भोपाळ : सध्या केरळच्या वायनाडमधील भूस्खलनामुळे (Wayanad Landslide) देशभारतून हळहळ व्यक्त होत असतानाच मध्यप्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यामध्ये आज सकाळी मातीची भिंत कोसळल्याची (MP Wall Collapse) दुर्घटना घडली. यामध्ये ९ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता असून बचावकार्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर जिल्ह्यातील शाहपूरच्या हरदौल मंदिरात शिवलिंगाचे बांधकाम आणि भगवत कथेचे आयोजन सुरू आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच याठिकाणी शिवलिंगांची निर्मिती केली जात आहे. रविवारीही शिवलिंग बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. तसेच आज रविवारची शाळेला सुट्टी असल्यामुळे मातीचे शिवलिंग बनवण्यासाठी ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलेही मोठ्या संख्येने आली होती.
परंतु शिवलिंग बनवत असताना सकाळी ८ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास मंदिर परिसराला लागून असलेली पन्नास वर्षे जुनी मातीची भिंत थेट चिमुकल्यांच्या अंगावर कोसळली. यामुळे येथील ९ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन तातडीने बचावकार्यास सुरुवात केली.
मुख्यमंत्र्यांकडून ४ लाख रुपयांची मदत जाहीर
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला. तसेच मृत मुलांच्या कुटुंबीयांसाठी ४ लाखांची मदत जाहीर केली. जखमी मुलांवर योग्य ते उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. यावेळी मोहन यादव म्हणाले, ‘सागर जिल्ह्यातील शाहपूर या गावात भिंत कोसळून नऊ मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून माझे मन हेलावून गेले. मी जिल्हा प्रशासनाला निर्देश देऊन जखमींवर योग्य ते उपचार करण्यास सांगितले आहे’.
त्याचबरोबर मृत मुलांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच जखमी मुलांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवो, आणि ज्यांनी आपली मुलं गमावली त्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना देखील मुख्यमंत्री मोहन यादव यांनी व्यक्त केली.