Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्स‘आकाशवाणी सिडनी’ तीन पिढ्यांची वाटचाल

‘आकाशवाणी सिडनी’ तीन पिढ्यांची वाटचाल

फिरता फिरता – मेघना साने

सिडनीतील मराठी माणसांनी मराठी कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी, निर्माण केलेल्या रेडिओ स्टेशनची वाटचाल १९९७ सालापासून जोमाने सुरू आहे. २०२२ साली मी ऑस्ट्रेलियाला गेले होते, तेव्हा तिथे ‘आकाशवाणी सिडनी’ या रेडिओ स्टेशनचा रौप्यमहोत्सव साजरा होत होता. बघता बघता ‘आकाशवाणी सिडनी’ला २५ वर्षे झाली? २००६मध्ये देखील मी हे रेडिओ स्टेशन पाहिले होते. आता त्याचे रूप खूपच बदलले होते. एका सुंदर इमारतीतील अनेक दालनांनी सुसज्ज अशा त्या रेडिओ स्टेशनमध्ये मी प्रवेश केला आणि रेकॉर्डिंग रूममध्ये डोकावले, तर रेडिओ स्टेशनच्या अध्यक्ष सुरुची लिमये यांनी होळीनिमत्त तयार केलेला कवितांचा गमतीदार कार्यक्रम सुरू होता. सुरुची यांचे लाईव्ह निवेदन सुरू होते.

“बसा ना. तुमची पण कविता यात घेतली आहे.” माईक ऑफ करून सुरुची मला म्हणाल्या.
“थोडा वेळ मी कार्यक्रम ऐकला. एक से एक कवी आपल्या कविता परजत होते. एकूण येथेही मराठी साहित्य छान बहरत आहे हे कळले. सिडनी आणि मेलबर्न येथील कवींना सुंदर व्यासपीठ मिळाले, हे पाहून आनंद झाला.”

मला या आकाशवाणीचे प्रणेते डॉ. पुरूषोत्तम सावरीकर यांची मुलाखत घ्यायची होती. माझ्यासोबत सिडनीतील प्रसिद्ध नाट्यकलावंत नीलिमा बेर्डे होत्या. एकेका दालनातील यंत्रणा दाखवत, त्यांनी मला डॉ. सावरकरांच्या केबिनमध्ये नेले.
साधारण १९८० पासून महाराष्ट्रीयन लोक ऑस्ट्रेलियात येऊन, स्थायिक होऊ लागले. त्यावेळच्या परिस्थितीवर डॉक्टरांशी आमची चर्चा सुरू झाली. मराठी लोक येथे आले, तेव्हा त्यांना सुबत्ता वाटत होती खरी, पण महाराष्ट्रापासून, आपल्या भाषेपासून, संस्कारांपासून वेगळे झाल्यामुळे हरवल्यासारखं वाटत होतं. जवळ कोणी नातलग नाहीत, शेजारी-पाजारीही मराठी नाहीत, संध्याकाळी ५ वाजता बाजारपेठ बंद होते. स्थानिक रहिवासी तर संध्याकाळी पबमध्ये जाऊन बसतात. तेथे ड्रिंक वगैरे घेत त्यांचा वेळ मजेत जातो. पण महाराष्ट्रीयन लोकांना ते वातावरण रूचत नाही. एकूणच आपल्या भाषेची, संस्कारांची सर्वांना ओढ वाटू लागली. मराठी भाषिकांना जिथे एकत्र येता येईल, अशी जागाच नव्हती.

काही मित्रमंडळींनी एकत्र येऊन, एक मंदिर बांधले. देवधर्मासाठी लोक शनिवार, रविवार तेथे फेरी मारू लागले आणि एकमेकांना भेटू लागले. त्यानंतर एक मराठी मंडळही स्थापन झाले. १९९६ सालची गोष्ट. डॉ. सावरीकर दवाखान्यातून घरी जाताना गाडी चालवत होते. तेव्हा त्यांनी गाडीत सहजच रेडिओ लावला, तर तेलुगू भाषेतील गाणे ऐकू येऊ लागले. भारतीय भाषेतील कार्यक्रम ऑस्ट्रेलियातील रेडिओत ते प्रथमच ऐकत होते. त्यांनी आपल्या मदतनीसाला याबद्दल माहिती काढायला सांगितले. तेव्हा असे कळले की, ऑस्ट्रेलियन सरकारचे एक ‘मल्टी कल्चरल डिपार्टमेंट’ आहे. त्यांच्या परवानगीने इतर भाषिक रेडिओ केंद्र चालवता येऊ शकते. खरं तर आपले राष्ट्रीय धोरणे स्थलांतरित लोकांपर्यंत पोहोचविता यावीत, यासाठी सरकारने काढलेली ही शक्कल होती. डॉ. सावरीकर यांनी आपल्या मित्रांशी बोलून मराठी रेडिओ सुरू करण्याकरिता लागणारे २५० डॉलर्स भरून सरकारच्या खात्यात नोंदणी केली. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून, सिग्नेचर ट्युनसह मराठी रेडिओ स्टेशन सुरू झाले. १९९७ पासून हे रेडिओ स्टेशन आजतागायत सुरू आहे.

पहिल्या दहा वर्षांत तेथे स्थलांतरित झालेल्या मराठी लोकांच्या ज्या गरजा होत्या, त्याप्रमाणे कार्यक्रम तयार केले गेले. महाराष्ट्राशी संपर्क तुटला होता म्हणून पुण्याच्या रेडिओवरील बातम्या ‘आकाशवाणी सिडनी’वरून प्रक्षेपित करण्याची योजना केली. याबाबतीत पुणे केंद्राच्या निवेदिका उज्ज्वला बर्वे यांनी बरीच मदत केली. दै. सकाळचे लेखक आनंद देशमुख यांचे ‘विरंगुळा’ हे सदर सुरू केले. त्यामुळे लोकांना मनोरंजन मिळू लागले. तसेच ‘आकाशवाणी सिडनी’ने सर्व महाराष्ट्रीयन सणांवर आधारित कार्यक्रम सुरू केले. लोक आपल्या संस्कृतीशी जोडले गेले. लोकांना ‘आकाशवाणी सिडनी’ आपली वाटू लागली.

त्या पुढील दहा वर्षांत आयटी शिकलेली तरुण मुले ‘आकाशवाणी सिडनी’शी जोडली गेली. त्यांनी आकाशवाणीची वेबसाइट सुरू केली, ॲप सुरू केले. ॲपमुळे आता ‘आकाशवाणी सिडनी’ कोणत्याही देशात रसिकांना ऐकता येऊ लागला. तांत्रिक सुधारणा खूप झाल्या आणि या केंद्राची प्रगती झाली. ‘आकाशवाणी सिडनी’ आता तरुणांचीही झाली. त्यामुळे त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठीही कार्यक्रम होऊ लागले. डेटिंग प्रॉब्लेम, रेज्युमे कसा लिहावा, इंटरव्यू कसा द्यावा हे विषय कार्यक्रमात येऊ लागले.
त्यापुढील पाच वर्षांत म्हणजे सध्या ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या मराठी मुलांना मराठीशी कसे जोडून घेता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तेथील मुलांना मराठी यावे म्हणून पालक स्वतः मराठी शिकवतात किंवा तेथे शनिवार, रविवार चालणाऱ्या मराठी शाळेत टाकतात. ही मराठी शिकलेली मुलेदेखील ‘आकाशवाणी सिडनी’त येऊन आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नाटके, गाणी, कविता सादर करणे असे कार्यक्रम करत आहेत. भारतातून ऑस्ट्रेलियात कार्यक्रमानिमित्त आलेले कलाकार ‘आकाशवाणी सिडनी’ला एकदा तरी भेट देऊन जातात. २००६ मध्ये ‘मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड’ (MASI) आणि ‘महाराष्ट्र मंडळ, मेलबर्न’ यांसाठी ‘गप्पागोष्टी’ हा कार्यक्रम सादर करण्यासाठी मी व दूरदर्शन कलाकार जयंत ओक आमंत्रित होतो. तेव्हा आमचीही मुलाखत ‘आकाशवाणी सिडनी’वर झाली होती. तेव्हाचे दोन खोल्यांचे छोटेसे रेडिओ स्टेशन मला आठवले. आता या ‘आकाशवाणी सिडनी’चे भव्य रूप पाहून मला आनंद झाला. आठवड्यातून दर रविवारी सिडनी वेळेनुसार सकाळी ११ वाजता आणि दर मंगळवारी रात्री ८ वाजता एक तासाचा कार्यक्रम सादर होत असतो. गेल्या अनेक वर्षांत काव्य, कथा, नभोनाट्य, संगीत, स्थानिक आणि भारतातून आलेल्या अनेक मान्यवरांच्या मुलाखती, टॉक-बॅक अशा तऱ्हेचे वैविध्य पूर्ण कार्यक्रम सादर झाले आहेत आणि पुढे होत राहतील.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -