नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे
जसे हिंदीत ‘शोले’चे स्थान आहे, तसे मराठीत ‘सिंहासन’चे आहे, असे म्हणता येईल. शोले गुन्हेगारी कथेवर असला, तरी त्याने मानवी जीवनातील अनेक अंगांना स्पर्श केला. ‘सिंहासन’ हा अरुण साधूंच्या कादंबऱ्यांवर बेतलेला आणि जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला मराठीतला शोलेच म्हटला पाहिजे. अर्थात सिंहासनचा विषय राजकारण होता. त्यामुळे त्याचा शोलेशी काहीही संबंध नाही, तुलना करता येणार नाही; पण सिनेनिर्मितीचा दर्जा आणि यश यांबाबत दोघांत साम्य होते. मराठीत राजकीय विषयावर जे चित्रपट आले, त्यात क्वचितच गांभीर्य दिसायचे. राजकारणाचे अत्यंत सवंग आकलन, राजकारणी लोकांचे एकांगी चित्रण आणि कसेही करून त्यांना तमाशाच्या फडावर घेऊन जाण्याचा दिग्दर्शकाचा अट्टहास म्हणजे मराठी राजकीय सिनेमा अशी व्याख्या झाली होती. तसा श्रावणी देवधर यांचा १९९८ साली आलेला ‘सरकारनामा’ खूपच उजवा होता; पण त्याने ‘सिंहासन’चे सिंहासन हलवले नाही.
अलीकडे म्हणजे तरीही १४ वर्षांपूर्वी, ‘झेंडा’ नावाचा चित्रपट संगीतकार अवधूत गुप्ते यांनी केला होता. मुंबईतील मराठी माणसाच्या समस्यांवर उपाय म्हणून स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. काही वर्षांनी ठाणे, मुंबई आणि (तत्कालीन) औरंगाबाद मनपात सत्ता मिळाल्यावर, शिवसेना राज्यभर पसरली. कालांतराने बाळासाहेबांनी भारतीय घराणेशाही परंपरेनुसार नेतृत्व मुलाकडे सोपवले. त्यावेळी त्यांचे पुतणे राज ठाकरे हे पक्षात होणाऱ्या घुसमटीमुळे बाहेर पडले. त्यांनी नवा पक्ष काढला.
या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मुख्य आधार असलेल्या मराठी युवकांच्या जीवनात आलेले चढ-उतार, त्यांची झालेली घालमेल याची नोंद करणारा सिनेमा म्हणजे ‘झेंडा.’ प्रमुख भूमिकेत होते-पुष्कर श्रोत्री, संतोष जुवेकर, सिद्धार्थ चांदेकर, चिन्मय मांडलेकर, नेहा जोशी, तेजश्री प्रधान, राजेश शृंगारपुरे, शुभांगी गोखले. ही शिवसेनेशी निगडित चार मराठी तरुणांची कथा. पक्ष फुटल्यावर हे जवळचे मित्र दोन पक्षांत विभागले जातात. त्यांच्या नात्यात तणाव निर्माण होत जातो.
नेत्यांचे खरे व्यक्तिमत्त्व कसे असते आणि प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने कशी त्यांची सोज्वळ, लोकहितकारी आणि उजळ अर्थात खोटी प्रतिमा निर्माण केली जाते, ते या तरुणांना उमगत जाते. त्यांच्यातील मैत्री कमी कमी होत जाते. राजकारणी कसे भोळ्या-भाबड्या युवकांना स्वस्त मजूर म्हणून वापरून घेतात आणि पक्षात एखादे पद निर्माण होते, तेव्हा कसे श्रीमंत व्यक्तीला जवळ करतात, ते पाहून हे तरुण गोंधळतात. एकंदरच राजकारणाची गटारगंगा कळाल्याने टोकाचे निराश होतात. आपल्या नेत्याबद्दलच्या ज्या श्रद्धा, भावना, मनात बाळगल्या त्या कोसळताना पाहून वैफल्यग्रस्त होतात. हे सर्व दाखवणारे एक गाणे प्रसिद्ध लेखक आणि गीतकार अरविंद जगताप यांनी लिहिले होते. अवधूत गुप्ते यांनी संगीत दिलेले हे गाणे त्या काळी खूप गाजले.
जगतापांनी त्या वेळच्या युवकांच्या मनातील द्विधा अवस्था, त्यांना हळूहळू झालेले राजकारणाच्या ओंगळ अंगाचे आकलन, त्यांची मनस्वी निष्ठा, नेमका तिथेच झालेला अपेक्षाभंग हे सगळे एका गाण्यात बसवण्याचे मोठे आव्हान सहज पेलले. ज्ञानेश्वर मेश्रामांच्या आवाजातल्या त्या गाण्याचे शब्द होते-
“जगण्याच्या वारीत मिळेना वाट,
साचले मोहाचे धुके घनदाट,
आपली माणसं, आपलीच नाती,
तरी कळपाची मेंढरांस भीती,
विठ्ठला… कोणता झेंडा घेऊ हाती?”
बाळासाहेबांना राज ठाकरेंनी एकदा ‘विठ्ठल’ म्हटले होते. गीतकाराने तोच धागा पकडून लिहिले, ‘सगळे जगणे एखाद्या वारीसारखे झाले आहे. लोक विचार न करता, केवळ भक्तीत एकामागे एक चालले आहेत. पक्षात घुसलेल्या नव्या लोभी, व्यापारी लोकांनी सगळीकडे स्वार्थाच्या, पैशांच्या मोहाचे धुके पसरवून त्यात अनेकांना ओढून नेले आहे. सगळी नातीगोती विसरली जात आहेत. हे सगळे पटत नाही म्हणून बाहेर पडावे, तर त्या एकट्या मेंढराला इतर मेंढरांची भीती वाटू लागली आहे. (हा संदर्भ कदाचित सेनेचे नगरसेवक स्व. श्रीधर खोपकरांच्या हत्येबाबत असावा.)
लाखो सैनिकांचा झालेला मनोभंग सूचक शब्दात अरविंद जगतापांनी मांडला होता. ते म्हणतात, ‘आजवर आम्ही ज्यांची पालखी अक्षरश: भक्तिभावाने वाहिली, त्यांचा देव तर भलताच होता! जसजसे यश मिळत गेले, तसतसे त्यांना भक्तांशी देणेघेणेच राहिले नाही. ज्यांना आम्ही देव समजत होतो, तो तर दगड निघाला. आम्ही दगडी मूर्तीपुढे दिव्यासारखे जळत राहिलो; पण सगळे व्यर्थ गेले. आपलेच शत्रू झाले. कुणीकडे जावे, कुणामागे जावे, आमच्याच पक्षाचे दोन झेंडे
झालेत, आता कोणता झेंडा हाती घ्यावा, ते कळतच नाही!
“आजवर ज्यांची वाहिली पालखी,
भलताच त्यांचा देव होता,
पुरे झाली आता, उगा माथेफोडी,
दगडात माझा जीव होता,
उजळावा दिवा म्हणुनिया किती,
मुक्या बिचाऱ्या जळती वाती,
वैरी कोण आहे, इथे कोण साथी,
विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती..”
जुनी शिवसेना ही अॅम्ब्युलन्स चालवणारी, भ्रष्ट रेशन दुकानदारांची दुकाने फोडून, तो माल योग्य किमतीत गरजूंना विकून ते पैसे प्रामाणिकपणे त्याच दुकानदाराला नेऊन देणारी होती! चाळीतल्या कुणा मुलीला एखाद्या मवाल्याने छेडले तर त्याला चोप देणारी, बेकारांना नोकऱ्या मिळवून देणारी समाजसेवी संघटना होती. अन्यायाविरुद्ध लढणारी ती जनसेनाच होती. तिचे रूपांतर एका वेगळ्याच, राजकीय महत्त्वाकांक्षेने सैरभैर झालेल्या, पैशामागे धावणाऱ्या संघटनेत झालेले पाहून मराठी समाजच अस्वस्थ होता. अनेक पिढ्यांनी जोपासलेली स्व. बाळासाहेबांबद्दलची श्रद्धा, गणेशोत्सवात एक-दोन महिने निर्माण होणारे मुंबईतले भक्तिमय प्रसन्न वातावरण, कोकणातल्या भाविक माणसाला भावलेले मुंबईतले मोठमोठे गणपती हे सगळे आता व्यर्थ ठरू लागले. इतकेच काय आपले अस्तित्वच एखाद्या बुजगावण्यासारखे झाले आहे, असे त्याला वाटू लागले. सर्व वैध-अवैध आदेश पाळून, स्वत:मागे कोर्ट-कचेऱ्या लावून घेऊन सामान्य शिवसैनिकांच्या पदरी काहीच पडले नाही. ज्या मुंबईला आई मानले, मातृभूमी मानले, तिची काही लोकांनी पैसे कमवायची शेती करून टाकली, वर कुंपणातील शेत खाऊ लागले. हे सगळे असह्य झाल्यावर जगतापांचा युवक जणू स्व. बाळासाहेबांना विचारत होता की, “साहेब, आता मी कोणता झेंडा हाती घेऊ, दोन्ही लेकरे तर तुमचीच ना!”
“बुजगावण्यागत व्यर्थ हे जगणं,
उभ्याउभ्या संपुन जाई,
खळं रितं रितं माझं, बघुनी उमगलं,
कुंपण हितं शेत खाई,
भक्ताच्या कपाळी सारखीच माती,
तरी झेंडे येगळे, येगळ्या जाती,
सत्तेचीच भक्ती, सत्तेचीच प्रीती,
विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती…”
आज तर सेनेचे पुन्हा दोन तुकडे झालेत. राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली आहे.