श्रावण महिना सुरू होताच सणांची शृंखलाच सुरू होते. नागपंचमी, राखीपौर्णिमा हे खास स्त्रियांचे सण याच महिन्यात येतात. त्यानंतर येणारे गौरी-गणपती, नागपंचमी, नवरात्र, दिवाळी या सगळ्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या सणांची सुरुवात होते. श्रावणात येणारे सर्व सण शेती व्यवसायाशी निगडित असतात. भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सण साजरे केले जातात. आपल्या संस्कृतीचा वारसा म्हणून जतन केले जातात. अशा पद्धतीने श्रावण मासी हर्ष मानसी हा महिना उत्साहात साजरा केला जातो.
विशेष – लता गुठे
बालकवींची श्रावणमासी कविता वाचली की श्रावण डोळ्यांसमोर थुई थुई
नाचू लागतो…
श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरूनी ऊन पडे
श्रावणाचं साजिरं रूप अनुभवण्यासाठी प्रत्येकाने सिमेंटच्या जंगलातून बाहेर जाऊन उघड्या रानात झिम्माड्यात येणारा पाऊस अंगा खांद्यावर घेऊनच अनुभवायला पाहिजे.
ग्रामीण भागात माझं लहानपण गेल्यामुळे तेथील निसर्ग आणि निसर्गाबरोबर ग्रामीण भागातील संस्कृती, सण, उत्सव याची रुजवणूक झाली. श्रावण म्हटलं की, श्रावण झुले मनात झुलू लागतात…
खरं सांगू… बालपण हे रानफुलासारखंच असतं. थोड्या काळाचं सोबती. सर्वात सुंदर खळखळ वाहणाऱ्या निरागस झऱ्यासारखं अवखळ. म्हणूनच कित्येक वर्षे लोटली तरी त्या आठवणी ताज्या जाणवत राहतात…
पंचमी एक-दोन दिवसांवर येऊन ठेपली की, आई चुलीवर ज्वारीच्या लाह्या भाजू लागायची, त्या खरपूस वासानं आजूबाजूचा परिसरही मंत्रमुग्ध व्हायचा. पांढऱ्या शुभ्र ज्वारीच्या लाह्याचं ताट पाहायला मस्त वाटायचं. त्यातल्या मूठभर खिशात कोंबायच्या आणि दुसरी मूठ तोंडात टाकत अंगणात पळायची घाई व्हायची, कारण अंगणात झोका खेळायला अनेक मित्र-मैत्रिणी आलेले असायचे. मग पाठीमागून आई आवाज द्यायची, “थांब जरा… कुठे धावतेस? आपल्याला वारुळाला जायचंय नागोबाला पुजायला?” असं म्हणत आई भराभर तयारी करायला लागायची. एका ताटात दुधाची वाटी, हळद-कुंकू, लाह्या, दिवा, अगरबत्ती असं सगळं सामान घेऊन छान विणलेला रुमाल त्यावर टाकायची, तोपर्यंत आजूबाजूच्या शेजारच्या काकू, मावशी, ताई, आजी सगळ्या जमा व्हायच्या आणि साडीचे पदर सावरत ओल्या पायवाटेने उंच वाढलेल्या गवतातून वारुळाच्या दिशेने निघायच्या… वारुळाच्या रस्त्यावर गावाबाहेर मोठ्ठं लिंबाचं झाड होतं. त्या झाडाला अनेक झोके उंच उंच चढताना पाहिले की एकदा नजर आकाशाकडे आणि पुन्हा जमिनीकडे अशी भिरभिरल्यासारखी अनेक झोक्यांवरून फिरायची. तेवढ्यात कोणीतरी गाणं सुरू करायचं आणि तिच्या पाठीमागे इतर बायका गाणे म्हणायच्या. चल गं सये वारुळाला… येताना खूप सारी रानफुलं हातात मावतील तेवढी घेऊन घरी यायची. त्याचे हार बनून देवघराला बांधायची… संध्याकाळी जेवण झाले की संपूर्ण गल्लीतल्या बायका अंगणात यायच्या. मग फेर धरून फार सुरेख गाणी म्हणायच्या. मला त्यातलं एक गाणं जरासं आठवतं…
या गं बायांनो या गं सयानो सांगते तुम्हास ऐका,
श्रीकृष्णाला देवी निघाल्या रंग पाहा कैसा…
पुढचं फारसं आठवत नाही. झिम्मा, फुगड्या, उखाणे आणि खळखळून हसणं. तेवढंच काय ते त्यांना मिळालेलं स्वातंत्र्य जणू काही श्रावण बहाल करायचा.
