टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल
महाराष्ट्राची हास्यजत्रेमधून आपल्या सूत्रसंचालनाने प्रेक्षकांची मने जिंकणारी, अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. भरतनाट्यम् नृत्यात विशारद असलेल्या प्राजक्ताचा ‘फुलवंती’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पुण्यातील समर्थ विद्यालयामध्ये प्राजक्ताचे प्राथमिक शिक्षण झाले. पुण्यातील संत महाविद्यालयातून तिने ११ वी, १२ वी केले. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून भरतनाट्यम् हा नृत्याचा विषय घेऊन बी. एम. ए. केले. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये प्रत्येक ठिकाणी तिने सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला होता. त्या व्यतिरिक्त एक हजार ते दोन हजार नृत्याचे कार्यक्रम तिने केले. जवळपास सर्वच नृत्याच्या स्पर्धेत तिने भाग घेतला होता. आतापर्यंत तिच्याकडे नृत्यासाठी पाचशेहून जास्त ट्रॉफीज आहेत.
तिचा पहिला टर्निंग पॉइंट म्हणजे ललित कला केंद्र. जिथून तिने भरतनाट्यम् नृत्यात विशारद पूर्ण केले. तिथे तिला जाणीव झाली की, नृत्यात ती करिअर करू शकते. दुसरा टर्निंग पॉइंट म्हणजे ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे तिला तिच्यातल्या अभिनेत्रीचा शोध लागला. त्यानंतरचा तिचा टर्निंग पॉइंट म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा.’ या कार्यक्रमातून तिच्या सूत्रसंचालनाचे कौतुक होऊ लागले. आता ती निर्मिती क्षेत्रात उतरलेली आहे. ‘फुलवंती’ हा तिचा चित्रपट लवकरच येणार आहे. नृत्य, अभिनय, सूत्रसंचालन, निर्मिती असे चार ठळकपणे टर्निंग पॉइंट ती मानते.
नृत्याची आवड असल्याने, नर्तिकेची मध्यवर्ती भूमिका करण्याची तिची खूप दिवसांपासून इच्छा होती. ती इच्छा ‘फुलवंती’ कादंबरीचे हक्क घेतल्याने पूर्ण झाली. त्यावर चित्रपट निर्मिती करण्याचे तिने ठरविले आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेला दहा वर्षे पूर्ण झाली, प्रेक्षक अजून त्या मालिकेला व प्राजक्ताच्या अभिनयाला विसरले नाही.
महाराष्ट्राची हास्यजत्रेचा अनुभव कसा होता, असे विचारल्यावर ती म्हणाली की, मला कधीच वाटले नाही की, मी निवेदिका आहे. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमुळे मला निवेदिका ही ओळख मिळाली. लोकप्रियतेचा उच्चांक मी पाहू शकले, आर्थिक स्थैर्य दिले. पुण्य कमाईचे साधन झाले, कोरोनाच्या काळात आम्ही लोकांना हसवू शकलो. या कार्यक्रमात येणाऱ्या मान्यवरांकडून देखील आमचे कौतुक होते, असाच निखळ विनोद करत राहणे आवश्यक आहे, असे ती सांगते. परदेशात गेल्यावर तेथील प्रेक्षकांनी आम्हांला डोक्यावर घेतले. प्राजक्ताचे ‘फुलवंती’, ‘भिशी’ हे आगामी चित्रपट आहेत. तिला येणाऱ्या आगामी चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा!