विशेष – भालचंद्र ठोंबरे
ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव सृष्टीचे रक्षण कर्ता, पालन कर्ता आहेत. ब्रह्मदेव निर्माता, श्रीविष्णू पालन कर्ता, तर महेश म्हणजे महादेव हे दुष्टांचा नाश करण्याकरिता आहेत. सृष्टीचे पालनकर्ता असतानाही श्री विष्णूंना वृंदा नावाच्या एका साध्वीच्या शापाला सामोरे जावे लागले. त्या संदर्भातली ही कथा आहे.
श्रीमददेवी भागवत पुराणानुसार, तसेच शिवपुराणाच्या रुद्रसंहितेतील पाचव्या खंडानुसार एकदा इंद्र व ब्रह्मदेव कैलास पर्वतावर महादेवांच्या भेटीला गेले असता, तेथे इंद्राला मनाजोगता मान न मिळाल्याने, इंद्राने महादेवाचा अपमान केला. त्यामुळे चिडून शंकराने आपला तिसरा डोळा उघडून तांडव सुरू केला. मात्र ब्रह्मदेवाने शिवाची समजूत घालून, आपला क्रोध समुद्रात टाकण्यास सांगितले. त्याप्रमाणे शिवाने तो क्रोध सागरात टाकला. तो क्रोध गंगा व सागर यांच्या संगमावर पडला व त्यातून एक बालक जन्माला आले. त्या बालकाला सिंधू पुत्र व शिवपुत्र असेही म्हटले जाते. तो जलात उत्पन्न झाल्याने, ब्रह्मदेवानी त्याचे नाव जालंधर असे ठेवले. हा शिवाचा मुलगा असला, तरी तो शिवाचा शत्रू होता.
ब्रह्मदेवाने या बालकाला शुक्राचार्याकडे सोपविले. शुक्राचार्यांनी त्याला मार्गदर्शन केले. तो महाबलाढ्य असूर राजा झाला. जालंधराचा विवाह कालनेमी राक्षसाच्या वृंदा नावाच्या कन्येशी झाला. वृंदा ही विष्णूंची परम भक्त असून, अत्यंत प्रतिव्रता होती. तिच्या पतीव्रतेच्या बलामुळे असुर जालंधर अधिक शक्तिशाली बनला होता. त्याने इंद्र लोकांवर स्वारी करून स्वर्गलोकही जिंकला. आपल्या अतुल शक्तीच्या बळावर तो देवी-देवतांनाही त्रास देऊ लागला. विष्णू लोकावर स्वारी करून, तो लोक जिंकून विष्णू पत्नी लक्ष्मीशी विवाह करण्याची इच्छा त्याच्या मनात उत्पन्न झाली व त्याने विष्णू लोकावर स्वारी केली. मात्र लक्ष्मीने त्याला मीही समुद्रातूनच उत्पन्न झाल्यामुळे, आपण भाऊ-बहीण असल्याचे लक्षात आणून दिले. त्यामुळे त्याने हा नाद सोडला व परत फिरला. त्यानंतर तो कैलासावर स्वारी करून, सतीशी ही विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे सतीला राग आला. तेव्हा महादेव व जालधंरामध्ये युद्ध झाले. मात्र पत्नी वृंदाच्या सतीत्वाच्या बळामुळे महादेव त्याला पराजित करू शकले नाहीत. तेव्हा सर्व देवांनी विष्णूकडे जाऊन, त्यांची आराधना केली व जालंधराचे पारिपत्य करण्याची विनंती केली. परंतु वृंदा ही विष्णूंची परमभक्त असल्यामुळे विष्णूने यात मदत करण्याचे नाकारले. परंतु देवांनी त्यावर दुसरा उपाय असेल, तर सांगा असे म्हटले; परंतु दुसरा कोणताही उपाय नसल्याने विष्णूने अखेर देवांचे म्हणणे मान्य केले. ते जालंदराच्या रूपात वृंदाच्या महालात गेले.
जालंधर युद्धावर असताना, वृंदा त्याच्या यशासाठी पूजेद्वारे साधना करीत असे. आपला पती आल्याचे समजून वृंदेने जालंधर रूपात असलेल्या विष्णूंचे चरणस्पर्श केले व त्याला आलिंगन दिले; परंतु त्या मीलनात पतीप्रेमाची ओढ नसल्याचे तिला जाणवले. मात्र या कृतीमुळे तिचे पावित्र्य भंग झाले. त्यामुळे तिकडे महादेव व जालंधराच्या चालू असलेल्या युद्धामध्ये जालंधराचा वध झाला. मीलनात पती प्रेमाची ओढ न भासल्याने, वृंदेने आपल्या सात्विक तपोबलाने समोर दिसणारे जालंधराचे रूप मायावी असल्याचे जाणून साशंकतेने पाहताच विष्णू आपल्या मूळ रूपात प्रकट झाले.
(काही ठिकाणी जालंधराचे शिर वृंदाच्या महालात येऊन पडले ते पाहून समोर दिसणाऱ्या जालंधराकडे विस्मयचकीत होऊन पाहताच, विष्णू आपल्या मूळ रूपात प्रकट झाले असाही उल्लेख आहे.)
श्रीविष्णूंकडून आपली फसवणूक होऊन विश्वासघात झाल्याचे लक्षात येताच, वृंदेने विष्णूला तू काळा दगड होऊन पृथ्वीवर पडशील व तुला आपल्या पत्नीचा विरह करावा लागेल. तसेच तुझ्या पत्नीलाही सतीत्वावरून आरोपाचा सामना करावा लागेल, असा शाप दिला. भगवान विष्णू ताबडतोब शिळा झाले. मात्र लक्ष्मी व सर्व देवतांच्या विनवणीवरून वृंदाने तो शाप मागे घेतला. मात्र विष्णूंनी वृंदेला तू तुळस रूपात सदैव माझ्या शाळीग्राम रूपाच्या सान्निध्यात राहशील, असा आशीर्वाद दिला. पतीच्या विरहात वृंदेने स्वतःला अग्नीच्या हवाली केले. तिच्या राखेतून त्या ठिकाणी एक रोपटे निर्माण झाले. विष्णूने त्याला तुळस असे नाव दिले. याच तुळरूपी वृंदाचा व शाळीग्राम रूपातील विष्णूचा दरवर्षी विवाह लावण्यात येतो. यालाच तुलसी विवाह म्हणतात. वृंदाने दिलेल्या शापामुळे श्री विष्णूंना राम अवतारात पत्नी सीतेचा विरह सहन करावा लागला व सीतेलाही सतीत्वाच्या आरोपाला सामोरे जावे लागले.
तात्पर्य : जग कल्याणासाठीही जरी भगवंताने चुकीचे कर्म केले असेल, तर त्यांनाही या चुकीच्या कर्माचे फळ भोगावे लागते.