निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
निसर्गाचे रक्षक या जंगली खजिन्याचे खजिनदार म्हणजे जंगलातील मूळ आदिवासी. ॲमेझॉनच्या वर्षावनात येथे आदिवासींच्या अनेक जमाती आहेत. जवळजवळ ४०० ते ५०० जमाती माहीत असणाऱ्या; परंतु यापेक्षा अजून किती जमाती आहेत हे आपल्याला माहीत नाही. किंबहुना या जगाशी त्यांचा संपर्कच नाही. कायापो, यानोमामो या आदिवासी जमाती. टुपी ही ब्राझीलमधील आदिवासी जमात. ब्राझील आणि पेरू येथे अनेक अज्ञात आदिवासी जमाती आहेत.
बहुतेक करून हे आदिवासी नदीच्या किनारीच राहतात. येथील बऱ्याचशा आदिवासींचा शेती, गुरेपालन, येथे असणाऱ्या रबरांच्या झाडांपासून रबर मिळविणे, प्राण्यांच्या कातड्या, शिंग मिळविणे, वृक्षतोड करून लाकडांचा व्यवसाय, पक्ष्यांची शिकार करून त्याचा व्यवसाय अशी अनागिनत कामे हे आदिवासी करतात. स्वतःच्याच विश्वात रमणारे येथील आदिवासी आपल्या परंपरेचे आणि संस्कृतीचे जतन करतात. टेंबे नावाचे मूळ निवासी हे विवाह, सांस्कृतिक कार्यक्रम, युद्ध अशा वेळेस जेनीपापो या वृक्षापासून मिळालेला काळ्या रंगाचा रस आणि उरुकमच्या बियांपासून मिळालेला लाल रंगाचा रस शरीर रंगविण्यासाठी वापरतात. ते इतर कोणालाही त्यात हस्तक्षेप करू देत नाहीत. येथील आदिवासींना बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवण्यास आवडत नाही किंवा यांच्या जगात बाहेरची लोकं आलेलीही यांना चालत नाही. ही लोकं अतिशय क्रूर, विचित्र, भयंकर आणि खतरनाक अशी असतात. वर्षावना बाहेरील लोकांना हे ग्रहण करू शकतच नाहीत त्यामुळे हे नरबळी देण्यास सुद्धा कमी करत नाहीत. यांच्याकडे नरबळी देण्याचे सुद्धा असंख्य प्रकार आहेत. कधी आध्यात्मिकरीत्या तर कधी काही विषारी वृक्षांच्या आहारी हे बळी देतात. त्यात पशू, पक्षी आणि मानव हे सुद्धा आहेत.
जंगलात वनांचं, वेलींचं एवढं काही जाळं असतं की त्यांना ती झाडं तोडूनच मार्गक्रमण करावे लागते. पण तरीही नैसर्गिक वातावरण पूरक असल्यामुळे तेथे खूप वृक्ष, वनस्पती, वेली वाढत असतात. हे जंगलामध्ये खूप जोरजोरात गातात. त्यामागे त्यांचा आनंद व्यक्त करणे हा उद्देश असला तरी दुसरा उद्देश यांच्यापासून प्राण्यांनी लांब राहावे. जवळजवळ १८० भाषा येथे बोलल्या जातात. पिरहा लोक दोनशे वर्षांपासून इतर जमातींशी संपर्कात आहेत; परंतु तरीही त्यांनी त्यांची भाषा बदलू दिली नाही. पिरहा जमात ही त्यांच्या शिट्टीद्वारे ध्वनी काढून बोलत असते. तोंडातून बिन शब्दांचे उच्चार असतात. हे आदिवासी प्राणी पक्ष्यांच्या सान्निध्यात राहून त्यांच्या भाषा शिकतात आणि त्यांच्या आवाजात त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांची स्वतःच्या आवडीची नावं सुद्धा ठेवतात. त्यांची स्वतःची भाषा असून पशुपक्ष्यांसाठी सुद्धा त्यांची भाषा असते. त्यांच्या भाषेमध्ये कुठलेही शब्दभांडार किंवा व्याकरण नाही. प्रत्येक जमातीची बोलीभाषा ही सांकेतिक असते. अत्यंत बुद्धिमान आदिवासी. हे पूर्णपणे पर्यावरणाशी एकरूप झालेले. ब्राझीलमधील हे मैसी नदीच्या किनारी राहतात. ते दिवसा जास्तीत जास्त दोन तास झोपतात. रात्री ते क्वचितच झोपतात. कदाचित रात्री डास आणि कीटक चावत असल्यामुळे असे असेल.
