मुंबई : मुंबईत स्वत:चे हक्काचे घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र काही वर्षांपासून घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे अवघड होत आहे. अशा घरांच्या वाढलेल्या किमती पाहता सर्वसामान्य लोक म्हाडावर (Mhada) अवलंबून असतात. त्यामुळे म्हाडाकडून दरवर्षी विविध भागात लॉटरी काढली जाते. त्यानुसार म्हाडा यंदा मुंबईत तब्बल दोन हजार घरांची लॉटरी काढणार आहे. त्याचबरोबर कोकण (Konkan) मंडळासाठीही म्हाडा लॉटरीची तयारी करत आहे. त्यामुळे अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार आहे.
मुंबईतील घरांची लॉटरी
मुंबई महामंडळातर्फे काही दिवसांतच लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हाडा गोरेगाव, पवई, विक्रोळी इत्यादी ठिकाणांच्या घरांचा समावेश या लॉटरीमध्ये करणार आहे. या घरांच्या किंमती ३४ लाखांपासून सुरू होणार आहेत. तसेच याबाबत अनामत रक्कम जमा करण्याची प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात येणार आहे. म्हाडा लॉटरीसाठी पूर्णपणे संगणीकृत पद्धतीचा वापर केला जाणार आहे. अशी माहिती मिळत आहे.
कोकण महामंडळाची लॉटरी
कोकण महामंडळाकडून लॉटरीची तयारी करण्यात येत आहे. या लॉटरीसंदर्भात कोकण मंडळाकडून लवकरच बैठक घेतली जाणार आहे. सध्या कोकण मंडळाकडे २ हजार घरे उपलब्ध आहेत. पण लवकरच यामध्ये आणखी घरांची वाढ होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच कोकण मंडळाबरोबरच लवकरच पुणे मंडळाकडूनही लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता म्हाडाच्या लॉटरीकडे लागून राहिले आहे.