मुसळधार पावसामुळे घेण्यात आला निर्णय
सातारा : मुंबईत काही काळ पावसाने विश्रांती घेतली असली तरी राज्यातील इतर भागांत पावसाची जोरदार बॅटिंग (Heavy rainfall) सुरु आहे. विदर्भासह (Vidarbha) पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे नागरिकांना या भागात प्रवास करताना अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात १ ते ५ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा रेड व ऑरेंज अलर्टचा इशारा दिल्याने साताऱ्यातील धबधबे आणि पर्यटनस्थळे (Satara Tourism Places) ५ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जिवीत व वित्तहानी होऊ नये याकरता सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज दिले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
कोणकोणत्या पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी?
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील- लिंगमळा व भिलार धबधबा तसेच सर्व पर्यटनाचे पॉइंट, पाटण तालुक्यातील – ओझर्डे (नवजा) व सडावाघापूर धबधबा, सातारा तालुक्यातील- ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबे व कास तलाव तसेच जावली तालुक्यातील- ऐकीव या धबधब्यांच्या ठिकाणी विशेषतः मान्सून कालावधीत वर्षाविहारासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. ही सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरती बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी काय आदेश दिले?
सदर धबधब्यांच्या ठिकाणी जाणारे मार्ग / रस्ते बंद करण्यात आलेत. पोलीस विभाग व संबंधित गावातील वन हक्क समितीने धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक जाणार नाहीत, तसेच सदर ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये याबाबत दक्षता घ्यावी. पर्यटन स्थळी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त नेमण्यात यावा व आवश्यक त्या ठिकाणी पेट्रोलिंग करावे. पोलीस बंदोबस्तासाठी आवश्यकतेनुसार होमगार्ड विभागाची मदत घेण्यात यावी. आवश्यकता भासल्यास नियमांचा भंग करणाऱ्यांविरुध्द आवश्यक ती कठोर कारवाई करावी, असे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.