Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai water supply : मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! पाणीपुरवठा करणारे पाच तलाव भरले

Mumbai water supply : मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! पाणीपुरवठा करणारे पाच तलाव भरले

मुंबई : मुंबईत गेले काही दिवस सातत्याने पावसाच्या धारा सुरु आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे पाचही तलाव भरले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ (Vaitarna dam) आज मध्यरात्री २ वाजून ४५ मिनिटांनी पूर्ण भरले. त्यामुळे आतापर्यंत पाच तलाव पूर्णपणे भरले आहेत.

मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. गेल्याच महिन्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ आज ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ देखील पूर्ण भरले आहे. त्यानंतर तलावाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून ७०६.३० क्युसेक या वेगाने जलविसर्ग सुरू आहे. या धरणाची कमाल पाणी साठवण क्षमता ही १९३,५३० दशलक्ष लिटर (१९३५३ कोटी लीटर) इतकी आहे.

८९.१० टक्के इतका जलसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही १,४४,७३६.३ कोटी लीटर इतकी आहे. आज पहाटे ६ वाजताच्या मोजणीनुसार सर्व ७ तलावांमध्ये मिळून ८९.१० टक्के इतका जलसाठा आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईला पाणीपुरवठा करणारे उर्वरित तलावही लवकरच भरतील, अशी आशा आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीकपात रद्द होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -