कोकणी बाणा – सतीश पाटणकर
श्रावण महिना हा हिंदूंच्या पवित्र चातुर्मासांपैकी एक मानला जातो. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे. उद्या पहिला श्रावणी सोमवार. कोकणातील प्राचीन शिव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी तुफान गर्दी होणार आहे.
कोकणात शिव मंदिरांमध्ये श्रावणात भाविकांची मोठी रीघ लागते. कोकणात अनेक शिव मंदिरे अत्यंत प्रसिद्ध आहे. काही मंदिरे अगदी १०व्या, १२व्या शतकात उभारल्याचा इतिहास आढळतो. पृथ्वीने नवीन गालीचा ओढळ्याचा काळ म्हणजे श्रावण. चातुर्मास म्हणजे केवळ भरपूर सण, व्रतवैकल्य असे नसून त्याचा संबंध जीवनशैलीशी संबंधित आहे. आषाढ महिन्यातील निसर्गाचे रौद्ररूप धडकी भरविणारे असते. या रौद्र रूपाला शांत होण्याचे साकडे घालण्यासाठी, श्रावणात शिवपूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळेच श्रावण हा शिवपूजन, उपासना, नामस्मरण, आराधना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे.
कोकणात अनेक ठिकाणी छोट्या गावांमध्येही अतिशय सुंदर पेशवेकालीन शिव मंदिरे आहेत. आम्रनाथ मंदिर म्हणजेच आताचे अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर. हे पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. शिलाहार राज घराण्यातील मांवाणी राजाच्या काळात इ. स. १०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या २१८ कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या. त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिव मंदिराचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णूगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे. या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते. त्यामुळेच याचा संदर्भ ‘देवघर’ किंवा ‘देवाचे निवासस्थान’ असाही दिला जातो. श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे.
रामेश्वर मंदिर रायगड जिल्ह्यातील चौल भागात आहे. या प्राचीन मंदिराचे प्रमुख देवता भगवान शिव आहे. चौल प्रदेश मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. रामेश्वर मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे पर्जन्य कुंड, अग्निकुंड आणि वायुकुंड हे तीन टाके किंवा कुंड आहेत. मंदिर हेमाडपंत वास्तुशैलीमध्ये बांधले गेले आहे. ज्यामध्ये सभा मंडप, गर्भगृह आणि गोपुरम यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात श्री क्षेत्र कणकेश्वर हे रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळील कणकेश्वर येथे स्थित भगवान शिवाचे एक प्रसिद्ध आणि प्रसिद्ध स्वयंभू मंदिर आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका आणि या तालुक्यामधील धोपेश्वर गाव या गावात धुतपापेश्वर हे मंदिर प्राचीनतेची साक्ष देत उभे आहे. हे समस्त राजापूरकरांचे आराध्य दैवत, श्री देव कोळेश्वर हे दापोली तालुक्यातील कोळथरे या गावात असलेले एक प्राचीन शिव मंदिर आहे. या मंदिरात मुख्य देवता भगवान शिव आहे. हे देवस्थान महाराष्ट्रातील प्राचीन हिंदी शिव मंदिरांच्या श्रेणीतील आहे. गुहागर गावात व्याडेश्वर हे शंकराचे प्राचीन जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे. ‘श्री व्याडेश्वर महात्म्य’ या ग्रंथानुसार व्याडेश्वराचे हे प्राचीन देवालय १२ व्या शतकात बांधले असावे, असे सांगितले जाते. मार्लेश्वर हे शैव पंथीयांचे प्रसिद्ध पूजास्थान आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे मंदिर म्हणजे अक्षरशः स्वर्गच आहे. हे गर्भगृह आणि शिवलिंग निसर्ग निर्मित गुहेत आहे. संगमेश्वर येथील कर्णेश्वर हे एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. मुख्य मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर शंकराच्या मूर्तीचे दर्शन घडते. मंदिरात पांडवाच्या पाच ताटासोबत सहावे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्यावर शंकराची पिंडी आहे. रत्नागिरीजवळच काजळी नदीच्या काठी सोमेश्वर शिवालय आहे. मुंबईतील जोगेश्वरी लेणी ही शिवाला समर्पित लेणी असून तिथे दगडात कोरलेली शिवरूपे पाहता येतात. सप्तेश्वर देवस्थान पंचनदी येथे आहे आणि रत्नागिरीजवळ भावे अडोम या ठिकाणीही आहे.
सागरेश्वर समुद्रकिनारी भगवान शिवाचे विलक्षण आणि प्राचीन सागरेश्वर मंदिर आहे. देवगड तालुक्यातील किंजवडे गावात स्थानेश्वराचे तीनशे वर्षांपूर्वीचे जुने मंदिर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरातील नेरूर गावात श्री देव कलेश्वर प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. शैव, वैष्णव भेद विरहित असलेले हे देवस्थान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. कलेश्वर या शब्दाचा अर्थ कलेचा ईश्वर असा आहे. मालवणपासून ३३ किमीवर असलेल्या मठ गावात बोंबडेश्वर मंदिर आहे. कोकणी पद्धतीच्या साध्या कौलारू मंदिरासमोर चिऱ्यात बांधलेले दोन तलाव आहेत. दोन्हीही तलावांतील पाणी समपातळीत राहावे, यासाठी मधल्या भिंतीत काही छिद्रे ठेवलेली आहेत. तळ्यातून येणाऱ्या या बुडबुड्यांच्या चमत्कारावरून या ठिकाणी स्थापन झालेल्या पिंडीला (शंकराला) ‘बोंबडेश्वर’ हे नाव प्राप्त झाले असावे. निसर्गातील हा चमत्कार पाहण्यासाठी, बोंबडेश्वरला एकदा तरी जायला पाहिजे. पांग्रड गावातील लोकांचे श्रद्धास्थान म्हणजे येथील स्वयंभू महादेवाचे मंदिर होय. अत्यंत सुबक व आकर्षक असे हे मंदिर भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडल्याशिवाय राहत नाही.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)