दुर्घटनेत अनेक गाड्यांचं नुकसान
कल्याण : मे महिन्यात मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडली. भलंमोठं होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळलं व १७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला तर ७० हून अधिक लोक जखमी झाले. याच घटनेची कल्याणमध्ये पुनरावृत्ती झाली आहे. मात्र, सुदैवाने मोठी जीवितहानी होता होता टळली आहे. कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळून मोठा अपघात झाला. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत, तर अनेक गाड्यांचं नुकसान झालं आहे.
सहजानंद चौक हा कल्याण शहरातला गजबजलेला चौक आहे. या चौकात ऐन गर्दीच्या वेळी भलं मोठं होर्डिंग कोसळून अपघात झाला. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या रस्त्याच्या एका बाजूला अनेक दुकानं तर दुसऱ्या बाजूला एक रुग्णालय आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस घटनास्थळी आले असून होर्डिंग हटवण्यासाठी अग्निशमन दलाचं पथकही आलं आहे.
होर्डिंगखाली ४ ते ५ गाड्या अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अग्निशामक दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कोसळलेल्या होर्डिंला पालिका अधिकाऱ्यांकडून परवानगी दिल्याची माहिती मिळत आहे. पण पुन्हा तशीच घटना कल्याणमध्ये घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.