सिंधुताईंनी अनेक अनाथ लेकरांना आपल्या पोटाशी धरून, भुकेचा घास मिळवून दिला. अनाथ मुलांना सांभाळून, त्यांना संस्कारक्षम बनवून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी, सिंधुताई यांनी ‘ममता बाल सदन’ या संस्थेची स्थापना १९९४ मध्ये पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावी सुरू केली.
ओंजळ – पल्लवी अष्टेकर
कोकणातील पालगड या रत्नागिरीजवळील गावात २४ डिसेंबर १८९९ रोजी साने गुरूजी उर्फ श्यामचा जन्म झाला. श्यामच्या आईचे नाव यशोदाबाई असे होते. श्याम उर्फ पंढरी हा यशोदाबाईंचा तिसरा मुलगा होता. श्यामची आई ही झाडा-माडांवर, मुक्या जीवांवर प्रेम करणारी एक मृदू मनाची माता होती.
कोकणातील पालगड या गावी हे कुटुंब राहायचे. साने गुरूजींच्या बालपणात हे कुटुंब चांगले सुखवस्तू होते; परंतु नंतर त्यांची आर्थिक स्थिती खालावत गेली. श्यामचे खरे नाव पांडुरंग. त्याची आई प्रेमाने त्याला ‘श्याम’ म्हणायची. श्यामचे वडील गावातील शेतसारा वसूल करून, सरकारकडे जमा करण्याचे काम करायचे. या शेतसाऱ्याचा ठरावीक हिस्सा खोतांना मिळायचा. श्यामचे कुटुंब आधी एकत्र होते; परंतु पुढे सारे विभक्त झाले. श्यामच्या आईने आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले. तिने आपल्या मुलांना श्लोक, ओव्या, अभंग शिकविले. परमेश्वराची भक्ती करावी, चोरी करू नये, खोटे बोलू नये, दुसऱ्यांना होईल तेवढी मदत करावी, निसर्गावर प्रेम करावे, कोणाशी भांडू नये, सर्वांवर प्रेम करावे या गोष्टी तिने आपल्या मुलांना शिकवल्या. पंढरी लहान असताना, त्याची आई त्याला सूर्याला व समुद्राला अर्ध्य देण्यास सांगायची. पंढरीला सर्व काही यावे, असे आईला वाटे. त्याच्या सर्व मित्रांना पोहायला यायचे; पण पंढरीला मात्र पाण्याची खूप भीती वाटायची. त्यामुळे तो पोहायला जाईना. त्यामुळे त्याला त्याचे मित्र भित्रा म्हणून चिडवायचे. एकदा पंढरीच्या आईने त्याच्या मित्रांना त्याला घेऊन पोहायला जायला सांगितले. तिला पंढरी धान्याच्या कणगीमागे लपून बसलेला दिसला, तिने त्याला बाहेर ओढून बदडून काढले. ती त्याला घेऊन मुलांसमवेत विहिरीकडे आली व तिने पंढरीला विहिरीत ढकलून दिले. सुरुवातीला पंढरी घाबरला; पण हळूहळू हात-पाय हलवायला लागला. आता त्याची भीती कमी झाली व पोहणे जमू लागले. त्याचे मित्र त्याच्या आईला सांगत आले की, ‘पंढरी पोहायला शिकला.’ आईने पंढरीला प्रेमाने जवळ घेतले. श्यामच्या वडिलांना खोतीची मिळकत उरली नाही, त्यामुळे श्रीमंती जाऊन गरिबी आली. श्याम अतिशय तीव्र बुद्धिमत्तेचा मुलगा होता. त्याचे प्राथमिक शिक्षण धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दौडाई येथे झाले.
प्राथमिक शिक्षणानंतर पंढरीला पुढील शिक्षणासाठी पुण्याला मामाकडे पाठविण्यात आले; परंतु पुण्यात त्याचे मन रमत नव्हते म्हणून त्याच्या मामाने पुन्हा त्याला पालगडला पाठविले.
जेव्हा पंढरी घरी परत आला, तेव्हा त्याची एकुलती एक बहीण माहेरी आली होती. ती फार आजारी होती. तिला एक लहान मुलगी होती. आजोबा आपल्या नातीवर वैद्यकीय उपचार करत होते, तेव्हा आईने त्या लहान पोरीला सांभाळण्याचे काम पंढरीवर सोपवले. तो तिला सांभाळताना टंगळ-मंगळ करायचा.
ती मुलगी रडायची. आईला त्याचा राग आला. ती म्हणाली, “माझी मुलगी तापाने फणफणत असताना, मी घरात काबाडकष्ट करून, तिची सुश्रुषा करते आहे; पण हा तिला सांभाळण्याचे काम करीत नाही. मी एकटी काय काय करू? या पोराचा काही उपयोग नाही.”
पंढरीने आईचे हे बोलणे ऐकले व त्याला आपल्या वागण्याचे खूप दु:ख झाले. आपली आई सतत कष्ट करते, मात्र आपण तिला मदत करत नाही, याचे त्याला खूप वाईट वाटले. त्याने आईची क्षमा मागितली व या पुढे मी चुकीचे वागणार नाही, आक्काच्या मुलीची काळजी घेईन, असे आईला सांगितले. दुसऱ्यांना मदत करणे, हे जीवनातील मोठे कर्तव्य आहे, ही शिकवण त्याला या प्रसंगातून मिळाली. पुढे श्यामची आई देवाघरी गेली. श्याम उर्फ साने गुरूजींनी लिहिलेले ‘श्यामची आई’ हे पुस्तक अजरामर आहे.
अनाथ मुलांची माय चिंधी उर्फ सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी नवरगाव, वर्धा, महाराष्ट्र येथे झाला. त्यांच्या जन्मानंतर त्यांचे नाव चिंधी (अर्थात फाटलेल्या कपड्याचा तुकडा) असे ठेवण्यात आले. मात्र ही चिंधी पुढे फाटक्या ठिगळांना जोडणारी झाली. सिंधुताई सपकाळ यांच्या वडिलांचे नाव अभिमान साठे. ते गुरं राखायचं काम करायचे. गावात शिक्षणाचा कुणाला गंध नाही, शहरी सुविधांचा स्पर्श नाही. सिंधुताईंच्या आई-वडिलांना सिंधू ही मोठी मुलगी. पाठी एक भाऊ व एक बहीण. त्या पाच वर्षांच्या असताना, त्यांचे वडील त्यांना पिंपरीमधी गावात घेऊन आले. सिंधुताई मुळातच बुद्धिमान, धाडसी. पण परिस्थितीमुळे त्यांना जेमतेम मराठी चौथीपर्यंत शिकता आले. अल्पवयातच त्यांचा विवाह वयाच्या ९ व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. सिंधुताईंना सासरी ढोरासारखी मेहनत करावी लागे. त्यांच्या घरात सारे पुस्तकद्वेष्टे होते. सिंधुताई जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे त्या घरी आणायच्या व उंदराच्या बिळात लपवून ठेवायच्या व क्वचित घरी एकट्या असल्या, तर अक्षरांवरून नजर फिरवायच्या.
सिंधुताईंच्या आयुष्यात पावलोपावली संघर्षाचे प्रसंग आले; परंतु परिस्थितीनुसार त्या त्यावर मात करत आल्या. चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्या पतीने पूर्ण दिवस भरलेल्या सिंधुताईंना बेदम मारून घराबाहेर काढलं व त्यांना गोठ्यात आणून टाकलं. अशा अवस्थेत त्यांची कन्या ममता जन्माला आली. नवऱ्याने हाकलल्यानंतर त्यांना गावकऱ्यांनी हाकललं. नवऱ्याच्या माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या; पण त्यांच्या सख्ख्या आईनेही पाठ फिरवली.
दोन घासांसाठी भीक मागण्याची वेळ सिंधुताईंवर आली. आपल्या मुलीला, ममताला घेऊन त्या परभणी, नांदेड, मनमाड स्टेशनवर भीक मागत फिरायच्या. कितीही खडतर, कठीण परीक्षा बघणाऱ्या गोष्टी घडोत, सिंधुताईंचा प्रवास चालूच राहिला. अनेक अनाथ लेकरांना आपल्या पोटाशी धरून, भुकेचा घास मिळवून दिला. अनाथ मुलांना सांभाळून, त्यांना संस्कारक्षम बनवून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी, सिंधुताई यांनी ‘ममता बाल सदन’ या संस्थेची स्थापना १९९४ मध्ये पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावी सुरू केली. आपली लेक ममता हिला त्यांनी दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन इथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ व बेवारस मुलांना आधार दिला. लहान मुलांना तिथे आधार दिला जातो. लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या जेवण, कपडे यांची सोय संस्थेकडून केली जाते. अशी एकूण १०५० मुले संस्थेत राहिलेली आहेत. अनाथ लेकरांना केवळ निवारा किंवा मायेची सावली देऊन उपयोग नाही, तर ती स्वत:च्या पायावर ताठ कण्याने, कणखरपणाने उभी राहिली पाहिजेत, याकडे सिंधुताईंचा कल होता. त्यासाठी सिंधुताईंनी वसतिगृहे उभारली. अनाथ मुलांवर प्रेमाची पाखर घातली व त्यांना संस्कारक्षम बनविले. गाईंच्या संगोपनासाठी वर्धा येथे गोशाळा उभारली.
सिंधुताईंच्या या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ हा सन्मान प्राप्त झाला. त्यांनी ‘मी वनवासी’ हे आत्मचरित्र लिहिले. त्यांनी आपल्या कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने प्रदेश दौरे केले व आपल्या वाणीने, काव्याने समाजाला प्रभावित केले. दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
सिंधुताईंबद्दल मला एवढेच म्हणावेसे वाटते की,
‘प्रेमस्वरूप आई, वासल्यसिंधू आई’
बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी’.