दोन मुलगे होते. अस्मिता भालेराव हीचा कुठेही उल्लेख त्या सोसायटीच्या फाईलमध्ये नव्हता. ती खरोखरच पत्नी आहे की नाही हेही सोसायटीतल्या लोकांना माहीत नव्हते. कारण तिने सोसायटीला आजपर्यंत अरविंद भालेराव हा आपला नवरा आहे असा कोणताही पुरावा सादर केला नव्हता. फक्त तो माझा नवरा आहे एवढेच ती म्हणायची. तिचेही अरविंद भालेराव याच्याशी लग्न होण्याच्या अगोदर एका वेगळ्या पुरुषाशी लग्न झाले होते आणि मोठी मुलगी ही पहिल्या पतीची मुलगी होती. दुसरी मुलगी ही अरविंदची मुलगी आहे, असे सोसायटीतल्या लोकांना फक्त माहीत होते.
सोसायटीचे असे म्हणणे होते की, तुमचे कोर्टामध्ये डीडीओचे मॅटर चालू आहे, त्यांची कागदपत्र द्या म्हणजे त्याच्यावरून तरी आम्हाला तुम्ही पती-पत्नी आहात हे कळेल. पण तेही ते देत नव्हती. अरविंद तिथे राहत नव्हता. कधीतरी तो येऊन जात होता. सोसायटीने याच्याबद्दल अरविंदला विचारले असता तो म्हणाला, अस्मिता तिथे राहते तुम्ही तिच्याकडूनच मेंटेनन्स घेतला पाहिजे.
अरविंद भालेराव याची पत्नी पहिल्या पतीला भेटत होती. नेमका काय प्रकार आहे हे सोसायटीला कळत नव्हते. अस्मिता भालेराव म्हणायची की, मला नवऱ्याकडून कमी मेंटेनन्स मिळतो, तर मी सोसायटीचा मेंटेनन्स भरू शकत नाही. असे करता चार वर्षे निघून गेली. सोसायटीने पाणी बंद करून बघितले. अस्मिता भालेराव सोसायटीच्या सभासदांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करत राहायची. अरविंद भालेरावला घर विकायचं होते पण ही त्या घरातून निघत नव्हती. सोसायटीला सांगत होती की, अरविंद भालेराव हा घर विकायला घेत असेल, तर त्याला एनओसी द्यायची नाही.
सोसायटीला नेमके कळत नव्हते की काय करायचे. त्यांनी वकिलांचा सल्ला घेऊन अरविंद भालेराव यांना पूर्ण मेंटेनन्स क्लियर केल्यानंतर घर त्याचे आहे त्याच्यामुळे त्याला विकण्यासाठी एनओसी दिली जाऊ शकते. कारण अरविंदने अस्मिताचा कुठेही उल्लेख केला नव्हता. ज्याच्या नावावर घर आहे त्याला विकण्याचा अधिकार येतो. आजपर्यंत सोसायटी त्यांना पती-पत्नी असल्याचे पुरावे मागत होते ते त्यांनी आजपर्यंत दिले नाहीत. अस्मिता मात्र सोसायटीमध्ये लोकांवर, सभासदांवर दादागिरी करत होती. म्हणून सोसायटीने सोसायटीच्या ऑफिसमध्ये असलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्या नवरा-बायकोवर तक्रार करण्याची भूमिका घेतली होती. कारण नाहक त्रास सोसायटीला होत होता. सोसायटी चार वर्षे मेंटनन्स न भरता त्या कुटुंबाला सगळ्या गरजा पुरवत होती. सोसायटीतील मेंटेनन्स भरणारे फ्लॅटधारक हे सोसायटीच्या विरोधात होते. म्हणून सोसायटीने या पती-पत्नीच्या विरोधी फौजदारी तक्रार करण्याचा ठरवले.
(सत्यघटनेवर आधारित)