
पुणे : पावसाळा सुरु होताच अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे साथीचे रोग डोकावत असतात. अशातच मागील आठवड्यात मुसळधार पावसाने पुणे शहराला (Pune Rain) चांगलेच झोडपून काढले होते. त्यामुळे पुण्यात पूरस्थिती (Pune Flood) निर्माण झाली होती. मात्र आता पूराचे पाणी ओसरल्यानंतर रोगराईचे प्रमाण वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. डेंग्यू, चिकनगुनिया यांसारखे आजार उद्भवत असताना असताना पुण्यात झिका नावाच्या (Zika Virus) नव्या विषाणूचे थैमान वाढत चालले आहे. सातत्याने झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या महिनाभरापासून पुण्यात झिकाची लागण झालेल्यांची संख्या ४७ वर पोहोचली आहे. त्यामुळे पुणेकरांनी यापासून दूर राहण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
झिका व्हायरसची चिन्हे आणि लक्षणे
झिका व्हायरसची लक्षणे डेंग्यूसारखी आहेत. डास चावल्यानंतर ३ ते १४ दिवसांनी लक्षणे दिसतात आणि त्यात पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो.
- कमी दर्जाचा ताप
- त्वचेवर पुरळ
- डोकेदुखी
- स्नायू आणि सांधेदुखी
- डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह (लाल डोळा)
- पोटदुखी
अशी घ्या काळजी
झिका व्हायरसची लागण होऊ नये यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे. त्यासोबत शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी संतुलित आहार घेतला पाहिजे. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नारळपाणी, लिंबूपाणी, काकडी, संत्री अशा अनेक द्रवपदार्थांचा समावेश करा.
याचबरोबर मच्छरांच्या वाढीला आळा घालण्यासाठी घरात आणि घराच्या आसपास स्वच्छता राखावी. मच्छरदाणी वापरणे आणि मच्छरांच्या चाव्यापासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
डेंग्यूसह चिकनगुनियाचाही धोका
पुण्यातील पुरामुळे अनेक साथीच्या आजारांनी शहराला घेरले आहे. यामध्ये झिकासह डेंग्यू आणि चिकनगुनियाचाही समावेश आहे. पुण्यात डेंग्यूचे तब्बल ३८९ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर निकनगुनियाचेही काही रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.