अध्यात्म आणि शास्त्र यांची जोड यांच्या परंपरागत संस्कृतीमध्ये आहे. आपल्यासारखे त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्या विशिष्ट भाषेतील मंत्रोच्चार आहेत. आकाशात एक खूप मोठी झोपडी आहे आणि त्यात मृत्यू झालेली प्रत्येक व्यक्ती आकाश मार्गे तिथे जाते अशाच त्यांच्या मृत्यूबद्दलच्या कल्पना आहेत. यांचा आत्म्यावर खूप विश्वास असतो आणि हे असे समजतात की, जंगलातील प्रत्येक जीवामध्ये आत्मा वास करीत आहे. त्यामुळे झाडांचा, दगडांचा, नदीचा, पशुपक्ष्यांचा म्हणजेच निसर्गातील सर्वच जीवसृष्टीचा ते आदर करतात. मुळात परमेश्वर म्हणजे त्यांना माहीतच नाही; परंतु ते आत्म्यावर विश्वास ठेवतात.
त्यांच्या आहारात फळं, फुलं, मासे, कीटक, प्राणी, पक्षी, वनस्पती यांचा समावेश असतो. निसर्गाशी यांची खूप जवळीक असते. लहानपणापासूनच शिकारीचे आणि निसर्गाशी जवळीक करण्याचे शिक्षण दिले जाते. या आदिवासींना रानातले औषध यांची चांगली ओळख असते. जंगलातच राहत असल्यामुळे तेथील वनस्पती, कीटक, विषारी, बिनविषारी हे त्यांना ज्ञात असते.
आपल्याला आवश्यक असणारे अन्न तेवढ्याच पुरती शिकार ते करतात. शिकार करण्यासाठी विषारी वनस्पतींचा रस काड्यांना लावून लांब पोकळ बांबूंमधून जोरदार फुंकर मारून त्या काड्यांचा उपयोग पशुपक्ष्यांची शिकार करण्यासाठी करतात, तर विष, मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण आणि पिर्हाना नावाच्या माशाचे दात यांच्या उपयोगाने विषारी भाले बनविण्यात येतात. एखाद्या उंच झाडांच्या फांद्यावरील एखादा प्राणी किंवा पक्षी यांची खूप सहजरीत्या ते शिकार करतात. जंगलातील डुकरांसारख्या शिकारींसाठी लाकडी भाले, बाण वापरतात. हे अतिशय हुशार, चपळ, तीक्ष्ण नजरेचे, घ्राणेंद्रियाचे आणि कर्णंद्रियाचे असतात. शेती करताना जर शेती व्यवस्थित होत नसेल म्हणजेच मृदा तत्त्व जर तिथे संपलेले असेल तर दुसरीकडे स्थलांतरित होऊन ते तिथे शेती करतात.
शरीरावर अनेक ठिकाणी विविध पद्धतीने गोंदण करणे, नाक, ओठ, भुवया येथे टोचून घेऊन त्यात हाड, रंगीत दगड, रंगीबिरंगी पीस यांचे दागिने वेगवेगळ्या प्रकारचे आकार यांच्या अलंकृत रचना करणे, शरीरावर फुलं, फळं, माती यांच्या रंगांपासून शरीर रंगविणे त्यांना आवडते. नृत्य करून ते आपला आनंद साजरा करतात. बऱ्याचशा ब्राझिलियन जमाती या निर्वस्त्र, नैसर्गिक अवस्थेतच राहतात. हे अत्यंत घातक असतात. आफ्रिकेकडील काही आदिवासी तर प्राण्यांचे रक्त सुद्धा पितात. छोट्या छोट्या ओढ्यावर, नदीवरचे पूल बांबूचे, लाकडाच्या खोडांचे, वेलींचे बांधलेले असतात. कधी विखुरलेल्या झोपड्या तर कधी एकत्रित झोपड्या दिसतात.
झोपड्यांच्या किनारीला काळ्या रंगाच्या मातीचे लेपण करतात. आपल्याला वाटते की ते सुशोभीकरण आहे; परंतु ते फक्त सुशोभीकरण नसून त्यांच्या झोपड्यांमध्ये बाहेरच्या कीटकांनी प्रवेश करू नये म्हणून ते खनिजयुक्त काळ्या मातीचे लेपन करतात. सरपटणाऱ्या विषारी जीवांमुळे हे बऱ्याचदा त्यांच्या झोपड्यांमध्ये झुले बांधून त्यांत झोपतात. पामच्या झावळ्यांपासून घरांच्या गोल तर कधी त्रिकोणी रचना असतात. दलदल आणि पाऊस यामुळे काही जमाती यांची घरं उंचावर बांबूंच्या पायांवर बांधलेली असतात. हुआओराणी ही जमात योद्धाच्या रूपात ओळखली जाते. यांची सुद्धा एक शाळा असते. जिथे यांच्या मुलांना शस्त्र बनवणे, जंगलातील पर्यावरण पूरकतेनुसार स्वतःचा शारीरिक विकास आणि संतुलन शिकविले जाते.
अमोंडावा जमातीने तेथील वातावरणानुसार जगण्याची कला आत्मसात केलेली दिसते. त्यांना फक्त दिवस-रात्र आणि बदलणारे ऋतू एवढं समजतं. त्यांना महिना-वर्ष-दिनदर्शिका यातील काहीच गोष्टी कळत नाहीत.
dr.mahalaxmiwankhedkar @gmail.com