एकेकाळचे खास मित्र असलेले पुढे कट्टर विरोधक, दुश्मन बनतात, असे आपण कथा-कादंबऱ्यात वाचले, सिनेमात पाहिले. पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकेकाळच्या दोस्तीचा व राजकीय प्रवाहात अलीकडच्या काळात बनत चाललेल्या कट्टर दुश्मनीचा प्रयोग रंगू लागला आहे. महाराष्ट्र हे एक पुरोगामी राज्य आहे. येथे राजकारणात टीका करताना, आरोप-प्रत्यारोप करताना एक तारतम्य बाळगले जाते. राजकीय चिमटे काढले जातात. पण रक्तबंबाळ होणार नाही, याची काळजीही घेतली जाते. राजकारणात परस्परांचे वस्त्रहरण करतानाही अपशब्द टाळले जातात. सभागृहात तसेच सभागृहाच्या बाहेर बोलतानाही एकेरी असा उल्लेख केला जात नव्हता. अगदी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेदेखील खासगी आयुष्यात जवळचे मित्र असणाऱ्या व राजकारणात तितकेच एकमेकांचे राजकीय शत्रू असणाऱ्या शरद पवारांचा तर जाहीर सभांमध्ये भाषणे करताना ‘मैद्याचे पोते’ असा उल्लेख करत असत. पण या टीकेनंतरही पवार व ठाकरेंच्या राजकीय व्यासपीठावरील कटुता कमी-जास्त झाली नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा राजकीय संयम ढासळला जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यांनी भाजपावर नेहमीप्रमाणे आगपाखड करताना ‘एक तर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन’ अशी भाषा महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत वापरली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या, प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुखी अशी भाषा शोभत नाही. उलटपक्षी यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला चुकीचा पायंडा पडण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठावर संघर्ष करून सिद्ध केले आहे. बॉटम टू टॉप अशी वाटचाल करत त्यांनी जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.
याउलट नाक्यावर उभे राहून छप्परीगिरी करणाऱ्याला शोभणारी भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंची वाटचाल स्वकर्तृत्वावर झालेली नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाया रचलेल्या व शिवसैनिकांच्या मदतीने वाढविलेल्या शिवसेना संघटनेचे व्यासपीठ सहजपणे उपलब्ध झालेे आहे. त्यांनी आयुष्यात कधीही संघटनावाढीसाठी शिवसैनिकांसारखे कष्ट केले नाही. संघटनाबांधणीही केली नाही. कष्टाने मिळविलेल्या गोष्टींची किंमत असते. सहजासहजी मिळालेल्या गोष्टींना मोल नसते, तशीच अवस्था आज उद्धव ठाकरेंची झाली आहे. शिवसेना-भाजपा युती होण्यामागे हिंदुत्वाची एक झालर होती. गोपीनाथ मुंडे-प्रमोद महाजन यांच्या विशेष पुढाकारातून व प्रयत्नांतून देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आशीर्वादाने व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वावरील विशेष प्रेमातून शिवसेना-भाजपा युती अस्तित्वात आली व पुढे ही युती अडीच दशके टिकली. भाजपा ही शिवसेनेमुळे वाढली असल्याचा आरोप उबाठांकडून करण्यात येत असला तरी युतीच्या प्रक्रियेत तसेच युती टिकविण्याच्या प्रक्रियेत, हिंदुत्वाची भूमिका मांडणे व तिचा विस्तार करणे या प्रक्रियेत उबाठा कुठेही नसल्याने त्यांना युती व युतीमुळे झालेल्या नफा-नुकसानीबाबत बोलण्याचा काडीमात्र अधिकार नाही. उबाठांना युती टिकवता तर आली नाहीच, पण तोडण्याचे पातक मात्र उबाठांच्या खात्यात जमा झालेे. फडणवीसांवर टीका करणाऱ्या उबाठांचे राजकीय कर्तृत्व तरी असे काय आहे?
