कथा – रमेश तांबे
एक होती मांजर. ती एका गावात राहायची. पांढऱ्या शुभ्र रंगाची, चांगली गुटगुटीत अंगाची. ती गावातल्या वेगवेगळ्या घरात हळूच शिरायची, डोळे मिटून बसायची. अगदी शांत पडून राहायची. स्वयंपाक घरातला उंदीर हळूच मटकावायची. पण कुत्र्यांची तिला खूप भीती वाटायची. त्यामुळे ती कुत्र्यांपासून थोडी लांबच राहायची. दिवसभरात दोन उंदीर जरी मिळाले तरी तिचे काम व्हायचे. पण आता लोक उंदीर पकडण्यासाठी घरात पिंजरे लावू लागले. नवनवीन सापळे लावू लागले. त्यामुळे इकडे मांजरीची उपासमार होऊ लागली. तिला घरात, घराबाहेर उंदीर मिळेनासे झाले. मग घरात एखादा उंदीर दिसलाच तर मांजर चटकन झेप घ्यायची. त्यात लोकांच्या स्वयंपाक घरातील भांडी पडू लागली. कधी दुधाचे भांडे खाली पडायचे तर कधी काचेची भांडी फुटायची. मग लोक मांजरीलाच मारू लागले. घरात शिरताच हाकलू लागले. आता काय करावे बरे? ती विचार करत डोळे मिटून बसायची. माणसांच्या पायाला लाडेलाडे अंग घासायची. म्याॅव म्याॅव करीत शेपटी हलवत बसायची. मग कुणाला दया आलीच तर थोडसं दूध मांजरी पुढे ठेवायचे. पण हे किती दिवस चालणार! यामुळे मांजर चिंताक्रांत होऊ लागली.
शेवटी तिने ठरवले आता गाव सोडून मुंबईत जायचे. तिथेच राहायचे. बघूया सगळेच मुंबईत जाऊन आपले नशीब अजमावतात. आता आपणही जाऊया. मग मुंबईची एस.टी.बस तिने पकडली. पाच-सहा तासांचा प्रवास सीटखाली बसून तिने पूर्ण केला. गाड्यांच्या आवाजाने, माणसांच्या कलकलाटाने तिला कळाले; मुंबई आली! मग शेवटचा स्टॉप येताच ती खिडकीतून बाहेर पडली. मोठमोठे रस्ते, उंच उंच इमारती, मोठमोठी दुकाने खाद्यपदार्थांच्या गाड्या सर्व बघून मांजरीला खूप मजा वाटली. तेवढ्यात रस्त्यावरची दोन-चार भटकी कुत्री समोरून येताना तिला दिसली. पण मांजरीला लपायला जागाच नव्हती. म्हणून ती रस्त्याच्या कडेलाच अंग चोरून बसली. पण त्या कुत्र्यांनी मांजरीकडे ढुंकूनही पाहिले नाही. उलट ते तिच्यापासून अंतर ठेवूनच पुढे निघून गेले. मांजरीला आश्चर्यच वाटलं. तिला जाणवलं गावाकडे असते तर कुत्र्यांनी फाडून काढले असतं आपल्याला!
संध्याकाळी ती एका मैदानाच्या कठड्यावर बसून राहिली. आता खायला कसे मिळवावे? या विचारात ती होती. तेवढ्यात दोन मुली तिथे आल्या. त्यांनी तिच्या अंगावरून हात फिरवले. मानेखाली, कानामागे थोडे खाजवले. मांजरीला हे सारे खूप नवे आणि छान वाटले. मग त्यांनी पिशवीमधून खाऊ काढला आणि चण्या-फुटाण्यासारखा पदार्थ मांजरीपुढे टाकला. पण हे काय खायचं म्हणून मांजर तशीच बसून राहिली. मग मुलींनी खूप आग्रह केला म्हणून मांजरीने तोंड लावले. पण ते खाणे तिला खूप आवडले. दहा-बारा दाण्यातच तिचे पोट भरले. मांजरीला आता बरे वाटले. त्यानंतर एका आजीने दूध आणि पाव तिला दिला. तेही मांजरीने गटवले. आता मांजर चांगलीच सुस्तावली. रात्र झाली. उंदीर, घुशी रस्त्यावर फिरू लागले. पण मांजरीचे पोट भरले होते. त्यामुळे एखाद्या उंदरावर झडप घालावी असे तिला जराही वाटले नाही.
आता मांजर रोज आयते खाते. पोट भरण्यासाठी तिला शिकार करण्याची गरजच उरली नाही. त्यामुळे ती आळशी बनू लागली. तिचे पारंपरिक शत्रू हळूहळू तिचे मित्र बनू लागले. कुत्र्यांना घाबरायचे नाही, उंदरांना पकडायचे नाही. शिकार करणे हा आपला उपजत गुण आहे हेदेखील ती विसरून गेली आहे. तिच्या खाण्यापिण्याचे पदार्थ आणि सवयीदेखील बदलल्या आहेत. अगदी माणसांच्या मुलांसारख्या! माणसांनी भूतदयेच्या नावाखाली मांजरीला आधुनिक, प्रगत बनवले आहे. पण हे जगणे खरे नव्हे. हा मार्ग चुकीचा आहे; हे मांजरीच्या कधी लक्षात येणार कोणास ठाऊक? उलट ती तिच्या गावच्या मित्र-मैत्रिणींना “मुंबईत या मुंबईत या” असे निरोप पाठवते आहे!