श्रावणात एकापाठोपाठ एक येणारे सण असेच उत्साहात साजरे व्हायचे. पिकाने शेतं डवरलेली असायची. त्यामुळे जिकडे तिकडे हर्ष उल्हास दिसून यायचा. असं हे सर्व वातावरण पाहून कवयित्री शांता शेळके त्यांच्या कवितेतून भेटलेल्या श्रावणाचं रूप किती लुभावनारं आहे पाहा…
चार दिसांवर उभा, ओला श्रावण झुलवा,
न्याया पाठवा भावाला हिला माहेरी बोलवा
असं हे माहेरच्या श्रावणातलं सदैव मनाला वेडावणारं नातं. किती सुरेख आहे नाही…! सासरी गेलेल्या नवविवाहित मुली माहेरी आल्या की, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असायचा… नवीन साड्या नेसून लाल चुटूक मेंदीचे हात एकमेकींना दाखवत सासरच्या गप्पा मारत निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटायच्या.
ऊन-पावसाचा खेळ खेळत श्रावण उंच नभात इंद्रधनुष्याचं तोरण बांधायचा. असा आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी साक्षात शंकर भगवान सृष्टीवर विसाव्याला येतात असं म्हणतात. श्रावणी सोमवार हा अतिशय पवित्र दिवस मानला जातो. त्यादिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन मनोभावे पूजा केली जाते.
याच महिन्यात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे श्रावण महिना श्रेष्ठ आणि पवित्र मानला जातो. श्रावणात पावसाचं रूपडंही वेगळंच जाणवतं. तो धुवांधार कधीच येत नाही. रिमझिमत उघड्या रानावनातून सळसळत येतो. युगानुयुगे धरतीचा हा प्रियकर तिचं श्रावणातलं सौंदर्य पाहून हुरळून जातो आणि तिला मनोभावे सजवतो. श्रावणातली सृष्टी प्रत्येक कलाकाराच्या नजरेला भुरळ घालते… मग ती कधी कवितेतून साकार होते तर कधी चित्रातून व्यक्त होते…
माझ्याच कवितेतील काही ओळी…
सखे श्रावण आला गं
ऋतू साजरा आला गं
करा उत्सव साजरा
आला श्रावण लाजरा
ऊन केशरी उटणे लावा
रूप धरेचे प्रियास दावा
निंबेलोन उतरा गं
सखे श्रावणाला गं
धरतीचा सौंदर्य पाहण्यासाठी नजरही तितकीच संवेदनशील लागते. डोंगरदऱ्यातून झरझर खाली येणारे पांढरे शुभ्र तुषार उधळत कोसळणारे धबधबे ते डोळ्यांच्या कॅमेऱ्याने टिकताना अशी अवस्था होते की किती साठवावे.
आला आषाढ-श्रावण, आल्या पावसाच्या सरी, किती चातकचोचीने प्यावा वर्षांऋतू तरी! अशी अवस्था होऊन जाते.
सिमेंटच्या जंगलात राहणारी माणसं सौंदर्याचा खजिना लुटण्यासाठी श्रावणात कासच्या पठाराला आवर्जून भेट देतात. अनंत रंगाच्या छटांची असंख्य फुले फुललेली पाहून आनंदाच्या ‘डोही आनंद तरंग’ अशी अवस्था होते. काही काळ का होईना रोजचे व्यापताप विसरून जेव्हा घरेच्या सौंदर्याने मोहित होतात… तेव्हा माझ्यासारख्या एखाद्या कवयित्रीला ही धरती सती पार्वती वाटते आणि पाऊस शंकर भोळा… अशा या अद्वैताचा सोहळा पाहताना मनाची अवस्था काय होते ते शब्दांच्या चिमटीत पकडणे शक्य होत नाही.
निसर्गाचा हा मनमोहक आविष्कार लुटत प्रवास करण्यातली मौज काही औरच… गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहताना सहज ओळी ओठातून बाहेर पडतात…
आली सर गेली सर
कुठे कुठे रेंगाळत
कुठे गढूळले डोह
कुठे ओघळ वाटेत
मध्येच कोणीतरी गुणगुणायला लागतं…
हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणांच्या मखमलीचे
आहाहा.. काय सुरेख आहेत नाही या ओळी..!
कोणीतरी मध्येच दाद देतो. कधीतरी शाळेच्या बाकावर बसून पाठ केलेली ही कविता सर्वांच्याच मनपटलावर रेंगाळते. मला आजही आठवते आमच्या गुरुजींनी शिकवलेली ती कविता. त्या दिवशी आम्ही सारे भारावून गेलो होतो. रिमझिम सरी हलक्याशा बरसत होत्या. आमच्या शाळेच्या पाठीमागे टेकडी होती आणि त्या टेकडीवर एक मंदिर. मंदिराच्या आजूबाजूला मोठमोठ्या शिळा होत्या आणि समोर शेतात हिरवागार गवताचा गालीच्या पसरल्यागत दिसत होता. इथे जाऊन श्रावणात आमच्या शिक्षकांनी शिकविलेली कविता अगदी गाऊन… आजही ते शब्द तो सूर ते वातावरण डोळ्यांसमोर उभं राहतं. दवाने भिजलेलं लुसलुसणारं गवत पायाला गुदगुल्या करतं आणि वाऱ्याच्या झुळकीबरोबर डोलणारी फुलं नि त्याभोवती पिंगा घालणारी पिवळी, निळी फुलपाखरं… ही कविता ऐकली तरी आजही हे सारं सारं उभं राहतं.