ज्यांनी संघटना वाढीपासून शालेय वयापासून परिश्रम केले. संघटना वाढीसाठी महाराष्ट्र पिंजून काढले. त्या राज ठाकरेंसारखा स्वत:चा चुलत भाऊ पक्ष सोडून गेला, ते केवळ उद्धव ठाकरेंमुळेच. याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ उबाठांवर आली आहे. त्यांचा स्वभाव पाहता ते आत्मपरीक्षण करणार नाही, याची खात्री आहे. ज्यांनी दुसऱ्यावर टीका करण्यात, दुसऱ्यांचे दोष काढण्यातच समाधान मानलेे, त्यांना स्वत:च्या चुका कधीही दिसत नाहीत. ज्या बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली, वाढविली, ती शिवसेना व शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही उबाठांना सांभाळता आले नाही. उबाठांच्या स्वभावामुळेच शिवसेना पक्षात फूट नव्हे, तर मोठे खिंडार पडले, हे कोणालाही नाकारता येणार नाही. धर्मवीर आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेले व शिवसेनाप्रमुखांचा शब्द हा अंतिम प्रमाण हे तत्त्व आयुष्यभर जोपासणारे एकनाथ शिंदे हे आपल्या ४० सहकाऱ्यांसह उबाठांपासून दूर झाले. हे का घडले याचा शोध घेत स्वत:च्या चुका सुधारण्याऐवजी खोके या एकमेव शब्दाचा जपमाळ करण्यात उबाठा व त्यांच्या सरदारांनी समाधान मानले आहे.
बाळासाहेबांनी हयातभर ज्या काँग्रेसचा आयुष्यभर तिरस्कार केला, त्याच बाळासाहेबांचे पुत्र म्हणून मिरवणाऱ्या उबाठांनी सत्तेसाठी काँग्रेसशी जवळीक केली. बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या शरद पवारांचा राजकीय राग केला, त्याच पवारांशी सत्तेसाठी जवळीक केली. सत्तेसाठी हिंदुत्व सोडल्यामुळे एकनाश शिंदेंसह अन्य ३९ आमदारांनी, पदाधिकाऱ्यांनी, खासदारांनी उबाठांची साथ सोडली. त्यामुळे सत्ता गेली. सोबतीला जे आहेत, ते हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाहीत. सत्ता मिळेल याची खात्री नाही, मिळाली तरी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक असल्याने तेही पुन्हा मिळणार नाही, हे उघड झाल्याने उबाठांचा राजकीय संयम ढासळत चालला आहे. त्यातून ‘एकतर तू नाहीतर मी’ अशी धमकीवजा भाषा उबाठांकडून वापरली जाते. अर्थात अशा पोकळ धमक्यांचा भाजपा व फडणवीसांना काहीही फरक पडणार नाही. अशा टपोरी भाषांचा समाचार घेण्यास गृहमंत्री फडणवीस सक्षम आहेत. भाजपाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी उबाठांचा खणखणीत समाचार घेतला आहे. फडणवीस हे महाराष्ट्र भाजपाचे नंबर एकचे नेते आहेत. प्रगल्भ विचारसरणीचे, व्यापक बुद्धिमत्तेचे आणि महाराष्ट्राच्या तळागाळातील समस्यांची जाण असणारे नेते आहेत. कार्यकर्ते व पदाधिकांऱ्याना समजून घेणारे नेते आहेत. संघटना वाढविणारे आहेत. यापैकी उबाठांकडे काहीही नाही, उलट त्यांच्या कार्यकाळात संघटना फुटली, सहकारी सोडून गेले आणि त्यांनी हे नैराश्य एकेरी भाषेतून व्यक्त करावे, याचाच अर्थ त्यांची राजकीय वाटचाल चुकीच्या दिशेने सुरू झालेली आहे. यात बदल न झाल्यास वाचाळवीर उबाठांची नजीकच्या भविष्यात कोणीही गांभीर्याने दखल घेणार नाही.