नवी दिल्ली: उत्तर भारतासह देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या २४ तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे विविध ठिकाणी पाणी भरल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये बुधवारी झालेल्या पावसामुळे व्हीआयपीसह अनेक भागांमध्ये पाणी भरले. याचा परिणाम अशा झाला की अनेक ठिकाणी जॅम झाल्याची स्थिती निर्माण झाली.
दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाबमध्ये पावसामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिणेतील राज्य केरळमध्ये पावसाने झालेल्या कहरामुळे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी महत्त्वाची बैठक बोलावली.
पावसामुळे दिल्ली जलमय
दिल्ली एनसीआरमध्ये मुसळधार पावसामुळे गुरुवारी अनेक रस्त्यांवर पाणी भरले होते. दिल्ली सरकारने पावसामुळे सर्व शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली. जोरदार पावसामुळे शहरातील मोठा भाग जलमय झाला होता. यामुळे नाल्यात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने दिल्लीच्या लोकांना घरात राहण्याचे तसेच खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवण्याचे सोबतच अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले होते.
ढगफुटीमुळे ५ जणांचा मृत्यू तर अनेक बेपत्ता
हिमाचल प्रदेशात ढगफुटी झाल्याने विविध घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूज एजन्सी पीटीआयच्या रिपोर्टनुसार या घटनेत तब्बल ५० व्यक्ती बेपत्ता आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक घर, पूल, रस्ते पाण्यात वाहून गेले आहेत. हिमाचल प्रदेशात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
पावसामुळे उत्तर प्रदेशात नद्या तुंडुंब भरल्या
उत्तराखंडमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातही पावसाचा कहर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे येथेही अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. तर अनेक नद्या तुडुंब भरून वाहत आहे.
राजस्थान-पंजाबमध्येही रस्त्यांवर पाणीच पाणी
राजस्थानात मुसळधार कोसळणाऱ्या सरींमुळे लोकांना गरमीपासून सुटका मिळाली असली तरी ठिकठिकाणी पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली आहे. सखल भागांतील अनेक ठिकाणी पाणी भरले असून लोकांना याचा त्रास होत आहे. पंजाबमध्येही साधारण असेच चित्र आहे. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत.
वायनाडमध्ये २९१ जणांचा मृत्यू
वायनाडमध्ये झालेल्या भूस्सखलनामध्ये २९१ जणांचा मृत्यू झाला आहे. निसर्गाच्या कहराने केरळमधील तीन गावे जमीनदोस्त झाली.