एक हजाराहून अधिक लोकांना वाचवण्यात यश, तर २४० लोक अजूनही बेपत्ता
नवी दिल्ली : राज्यासह देशभरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. देशात काही ठिकाणी तर मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यातच केरळमधील (Keral) वायनाडमध्ये (Wayanad) झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. भूस्खलन होऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. २९ जुलै रोजी रात्री उशिरा केरळमधील वायनाड येथे जमीन खचली, अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. मात्र, अद्याप २९ मुलं बेपत्ता आहेत.
अत्यंत मुसळधार पावसामुळे मंगळवारी पहाटे वायनाडच्या डोंगराळ भागात भूस्खलन झालं. या दुर्घटनेत किमान ३०८ लोकांचा मृत्यू झाला आहे. २०० हून अधिक जखमी झाले आहेत, तर २४० लोक अजूनही बेपत्ता आहेत. बचाव पथकाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. लष्कराच्या वतीने काही काळासाठी बचाव कार्य थांबवण्यात आलं होतं. थोड्या विश्रांतीनंतर गुरुवारी सकाळी शोध आणि बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आलं. संततधार पावसामुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत.
लष्कराच्या वतीने समन्वयासाठी कोझिकोड येथे ब्रिगेडियर अर्जुन सेगन यांच्यासह कर्नाटक आणि केरळ उपक्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल विनोद मॅथ्यू यांच्या नेतृत्वाखाली कमांड आणि कंट्रोल सेंटरची स्थापना केली आहे. भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल, एनडीआरएफ आणि स्थानिक पोलीस-प्रशासन वेगानं बचावकार्य करत आहेत. बचाव कर्मचारी उद्ध्वस्त घरं आणि इमारतींमधील लोकांचा शोध घेत आहेत, मात्र आजूबाजूला ढिगारा साचल्यानं त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.