एखाद्या माणसासोबत असताना आपण चांगल्याप्रकारे त्यांच्याशी संवाद साधू किंवा एखादा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकू. त्यामुळे आपल्या अशा वागण्यामुळे त्या व्यक्तीचे कदाचित आपण ‘महत्त्वाचे’ होतो.
प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ
आम्ही खेळताना दहा-पंधरा मुली सोबत असायचो. त्याकाळचे खेळ म्हणजे लपाछपी, लगोरी, कबड्डी इ. असे खेळ एका-दोघांत खेळून चालत नसायचे. खूप सारेजण एकत्र असले की मजा यायची. आणि मला आठवतंय की त्याकाळी प्रत्येकाच्या घरात दोन-चार मुलं तरी असायची. त्यामुळे खेळणाऱ्या मुलांची कमतरता नव्हतीच शिवाय जागेची कमतरता नव्हती. पण हे सगळे खेळ आम्ही संध्याकाळी खेळायचो. एकदा का वार्षिक परीक्षा झाल्यावर काही काळ निवांत असायचा. आई शाळेत शिक्षिका असल्यामुळे तिला आमच्या परीक्षा संपल्यावरही महिनाभर शाळेत जावे लागायचे. बाबा नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी राहायचे. आमची बैठी घरे होती. घरात उन्हाच्या काहिलीमुळे कधीकधी मी पायऱ्यांवर पाय लांब करून कंटाळवाणी बसलेली असायचे. त्या काळात तशा मुली रिकामटेकड्या नसायच्या. त्यांना घरात प्रचंड कामे असायची. कौटुंबिक रोजची कामे त्यातही उन्हाळ्यातली कुरडया- पापड्या, मसाले वा तत्सम पदार्थ हे याच काळात बनवले जायचे. त्यामुळे खुपदा तसेच एकटे बसून घरात परतावे लागायचे. कधी कधी जवळच राहणारी माझी एक मैत्रीण माझ्याशी येऊन थोडावेळ गप्पा मारत बसायची. आम्हा दोघींचे वय साधारण बारा-तेरा असावे. ती समोरून येताना दिसली की मी, ती दिसलीच नाही असा आव आणून घरात जायचे. मला या गोष्टीचे वाईट वाटायचे की मी तिला कारण नसताना टाळत आहे पण तिला टाळायचे कारण मला इथे सांगायचे आहे.
ती आली की तिच्या गप्पा सुरू व्हायच्या, ज्याच्यात ती रेशनच्या तांदळाचा भाव कसा वाढलाय, त्या धान्यामधला कचरा किती वाढलाय, दळण दळायला टाकायचंय, धुण्याच्या साबणाबरोबर एक साबण फ्री होता ती स्कीम आता बंद झाली आहे, काल अजून एक अंडे हवे म्हणून छोटा भाऊ रडत होता… असले काहीतरी तिच्या गप्पांचे विषय असायचे. मला ते ऐकायचा कंटाळा यायचा. मला कुठेतरी सिनेमाच्या नट- नट्यांबद्दलच्या गोष्टी, सिनेमातील नवीन गाणी, छान छान पुस्तकातल्या गोष्टी, आईने नव्याने केलेले पदार्थ, कपड्यांचे नवीन डिझाइन्स असे काहीतरी गप्पांचे विषय असावेत, असे वाटायचे.
आता मी जेव्हा या घटनेकडे वळून पाहते तेव्हा माझ्या लक्षात येते की त्या बिचारीचे विश्व हे खूपच मर्यादित होते. आई-वडील, भावंड, जेवणाची रोजची सोय यापलीकडे तिचे विश्वच नव्हते. ती जे जगत होती, तेच ती बोलायची आणि परत परत तेच बोलत राहायची. तिच्या- माझ्या भावविश्वात जमीन आस्मानाचा फरक होता. तिचे बाबा कुठेतरी क्लास फोर कामगार म्हणून नोकरीत होते. अत्यल्प पगारात त्यांचे दहा माणसांचे संपूर्ण कुटुंब जगत होते, तर माझे बाबा क्लास वन ऑफिसर होते आणि आई महापालिकेच्या शाळेत शिक्षिका होती. त्यातही लहान कुटुंब, त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती. घरात कामवाली होती. हवे ते मिळत होते. आई खूप सारे छान छान पदार्थ बनवायची. म्हणजे खाऊन पिऊन आम्ही सुखी होतो. शिवाय आई-वडील जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्हाला नाटक-सिनेमाला घेऊन जायचे. कधीतरी हॉटेलमध्ये घेऊन जायचे. एखाद्या दूरच्या प्रेक्षणीय स्थळाला वा जवळपासच्या तीर्थक्षेत्राला आम्ही भेट द्यायला जायचो. हा सगळा प्रकार तिच्या घरी शक्यच नव्हता पण हे कळण्याचे माझे वय नव्हते. त्यामुळे तिला समजून घेऊन ती जे बोलते ते शांतपणे ऐकून घेणे किंवा तिच्यासारखे बोलणे हे दोन्ही मला जमत नव्हते. त्यामुळे तिला मी नकळतपणे टाळत होते.
आपल्याकडे असलेली नकारात्मकता ही कधी आपल्यापर्यंत राहत नाही तर ती नकळतपणे आपल्या बोलण्यातून, आपण वापरणाऱ्या शब्दातून, हावभावांवरून समोरच्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जाणवतेच! आपण खूपदा ठरवून तसे काही करत नाही पण तरीही तसे घडते. आपल्याला आलेला राग-चीड-संताप, दुःख तीव्रतेने बाहेर पडते तितक्याच तीव्रतेने आपण खुशी, आनंदसुद्धा आपोआप व्यक्त होतो.
खरंतर लहानपणापासूनच आपल्याला हे कोणीतरी सांगण्याची गरज आहे की प्रत्येक माणसाचे वागणे, बोलणे, संस्कार हे वेगवेगळे असतात. ते जसे आहेत तसे आपल्याला स्वीकारता आले पाहिजेत किंवा जर आपल्याला त्याच्यात काही सकारात्मक बदल घडवून आणता आले तर ते करता आले पाहिजेत. हे बोलणे किंवा लिहिणे जितके सोपे आहे तितके ते कृतीत आणणे नक्कीच कठीण आहे.
आपल्या समोरचा व्यक्ती ज्या मानसिकतेतून जात आहे ते आपल्या आपल्या खूपदा लक्षातच येत नाही कारण आपण आपल्यातच असतो. आपलाच विचार करत असतो. आपल्याच जगण्याच्या चक्रात फिरत असतो. त्यामुळे समोरचा व्यक्ती काही सांगू पाहतो किंवा सुचवू पाहतो ते आपल्याला समजून घेता येत नाही. जेव्हा आपण माणसांमध्ये असतो तेव्हा संपूर्णपणे त्यांच्या बोलण्याकडे, त्यांच्या वागण्याकडे, त्यांच्या हावभावाकडे पूर्ण लक्ष दिले तर त्यांची घुसमट किंवा आनंद आपल्या लक्षात येईल. आपण चांगल्या प्रकारे त्यांच्याशी संवाद साधू शकू किंवा एखादा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकू. आपल्या अशा वागण्यामुळे त्या व्यक्तीचे कदाचित आपण ‘महत्त्वाचे’ होऊन जाऊ !