वायनाड : वायनाड जिल्ह्यातील काही गावांमध्ये ३० जुलै रोजी भीषण भूस्खलन (Wayanad Landslide) झाले होते. त्यामुळे तीन ते चार गावे बाधित झाली असून यामध्ये तब्बल ३५७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. भूस्खलन झाल्यानंतर यंत्रणेकडून बचाव कार्य सुरू असताना शेकडो लोकांना घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. मात्र चार दिवसांनंतर पुन्हा आपल्या घरी परतलेल्या लोकांना धक्का बसला आहे. अनेकांच्या घरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकीकडे भूस्खलन तर दुसरीकडे चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वायनाडमधील भूस्खलनानंतर बाधित लोकांना रेस्क्यू टीमने काही काळासाठी स्थलांतरित केले होते. चार दिवसांनंतर जेव्हा नागरिक पुन्हा घरी परतले, तेव्हा त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू गहाळ झाल्या असल्याचे लक्षात आले. इतकेच नव्हे तर काहींच्या घरातील कपडेही चोरांनी चोरी केले. त्यामुळे आधीच भूस्खलनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसमोर मोठ्या समस्या उभ्या राहिल्या आहेत.
दरम्यान, भूस्खलनामुळे आधीच स्वकीय गमावलेल्या नागरिकांच्या मनात आता सर्वस्व गमावल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी चोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली असून रात्रीच्या वेळी परिसरात गस्त वाढविण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच चोरट्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असेही पोलिसांनी सांगितले.