संवाद – गुरुनाथ तेंडुलकर
लहानपणी वाचलेली ही बोधकथा…
एकदा एक व्यापारी आपला माल बैलगाडीत लादून, एका गावातून दुसऱ्या गावाकडे चालला होता. वाटेत गावाच्या सीमेवर एक जुने मंदिर दिसले. विश्रांतीसाठी काही काळ तो तिथे थांबला. मंदिरात एक साधू बसला होता. त्या साधूने व्यापाऱ्याला पाणी दिले, काही फळे दिली आणि बोलता बोलता कोण, कुठला, कसला व्यापार वगैरे विचारपूस केली. व्यापारी सुखावला. त्याने साधूला आपण कुठून आलो आणि आता कोणत्या गावाला चाललोय वगैरे सांगितले आणि विचारले ‘‘पण काय हो महाराज, त्या पुढच्या गावातली माणसे कशी काय आहेत?’’
‘‘कशी म्हणजे?’’
‘‘कशी म्हणजे स्वभावाने कशी आहेत? व्यवहाराला कशी आहेत?’’
‘‘सांगतो न् पण तुम्ही आधी मला सांगा की, ज्या गावातून तुम्ही आलात, त्या गावातली माणसं तुम्हाला कशी काय वाटली?’’ साधूने व्यापाऱ्याला विचारले.
‘‘काही विचारू नका महाराज…’’ व्यापाऱ्याने बोलता बोलता खिन्नपणे उसासा सोडला.
‘‘का काय झालं?’’
‘‘काय झालं?” अहो काय नाही झालं म्हणून विचारा. अहो मी माझा माल खपवायला गेलो, तर गावातले निम्मे लोक अडाणी त्यांना माझ्या मालाची काहीच माहिती नाही. त्यांना चांगला दर्जेदार माल कसा असतो, हेच मुळात ठाऊक नाही म्हणून माझा माल खपेना. निम्मे लोक अडाणी आणि निम्मे बदमाश. ज्यांनी माझा माल उधारीवर घेतला त्यांपैकी कुणी पैसे द्यायचे नावच काढेना. आणि गावातल्या बायका तर अशा काही चवचाल की विचारू नका…’
‘‘आणि लहान मुलं?’’ साधूने मध्येच अडवून विचारले.
‘‘ती तर महा-बदमाश. अहो एवढ्या खोड्या काढायची की माझ्या नाकी नऊ आले.’’ बोलता बोलता व्यापाऱ्याचा स्वर कडवट झाला होता, ‘‘पण मला सांगा महाराज, पुढच्या गावातली माणसे कशी आहेत?’’ व्यापाऱ्याने उत्सुकतेने विचारले. ‘‘खरं सांगू? फारसा काही फरक नाही. या मागच्या गावातली माणसे आणि पुढच्या गावातली माणसे दोन्ही जवळ जवळ सारखीच…’’ ‘‘अरे देवा…!’’ असे म्हणून व्यापाऱ्याने आपल्या नशिबाला दोष देत, आणखी तिसऱ्या गावाकडे प्रयाण केले.
दोन दिवसांनंतर आणखी एक व्यापारी त्याच देवळात विश्रांतीसाठी उतरला. त्याने देखील निघताना साधूला तोच प्रश्न विचारला, ‘‘काय हो महाराज, त्या पुढच्या गावातली माणसे कशी आहेत?’’
साधूने त्याला विचारलं, ‘‘मागच्या गावातला तुमचा अनुभव काय?’’
‘‘उत्तम… काही विचारू नका. अहो, त्या गावातले लोक एवढे अगत्यशील आहेत की, निघताना माझा पाय उचलत नव्हता. गावातली माणसे फारशी शिकलेली नाहीत, पण सुजाण आहेत. व्यवहाराला चोख आहेत. स्त्रिया तर एवढ्या प्रेमळ की, मला माझ्या आईची उणीव भासली नाही, मुले व्रात्य आहेत; पण हुशार आहेत. खूप गमती-जमती करतात…’’ व्यापारी मोठ्या उत्साहाने सांगत होता.
साधू हसून म्हणाला की, ‘‘पुढच्या गावातली माणसेदेखील तशीच आहेत. फारसा फरक नाही. तिथेही तुम्हाला चांगलेच अनुभव येतील…’’ खूश होऊन व्यापाऱ्याने मोठ्या उत्साहाने नवीन गावाच्या दिशेने प्रयाण केले. कुठल्या तरी मासिकात वाचलेली ही बोधकथा मला खूपच भावली.
साधूने दोन्ही व्यापाऱ्यांना पुढच्या गावातील माणसे कशी आहेत, ते सांगण्यापूर्वी मागच्या गावातील माणसे कशी वाटली, ते विचारले होते आणि दोन्ही व्यापाऱ्यांना पुढच्या गावातली माणसंही साधारण तशीच असतील, असे सांगितले.
दैनंदिन जीवनात वावरताना लोक आपल्याशी कसे वागतात, हे बहुतांशी आपण स्वतः इतरांशी कसे वागतो, यावरच अवलंबून असते. मी मुद्दाम बहुतांशी हा शब्द वापरतोय; कारण एखाद-दुसरा अपवाद हा सापडायचाच.
पान खाऊन थुंकणाऱ्या यवनाला क्षमा करणारा आणि पुन:पुन्हा नदीवर जाऊन आंघोळ करणाऱ्या संयमी संत एकनाथांचे उदाहरण विरळंच. आपण जर दुसऱ्याच्या अंगावर पान खाऊन थुंकलो तर…? तर लोक आपले थोबाड फोडतील अन् लोकांचेच कशाला, आपण स्वतः काय करू? जर कुणी मुद्दाम आपल्या अंगावर थुंकला, तर आपण शांतपणे जाऊन अंघोळ करून येण्याचा संयम दाखवू शकतो का?
एकनाथांसारखा संयमी संत विरळच आणि म्हणूनच मी ‘बहुतांशी’ असा शब्द वापरला. इतर लोक आपल्याशी वागताना कसे वागतात, हे आपण स्वतः इतरांशी वागण्यावरून ठरवत असतो… तुम्ही एखाद्या भाजीवालीला ‘काय गं ताई…’ असे बोललात, तर तीदेखील ‘काय हो दादा…’ असेच उत्तर देईल. कुणाशीही वागताना आपण अदबीने नम्रपणे वागलो की, जगदेखील आपल्याशी तेवढ्याच अदबीने आणि नम्रपणे व्यवहार करते.
पण आपण स्वतः मात्र वागताना बऱ्याचदा चुकतो. समोरच्याशी उर्मटपणे वागतो; पण त्याचबरोबर समोरच्याने मात्र उर्मटपणा केलेला खपवून घेत नाही. लोकांनी माझ्याशी चांगुलपणाने वागायला हवे, अशी अपेक्षा ठेवणारा मी स्वतः मात्र लोकांशी वागताना मला हवं तसं मनमानीपणे वागण्याचे स्वातंत्र्य घेतो. घरीदारी, शेजारी, ऑफिसात, बाजारात कुठेही असेच अनुभव येतात.
एखादी सासू ‘सून घरात नीट वागत नाही…!’ अशी तक्रार करते, त्यावेळी त्या सासूला विचारावेसे वाटते की, ‘बाई गं, तू तुझ्या सुनेबद्दल तक्रारी करतेस, ती नीट वागत नाही, असे म्हणतेस पण तू तरी तिच्याशी नीट वागतेस का?’ सूनेने सूनेसारखं न वागवता, मुलीप्रमाणे वागावे अशी अपेक्षा करण्याऱ्या सासूचे स्वतःचे वर्तन आईसारखे असते का? याचा विचार करणेही तितकेच गरजेचे नाही का?
जी गोष्ट सासूच्या बाबतीत तीच गोष्ट नवऱ्याच्याही बाबतीत. बायकोच्या कष्टांबद्दल, तिच्या श्रमाबद्दल आपण कौतुकाने बोलतो का? तिने घरासाठी केलेल्या त्यागाची आपल्याला योग्य जाणीव असते का? तिने केलेल्या रुचकर स्वयंपाकाचे आपण मनापासून कौतुक करतो का? कौतुक सोडा… साधी दखल तरी घेतो का? याचाही तमाम नवरे मंडळींनी विचार करायला हवा.
मुलांच्या बाबतीतही हेच घडतं. आपण पालक मंडळी मुलांसमोर वागताना संयम सोडून तसे वागतो. त्यांच्यासमोर खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो…! टी.व्ही वर बघू नये ते बघतो…! चारचौघांत बोलू नये ते बोलतो…!
आणि परिणाम…
तो परिणाम मात्र आपल्याला नको असतो; पण ते परिणाम टाळण्यासाठी आपण पालकांनी ज्या संयमाने वागायला हवे, तसे आपण वागतो का? आपण पालकांनी ‘तामसी’ वागायचे आणि मुले मात्र ‘सात्त्विक’ हवीत अशी अपेक्षा करायची हा दुटप्पीपणा नाही का?
घरी-दारी, बाजारी-शेजारी माणसे आपल्यासारखीच सर्वसामान्य माणसे असतात. अनेकदा ती आपल्याशी ज्या पद्धतीने वागतात, त्याचा आपल्याला त्रास होताे, मनस्ताप होतो. हा त्रास आणि ताप टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपण स्वतः दुसऱ्याशी वागताना आपल्या वागण्याचा दुसऱ्यांना काही त्रास होईल का, याचा विचार करून नंतरच कृती करावी.
समर्थ रामदासस्वामी एका ओवीत म्हणतात…
आपणासी चिमोटा घेतला ।
तेणे जीव कासावीस जाहला ।।
आपणावरून दुसऱ्याला ।
वोळखीत जावे ।।
समर्थांनी सांगितलेल्या विचार आपण आचरणात आणला, तर जग एक सुंदर नंदनवनच बनेल.
पण त्यासाठी सर्वप्रथम आपण आपला स्वतःमध्ये थोडा बदल करायला हवा. आपण जगाला बदलायला जातो; पण स्वतःमध्ये बदल करायला मात्र आपली तयारी नसते. किंबहुना ‘आपल्यात काही बदल करण्याची गरज आहे.’ हेच मुळी अनेकांना मान्य होत नाही. गोष्टीतले दोन्ही व्यापारी एकाच गावातून आले होते; पण त्यांना आलेले अनुभव मात्र भिन्न होते.
‘आपल्याशी लोक ‘असेच’ कां वागतात?’ या प्रश्नाच उत्तर…आपणही लोकांशी ‘तसेच’ वागतो म्हणून…!