दी लेडी बॉस – अर्चना सोंडे
उत्तर प्रदेशातील बरेली या छोट्याशा शहरात लहानाची मोठी झालेली ती मुलगी आकाशातील विमान पाहून, इतर मुलांसारखी आनंदाने टाळ्या वाजवायची. पुढे तीच मुलगी विमानातील हवई सुंदरी बनते. दुर्दैवाने कोरोना काळात तिची नोकरी जाते. निराश झालेल्या याचिकाला आईची जुनी डायरी मिळते. त्या डायरीने तिच्या आयुष्याचा उद्योजिका म्हणून अध्याय लिहिला जातो. हा उद्योग अध्याय आहे-याचिका चोप्रा यांचा.
याचिका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढली. तिने बरेली येथील बिशप कॉनरॅड सीनियर सेकेंडरी स्कूलमध्ये १० वी पर्यंत शिक्षण घेतले. तिचे कुटुंब १९९९ मध्ये पुण्यात आले. तिने हचिंग्ज हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला, जिथे तिने २००१ मध्ये १२ वी पूर्ण केली. त्यानंतर तिने वाडिया कॉलेजमधून बी कॉम केले. त्यानंतर एका नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेतून तिने मानव संसाधन (एचआर) विषयात एमबीए केले. पुढे तिने पुण्यातील एका वित्तीय कंपनीच्या एचआर विभागात सुमारे एक वर्ष काम केले.
काही काळानंतर याचिकाला तिची नोकरी नापसंत वाटू लागली. सदर नोकरी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीशी संबंधित होती. मात्र याचिकाला संप्रेषण आणि प्रशिक्षणाशी संबंधित काही तरी करण्यात स्वारस्य होते, जे एचआरमध्ये समाविष्ट होते; पण त्या तत्कालीन कंपनीमध्ये तिला करता येत नव्हते.
एके दिवशी २०११ मध्ये, भारतीय वाहतूक कंपनीमध्ये काम करणाऱ्या तिच्या मावशीने तिला एअर इंडियामध्ये हवाई सुंदरीच्या नोकरीसाठी मुलाखत देण्यास सांगितले. ती नोकरीसाठी एवढी काही उत्सुक नव्हती; पण एचआर नोकरीवर ती खूश नसल्यामुळे, तिच्या कुटुंबीयांनी तिला मुलाखतीस जायला सांगितले. दुर्दैवाने तिला एअर इंडियामध्ये नोकरी मिळाली नाही; परंतु तिला जेट एअरवेजमध्ये हवाई सुंदरी म्हणून नियुक्त करण्यात आले. तिथे तिने मुंबईत सुमारे एक वर्ष काम केले. २०११ मध्ये, ती दुबईमध्ये एमिरेट्समध्ये सामील झाली. ही नोकरी तिला खूप आवडली. आलिशान हॉटेल्समध्ये राहणे, लॉस एंजेलीस आणि दुबईदरम्यान फ्लाइटमध्ये प्रवास करणे ही तिची दैनंदिनी होती. अनेक सेलिब्रिटी आणि उद्योजकांना भेटणे सहज शक्य असायचे. हे आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होते, असे याचिकाला वाटते.
दरम्यान २०१९ मध्ये, तिने गोव्यात टूर आणि ट्रॅव्हल व्यवसाय चालवणाऱ्या रे वाझसोबत लग्न केले. २०१९च्या सरत्या वर्षात कोरोनाने जगभर थैमान घालण्यास सुरुवात केली. अवघ्या जगात लॉकडाऊन झाले. उद्योग डबघाईस आले. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या. पहिली कुऱ्हाड हवाई वाहतूक कर्मचाऱ्यांवर पडली. याचिका पण यातून सुटली नाही. ८ जुलै २०२० रोजी या महामारीच्या काळात तिला तिच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची माहिती देणारा ई-मेल आला. त्यावेळी याचिका पतीसोबत गोव्यात राहत होती. ई-मेल वाचून तिला धक्काच बसला. आपल्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले, हे मान्य करायला तिला दोन-तीन दिवस लागले. या दुःखात अजून एक भर म्हणजे तिची आईसुद्धा निर्वतली. याचिका आतून पुरती तुटली होती. विश्रांती घेण्याची ही एक चांगली संधी आहे. असे सांगत याचिकाच्या पतीने तिला सावरण्याचा प्रयत्न केला. याच सुमारास गोव्यातील बारदेझ येथे घर साफ करत असताना, तिला तिच्या आईची जुनी डायरी सापडली, ज्यामध्ये लोणच्याच्या सर्व पाककृती होत्या. या पाककृतीचा वापर करत, तिने घरगुती लोणचे तयार केले.
तिच्या घरच्यांना लोणचे फार आवडले. आपण लोणच्याचा व्यवसाय सुरू केला तर… तिच्या डोक्यात कल्पना आली. पतीने तिला प्रोत्साहन दिले. एप्रिल २०२१ मध्ये, गोव्यातील पर्वरी येथील तिच्या घरातून २०,००० रु. गुंतवून तिने लोणच्याचा व्यवसाय सुरू केला. तिने लोणच्यासाठी काही भांडी आणि साहित्य खरेदी करण्यासाठी हे पैसे गुंतवले आणि तिचे पहिले उत्पादन बनवले-मिरचीचे लोणचे. आपल्या ब्रँडला ‘सीरका’ असे नाव दिले. आज ती दर महिन्याला सुमारे १ लाख रुपये कमावते. याचिका घरूनच काम करते. सुरुवातीला याचिकाने इन्स्टाग्राम पेज सुरू केले आणि कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना मोफत लोणचे देऊ केले. “मला खात्री होती की, जर लोकांना ते आवडले, तर ते आणखी ऑर्डर करतील. ग्राहकांना आकर्षित करण्याची माझी रणनीती होती आणि ती कामी आली,” याचिका सांगते. काही महिन्यांत विक्री हळूहळू वाढत गेली. लोक याचिकाच्या उपक्रमासाठी आणि चवदार लोणच्यासाठी तिचे कौतुक करत होते. शिवाय साहित्य खरेदी करण्यापासून ते बनवण्यापर्यंत आणि ऑर्डर पूर्ण करण्यासाठी ते पॅक करण्यापर्यंतच्या प्रत्येक कामाचा ती आनंद घेत होती. एका ग्राहक प्रदर्शनात तिला काही तासांत ६० जार विकण्यात यश आले, तेव्हा तिला मोठा ब्रेक मिळाला. हा तिच्यासाठी उत्साहवर्धक क्षण होता. त्यामुळे तिने लोणच्याच्या आणखी विविध प्रकारांवर प्रयोग करायला सुरुवात केली. याचिका आता आठ प्रकारचे लोणचे तयार करते. गाजर, मिरची, फ्लॉवर, वांगी, लसूण, आंबा, टोमॅटो आणि लिंबू. ते १०० ग्रॅम (१२५ रुपये किमतीचे) आणि २०० ग्रॅम (२७५ रुपये किमतीच्या) जारमध्ये येतात. ही सारी उत्पादने त्यांच्या वेबसाइटवर तसेच अमेझॉनवर उपलब्ध आहेत. पावसाळ्यात तिला अधिक ऑर्डर मिळतात. तिची उत्पादने सहा महिने ते एक वर्ष टिकू शकतात. सुरुवातीच्या काळात ग्राहक फोन आणि व्हॉट्सॲपद्वारे ऑर्डर देत असत. एक दिवस याचिकाच्या भावाने तिला कॉल केला की, त्याच्या एका सहकाऱ्याने ऑर्डर दिली नाही, कारण त्याला सीरकाची वेबसाइट सापडली नाही. तसेच अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवर सुद्धा ती उत्पादने सापडली नाहीत. तेव्हा याचिकाला वेबसाइटचे महत्त्व समजले. तिने लगेच एक वेबसाइट सुरू केली. तिचे दोन लहान भाऊ रेस्टॉरंट्स चालवतात आणि याचिकाला व्यवसाय चालवण्यासाठी टिप्स देतात. तिने वेबसाइट लाँच केल्यानंतर विक्री ४५ टक्के वाढली. आता ९० टक्के ऑर्डर तिच्या वेबसाइटवरून येतात आणि उर्वरित अमेझॉन, फोन कॉल्स आणि व्हॉटसअॅपवरून येतात.
सप्टेंबर २०२१ मध्ये, तिला अमिरातीकडून नोकरीची ऑफर देणारा फोन आला. याचिका द्विधा मनःस्थितीत होती, कारण ती असा व्यवसाय चालवत होती, जो अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय बनू शकतो किंवा एक दिवस बंद होऊ शकतो आणि दुसरीकडे तिच्या आवडीच्या नोकरीची ऑफर होती; पण तिने तिचा व्यवसाय निवडला; कारण व्यवसाय तिच्या आईला श्रद्धांजली आहे. शिवाय याचिकाला आयुष्यात पहिल्यांदाच जाणवले की, ती स्वतः काही करू शकते. तिला स्वतःचा आनंद आणि अभिमान वाटत होता. त्यामुळे तिने एअरलाइनची संधी नाकारली.
याचिका एक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याची योजना आखत आहे, जिथे ती वंचित समुदायातील महिलांना रोजगार देऊ शकेल आणि मोठ्या स्तरावर व्यवसाय चालवू शकेल.
एक हवाई सुंदरी लोणच्यासारख्या घरगुती व्यवसायात उतरते. महिन्याला लाखांची उलाढाल करते. इतकेच नव्हे तर इतर वंचित महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा विचार सुद्धा करते. हे सारं एक सक्षम अशा लेडी बॉसचे लक्षण आहे.