प्रत्येक वयातला, प्रत्येकाचा श्रावण वेगळा.. श्रावणाचं आणि प्रत्येकाचं नातं हे वेगळं ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार कोण कोणत्या चष्म्यातून अनुभवतो तसा श्रावण जाणवतो. तरीही एक मात्र खरं मनभावन श्रावण… कधी प्रियकराच्या रूपात भेटतो तर कधी सख्याच्या कधी कृष्णाच्या बासरीतून बरसतो तर कधी आठवणी ओलावत पार काळजात घुसतो… तो न भेटताच तिला त्याच्या श्रावणी डोळ्यात काही खुणा जाणवतात आणि ती म्हणते…
तुझ्या श्रावणी डोळ्यांत
झुले इंद्रधनुष्य प्रीतीचे
ओल्या पावलांचे ठसे
शोधते मी कधीच
किंवा
फुलवून येते रात्र
रात्रराणीचा पिसारा
स्वप्न सजतो श्रावण
जातो भरून गाभारा
तारुण्याच्या उंबरठ्यावर भेटलेला श्रावण कवितेतून शब्दांच्या माध्यमातून मोबाइलच्या स्क्रीनवर झरू लागतो तेव्हा… त्याच्या मनाची उलघाल वाचता वाचता तिचे डोळे पाणावतात
आणि ती सांगू लागते…
“काही होते मेसेज त्याचे
श्रावणामध्ये आलेले
हिरव्यागार कुरणांमध्ये
ओलेचिंब झालेले…
काही होते मेसेज त्याचे
तिथला श्रावण सांगणारे
फोटो त्यातले निवडक काही
डोळ्यांतून पाणी ओघळणारे
अहो याचे रंग तरी किती… प्रत्येक झाडाच्या पानांचा रंग वेगळा. डार्क लाईट रंगाच्या शेड्स. आणि फुलात तर विचारू नका… हे सर्व पाहून एखाद्या कवयित्रीलाही श्राव चित्रकारच आहे असं वाटतं तेव्हा तिच्या लेखणीतून शब्द कोऱ्या पानावर निथळतात ते असे…
असा रंगारी श्रावण, रंग उधळीत येतो
सृष्टीचा तो चित्रकार हिरव्या रंगाने रेखतो
श्रावण महिना म्हटला की सर्वात पहिले श्रावण महिन्यातील सण म्हटलं की आनंदाला भरतीच येते. देवीची पूजा, मंगळागौर, श्रावण सुरू झाल्यावर येणारे श्रावणी सोमवार, महादेवाची पूजा, श्रावण महिन्याची पवित्र माहिती गीतेतून, आरतीतून दीपाच्या चैतन्यमय प्रकाशात उजळून निघते. श्रावण महिन्यापासून सर्व हिंदू सण जोरात साजरे व्हायला लागतात. सोमवार, मंगळागौरीचा उपवास, श्रावणातील शुक्रवारी जिवतीची पूजा, नागपंचमी, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी असे अनेक सण एकापाठोपाठ एक लागून येतात आणि याचा उत्सव लहान थोरांना प्रेरित करतो. प्रत्येक सासरी नांदणाऱ्या मुलीचं माहेराच्या ओढीने मन होतं
ग. दि. माडगूळकर यांच्या एका गाण्याची आठवण झाल्यावाचून राहत नाही…
फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे…
पंचमीचा सण आला डोळे माझे ओले
भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सण साजरे केले जातात. श्रावणात येणारे सर्व सण शेती व्यवसायाशी निगडित आहेत. म्हणून ते ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. आपल्या संस्कृतीचा तो वारसा म्हणून जतन केले जातात…
उत्तर भारतात जन्माष्टमी मोठ्या आनंदात साजरी करतात आणि सर्व एकत्र येऊन नंदोत्सवाचे आयोजन केले जाते. ह्या उत्सवाला झुलन जत्रा असेही म्हणतात. म्हणूनच काही ठिकाणी याला दोलोत्सव असेही संबोधले जाते. पौर्णिमेच्या दिवशी राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात व स्त्रिया त्यांच्यासंबंधी गीते गातात. हा उत्सव एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत चालतो. कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव करतात. नंदाला पुत्र झाला, असे समजून या दिवशी हळदी-कुंकू मिसळलेले पाणी पिचकारीने उडवतात. अशाप्रकारे सण साजरा केला जातो. अशी ही पावसाची अनेक रूपं कवी कुसुमाग्रजांनी त्यांच्या एका कवितेत वर्णन केली आहेत…
हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला, तांबुस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला…