Wednesday, March 19, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनजनसामान्यांची मराठी

जनसामान्यांची मराठी

मायभाषा – डॉ. वीणा सानेकर

प्रवासातला एक छोटासा प्रसंग; पण तो इतका प्रभावी की, आज त्यावरच बोलावेसे वाटते. मैत्रिणीच्या घरातून बाहेर पडले नि रिक्षा थांबवली. रिक्षामध्ये बसले नि रिक्षावाल्या दादांना विचारलं, ‘‘मराठी समजतं तुम्हाला? म्हणजे पत्ता सांगते नीट .’’

रिक्षावाला दादा लगेच म्हणाला. “जो महाराष्ट्रात राहतो, त्याची भाषा मराठीच. मग तो कुठल्याही जाती-धर्माचा असो, त्याला संवादापुरती मराठी यायलाच हवी.”

रिक्षावाला अस्सल मराठमोळा होता नि मराठीचा अभिमानी होता. आम्हा दोघांना जोडणारा धागा आपल्या भाषेचा होता म्हणून सहज गप्पा सुरू झाल्या.

तो म्हणत होता, “मी माझ्या रिक्षामध्ये बसणाऱ्या प्रत्येक माणसाशी मराठीतच बोलतो. त्या दिवशी एक तरुण मुलगा रिक्षामध्ये बसला. फोनवर कुणाशी तरी अखंड हिंदीत बोलत होता. नंतर फोन थांबला मग माझ्याशी जिथे जायचेय, त्या ठिकाणाचे, रस्त्याचे काही तरी बोलू लागला. तो हिंदीतच विचारत होता नि मी मराठीत उत्तरे देत होतो. इतक्यात त्याला त्याच्या आईचा फोन आला. त्याच्या बोलण्यावरून समजले. तो तिच्याशी मात्र मराठीत बोलत होता. त्याला जिथे जायचे होते, ते ठिकाण आले. तो खाली उतरताना मी त्याला म्हणालो, ‘‘मराठीही आपली आईच आहे.”

त्याने पैसे दिले नि तो निघून गेला. मला जे म्हणायचे, ते मी पोहोचवले होते. किती सहज त्या रिक्षावाल्याने सांगितले होते की, आपली भाषा टिकवणे आपल्या हाती आहे. त्याकरिता ती आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाली पाहिजे.

रिक्षावाल्याला मराठीविषयी प्रेम होते. हे तर खरेच, पण मराठीबाबत त्याचा काही एक स्पष्ट विचारही होता. तो पुढे म्हणाला, ‘‘शिवाजी महाराजांनी जे जे स्वराज्याकरिता केले, तेही आम्ही विसरलो आहोत. राज्य आपल्या भाषेतून चालावे, असे त्यांना वाटत होते. आज आपण आपल्या भाषेलाच विसरत चाललो आहोत.” तो तिथेच थांबला नाही. पुढे कौटुंबिक माहिती सांगू लागला. त्याने त्याच्या दोन्ही मुलांना मराठी माध्यमातून शिकवले. दोघांनी खूप चांगले शिक्षण घेतले होते. मुलीचे लग्न मोठ्या कुटुंबात झाले. मराठी माध्यमातून शिकलेली सून मिळाल्याने सासरचे खूप खूश आहेत, कारण त्यांच्या घरात मुलांचे शिक्षण इंग्रजीत झाले आहे.

रिक्षावाल्या दादांची मुले कधी- कधी विचारतात की, तुम्ही आम्हाला मराठी माध्यम शाळेत का घातले? तेव्हा दादा उत्तर देतात, ‘‘त्यामुळे तुमचे काही नुकसान झाले आहे काय?”

त्या दिवशी भेटलेल्या रिक्षावाल्या दादांनी हे मनावर ठसवले की, त्यांच्यासारखी साधी- सामान्य माणसेच मराठी जगवतील, यात शंका नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -