विशेष लेख – अभिजित खांडकेकर
मैत्री आणि मित्र तेच असले तरी वाढत्या वयाप्रमाणे या नात्यात अधिक प्रगल्भता येते. निखळ मैत्री कोणत्याही अटी-शर्थीशिवाय समोर येते. आर्जवे करावी लागतात, विनंती करावी लागते ती निखळ मैत्रीच नसते. सध्याच्या काळात परिचित अनेक असतात, पण खरी मैत्री मात्र काहींशीच जुळते. मैत्रीला वयाचे, मानाचे, श्रीमंत-गरिबीचे कोणतेही बंधन नसते. मनाचे धागे जुळले की बंध दृढ होतात आणि मैत्री अभंग राहते.
फ्रेंडशीप डे अर्थात मैत्री दिन साजरा करण्याची पाश्चात्यांची परंपरा अंगीकारून आता इतका काळ लोटला आहे की, ती आपली नसल्याचा विचारही आता मनाला शिवत नाही. याचे कारण म्हणजे विविध दिवसांच्या साजरीकरणामागे मुळात त्या त्या नात्याला उजाळा देण्याचा, स्नेहबंध बळकट करण्याची, एकमेकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि परस्परांचे स्मरण करत आनंदाची आणि आठवणींची देवाण-घेवाण करण्याचाच हेतू असतो. मुळात हा हेतूच मानवी भावभावनांचा गाभा असल्यामुळे त्याची देशी वा परदेशी अशा विभागांमध्ये विभागणी होत नाही. भावलेला विचार मनापासून आत्मसात केला जातो आणि तितक्याच प्रेमाने तो दिवस साजराही केला जातो. मैत्री दिनाचेही तसेच आहे.
वयाच्या प्रत्येक टप्प्यातल्या भावना वेगळ्या असतात. त्यांचे महत्त्व, संदर्भ वेगळे असतात. मैत्रीचे नातेही त्याला अपवाद नाही. कधी काळी दररोज भेटणारे, नित्याच्या सहवासात असणारे मित्र कामाच्या वाढत्या व्यस्ततेत कधी दिसेनासे होतात ते समजतही नाही. कामाचा वाढता भार आपल्याला मित्र-मैत्रिणींपासून लांब नेतो. मात्र निकटचा सहवास नसला तरी आठवणी पुसल्या जात नाहीत. संपर्क कमी झाला तरी संवेदना संपत नाहीत. सध्या मी याचा अनुभव घेतो आहे. कामामुळे पूर्वी इतके मित्रपरिवाराच्या संपर्कात राहणे शक्य होत नाही. मात्र याचा अर्थ मैत्री संपते वा तो जिव्हाळा आटतो, असे अजिबात नसते. उलटपक्षी वाढत्या वयाबरोबर हे नाते अधिक दृढ होत जाते, असे वाटते. आपण अधिक समजूतदारपणे एकमेकांकडे बघू शकतो. त्यांना शहाणी साथ देऊ शकतो. म्हणूनच या वयातील मैत्री मला खास वाटते.
सध्याच्या काळात आपण अनेकांना ओळखतो. या पसाऱ्यातून खरी निखळ मैत्री शोधणे खूप अवघड आहे. पण जे शोधायला लागते ते खरे मैत्रच नसते, असे मला वाटते. मैत्रीमध्ये भावना आपसूक समजतात. त्या समजावून सांगण्याची, उलगडून दाखवण्याची गरज पडत असेल तर ती मैत्री खरी नाही, हे समजण्यास हरकत नाही. कोणत्याही उद्देशाने, कोणत्या तरी लाभाच्या आमिषाने, एखादी व्यक्ती आपल्याला आवडते म्हणून केलेली मैत्री खरेच निखळ आणि निर्व्याज आहे का, याची पडताळणी करून पाहायला हवी, कारण कधी कधी याच गोष्टी मैत्रीचे धागे सुटे करण्याचे कामही करतात. मुख्य म्हणजे कोणत्याही अटी-शर्तींवर होते ती मैत्रीच नसते, असे माझे स्पष्ट मत आहे.
माझ्या मैत्रीच्या संकल्पना इतक्या स्पष्ट आणि पारदर्शी आहेत. माझे वयाने लहान तसेच मोठे असे खूप चांगले मित्र आहेत. उदाहरण द्यायचे तर वयाने लहान असणाऱ्या आमच्या काही मित्रांच्या मुला-मुलींना मला दादा, काका, मामा असे म्हणण्याऐवजी थेट नावाने हाक मारायला सांगतो. त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात मित्रत्वाचे इतके छान नाते निर्माण झाले आहे की ही मुले आयुष्यातल्या अनेक गोष्टी माझ्यासोबत अगदी बिनधास्त शेअर करतात. वयाने ज्येष्ठ असणाऱ्या मित्रांचे उदाहरण द्यायचे तर सेटवर वयाने ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तींशी आदराने बोलत असलो तरी आमचे नाते मित्रत्वाचे असल्यामुळे त्यांच्याशी खूप छान सूर जुळलेले असतात. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळते.
त्याचप्रमाणे आम्ही एकत्र खूप धमालही करतो. अशा वेगवेगळ्या वयोगटातल्या मित्र-मैत्रिणींमुळे आयुष्य समृद्ध होते, पूर्ण होते असे मला वाटते. बरेचदा काही निर्णय तुम्ही स्वत:चे स्वत:च घेता आणि या निर्णयांबद्दल तुम्हाला कधी परखडपणे तर कधी मायेने सांगणारे, समजावणारे, प्रसंगी कौतुक करणारे, खडसावणारे असे कोणी तरी हवे असते. हे काम एखादा मित्र किंवा मैत्रीणच करू शकते.
बालपणीचा काळ रम्य असतो, असे म्हणतात. या दिवसातली मैत्री खूप निखळ, निरागस असते आणि आयुष्यभर टिकते. माझ्या बाबतीत सांगायचे तर बाबांची बदलीची नोकरी असल्यामुळे कधीही एका ठिकाणी राहता आले नाही. आम्हाला अनेक गावे, शहरे बदलावी लागली. मला शाळा अर्ध्यावर सोडून दुसऱ्या ठिकाणी जावे लागले. त्यामुळे माझ्या बालपणीच्या मैत्रीच्या आठवणी खूप वेगळ्या आहेत. अगदी बीड, परभणी, अहमदनगरमध्ये वास्तव्य झाल्यामुळे अनेकांशी मैत्र जुळले. बालपणीचे अनेक मित्र या भागातले होते. मात्र नंतर त्यांच्याशी फारसा संपर्क राहू शकला नाही. आता सगळ्यांची नावे आठवत नसली तरी त्यांच्याबरोबर केलेल्या करामती आठवतात. आयुष्य असेच असते. आपल्या आयुष्यात अनेक माणसे येतात. काही आयुष्यभर सोबत करतात, तर काही निघून जातात. पण त्यांच्यासोबत जगताना तेवढ्या वेळात तुम्ही जे काही शिकता, अनुभवता ते आयुष्यात मोठे होण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडते.
मी अभिनय क्षेत्रात आलो. इथे रमलो. मनोरंजनाच्या क्षेत्रातली मैत्री म्हणजे तर अळवावरचे पाणी. इथे प्रत्येकाला पारखून आणि जोखून घ्यावे लागते. इथे असणाऱ्या प्रत्येकाशी तुमची मैत्री होतेच असे नाही. इथल्या काहीजणांशी फक्त एक सहकलाकार किंवा आपल्याच क्षेत्रातली व्यक्ती म्हणून मर्यादित संबंध ठेवावे लागतात. अशा व्यक्तींना ओळखणे खूप आवश्यक असते. इथे प्रत्येकासोबत मनमोकळे वागता येत नाही. तसेच याच क्षेत्रातले असूनही मैत्री होऊ शकते किंवा तुमचे मित्र होऊ शकतात, अशा लोकांनाही पारखून घ्यावे लागते. त्यांना तुम्हाला मिळणाऱ्या प्रसिद्धीशी, उत्पन्नाशी, लोकप्रियतेशी काही देणे-घेणे नसते. त्यांना तुमच्याबद्दल असूया नसते. तुमच्या मैत्रीच्या नात्याला कशामुळेही तडा जात नाही. कोणत्याही परिस्थितीत ते अखंड आणि अभंग राहते.
आयुष्यात जवळचे मित्र कोण आणि लांबचे मित्र कोण हे मला ठरवता येत नाही. माझ्यासाठी मित्र म्हणजे मित्र. त्याला वयाचे किंवा इतर कोणतेही बंधन नसते. मैत्रीमध्ये लगभेदही नसतो. मैत्रीत आपल्याला अनेक अनुभव येतात. मी नाशिकला असताना ‘स्वप्नगंधा’ नावाच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये होतो. आम्ही प्रायोगिक नाटके करायचो. अर्थात हे फार कमी जणांना माहीत आहे. बहुसंख्य लोकांना मी ‘आरजे’ म्हणून काम केल्याचे आणि नंतर थेट अभिनयाच्या क्षेत्रात आल्याचेच माहीत आहे. प्रायोगिक रंगभूमीवर काम करताना त्या नाटकाच्या ग्रुपमधले सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. पण त्यांच्यासोबत घालवलेला काळ आजही स्मरणात आहे. त्यांच्यासोबत नाशिकमधल्या निसर्गरम्य ठिकाणांना भेटी दिल्या. ग्रुपमधला सर्वात लहान सदस्य असूनही त्यांनी मला कधीही अंतर दिले नाही, हे महत्त्वाचे.
आता मैत्री साजरी करण्यासाठी एखादा दिवस असावा का, असा प्रश्न दरवेळी विचारला जातो. खरे तर प्रत्येक दिवस हा फ्रेंडशीप डेच असतो. पण या दिवसाच्या निमित्ताने आपण स्वत:ला त्या नात्याची पुन्हा एकदा आठवण करून देतो. तसे म्हटले तर भाऊ आयुष्यभर बहिणीचे रक्षण करतच असतो. पण रक्षाबंधन किंवा भाऊबीजेच्या निमित्ताने आपण त्या नात्याला नवा आयाम देतो. हे नाते पुन्हा जगतो. ‘फ्रेंडशीप डे’चे तसेच आहे. हा दिवस पाश्चात्त्य संस्कृतीची देणगी असला तरी आपले मित्रांसोबत खूप वेगळे संबंध असतात, हे लक्षात घेऊन या दिवसाचे वेगळेपण मान्य करायला हवे. आज माझ्या बहिणीशी गप्पा होत नसतील तेवढ्या मैत्रिणींशी होतात. म्हणूनच या नात्याची एक आठवण जपण्यासाठी किंवा आपले असे एक नाते आहे आणि ते जपायला पाहिजे, याची स्वत:लाच जाणीव करून देण्यासाठी अशा दिवसांची गरज आहे, असे मला वाटते. (अद्वैत फीचर्स)