मुंबई : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘धर्मवीर-२’ (Dharmaveer 2) चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी ‘धर्मवीर-२’ चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार येत्या ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) पूरजन्य (Flood Situation) परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला होता. हा चित्रपट आता कधी प्रदर्शित होणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर आता निर्मात्यांनी प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुक्ता आणखी वाढली होती. तसेच प्रदर्शनाची तारीख पुढे गेल्यामुळे चित्रपटगृहांकडून विचारणा होत होती, अनेक ग्रुप बुकिंगसाठी थांबले होते. त्याचबरोबर परदेशातून प्रदर्शनासाठीही विचारणा होत होती. त्यामुळे सध्याची पावसाची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पाहता दीड महिन्याचा अवधी घेऊन हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता धर्मवीर २’ हा चित्रपट येत्या २७ सप्टेंबर रोजी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार असल्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
दरम्यान, आनंद दिघे यांच्या राजकीय आणि समाजकारणांवर हा चित्रपट आधारीत आहे. या चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. पहिल्या भागात त्यांचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्या भागात नेमके काय दाखवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.