Tuesday, April 22, 2025
Homeक्रीडाOlympics 2024 : कोल्हापूरच्या पठ्ठ्याने जग जिंकले!

Olympics 2024 : कोल्हापूरच्या पठ्ठ्याने जग जिंकले!

५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पटकावले कांस्य

भारताला मिळाले तिसरे ऑलिम्पिक पदक

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. स्टार नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगनंतर पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या सहाव्या दिवशी कोल्हापुरच्या मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे याने ५० मीटर रायफल ३ पोझिशन नेमबाजीत भारताला आणखी एक कांस्यपदक जिंकून दिले आहे.

१९९५ मध्ये महाराष्ट्रातल्या कोल्हापुर येथे जन्मलेला स्वप्नील कुसळेने पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये ४५१.४ गुण नोंदवून इतिहास रचला. तसेच खाशाबा जाधवांच्यानंतर स्वप्नील कुसळेने महाराष्ट्राला दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकून दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by PrahaarNews Live (@prahaarnewslive)

भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळेने मंगळवारी झालेल्या क्वालिफायर फेरीत ५० मीटर रायफल ३ पोझिशन नेमबाजीत एकूण ५९० गुण मिळवून फायनलमध्ये धडक मारली होती. त्याने गुडघ्यावर बसून १९८, झोपून १९७ आणि नंतर उभे राहून १९५ गुण मिळवले. याच स्पर्धेत आणखी एका भारतीय ऐश्वर्या प्रताप सिंगची एकूण धावसंख्या ५८९ होती.

तो खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. ऑलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात वैयक्तिक पदक मिळवणारे मराठमोळे खेळाडू म्हणून केवळ खाशाबा जाधव यांना यश आले होते. हेलसिंकी १९५२ सालच्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबा यांनी कुस्तीत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते. आता असाच पराक्रम करून दुसरा मराठमोळा खेळाडू स्वप्नील बनला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही खेळाडू कोल्हापूरचे असून, ऑलिम्पिकमधील या विशेष योगायोगची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरी गाठणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळे एखाद्या नेमबाजाला नाही, तर भारताचा माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आपला आदर्श मानतो. धोनीच्या मैदानातील शांत आणि संयमी स्वभाव शैलीचा आपल्यावर कमालीचा प्रभाव असल्याचे स्वप्नीलने आपल्या पात्रता फेरीच्या कामगिरीनंतर सांगितले. योगायोग म्हणजे स्वप्नील धोनीप्रमाणे रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून नोकरी करतो.

‘‘मला रेंजवर शांत आणि संयमी राहायला आवडते. मी फारसा बोलत नाही. अचूक नेमबाजीसाठी शांत आणि संयम या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच मी धोनीचा प्रचंड चाहता आहे. क्रिकेटच्या मैदानावर सामना सुरू असताना कितीही मोठे दडपण असले, तरी धोनीचा संयम सुटलेला कधीही पाहिला नाही. मलाही असेच राहणे आवडते,’’ असेही स्वप्निल म्हणाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -