समाजसेवक दत्ता कांबळे यांचा वाढदिवसानिमित्त उपक्रम
पेण (प्रतिनिधी)- पोलीस हा समाजाचा जागरुक पहारेकरी असतो खरा, परंतु त्याला अनेकदा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. तर बऱ्याचदा त्याला विविध समस्यांशी सामना करावा लागतो. समाजात शांतता राखण्याचे महत्वाचे काम पोलीस करत असतात. तसेच पत्रकारांना सुद्धा एखादी घटना घडल्यास तातडीने घटनास्थळी पोहोचावे लागते. कधी पत्रकारांच्या धाडसी कामाचे कौतुक होते तर कधी दोषही ओढवून घ्यावे लागते. त्यातूनच हल्ले होण्याचे प्रकारही वाढले आहेत.
या सगळ्या फेऱ्यातून जातांना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर उभा राहतो. ही काळजी घेऊन पेणचे समाजसेवक दत्ता कांबळे यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचा पेण पोलीस स्टेशन, वडखळ पोलीस स्टेशन, दादर सागरी पोलीस स्टेशन व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सर्व पोलीस तसेच पेण तालुक्यातील सर्व पत्रकारांचा प्रत्येकी पाच लाखांचा विमा उतरवून मोठे संरक्षण दिले आहे.
शेकडो पोलीस व पत्रकारांना मिळालेल्या संरक्षणाबद्दल आणि या स्तुत्य उपक्रमाबद्दल अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दत्ता कांबळे यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले. समाजसेवक दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पेण येथील सार्वजनिक विद्यामंदिर सभागृहात आयोजित इन्शुरन्स पॉलिसीचे वाटप व सार्वजनिक शाळेला क्रीडा साहित्य भेट कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधीक्षक शिवाजी फडतरे, पोलीस निरीक्षक संदीप बागुल, समाजसेवक दत्ता कांबळे, साधना कांबळे, राजश्री कांबळे, प्राचार्य संतोष नाईक, उप प्राचार्य रणजित पाटील, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, सुनिल पाटील, राज कडू, स्वप्नील पाटील, मंगेश पाटील, ओमकार डाकी, इन्शुरन्स कंपनीचे शरद यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी बोलताना समाजसेवक दत्ता कांबळे यांचे कौतुक केले. कांबळे यांचे सध्याचे वय 37 वर्ष असताना सुद्धा त्यांनी गेली 17 वर्षा पूर्वी पासून समाजसेवेचा व्रत सुरू केला आहे. कांबळे हे स्वतःच्या व परिवाराच्या वाढदिवसाला दरवर्षी समाज उपयोगी कामे करत असतात. समाजातील अनेक अडीअडचणी सोडविताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसलेल्या पोलिसांचे व पत्रकारांचे इन्शुरन्स काढल्याने दत्ता कांबळे यांचे समाज कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक शिवाजी फडतरे, पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनीही मार्गदर्शन केले तर दत्ता कांबळे यांनी बोलताना कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी उपस्थित सर्व पोलिसांना व पेण पत्रकारांना 5 लाख रुपयेच्या विमा पॉलिसीचे वाटप करण्यात आले. तर सार्वजनिक विद्यामंदिर पेण शाळेला क्रीडा साहित्य भेट देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन थवई गुरुजी यांनी तर आभार संदेश मोरे यांनी मानले.