Saturday, June 21, 2025

पंतप्रधान मोदींकडून मंत्री अनुराग ठाकूर यांच्या भाषणाची प्रशंसा

पंतप्रधान मोदींकडून मंत्री अनुराग ठाकूर यांच्या भाषणाची प्रशंसा

इंडिया आघाडीचे घाणेरडे राजकारण उघड झाल्याचा दावा


नवी दिल्ली : माझे तरुण आणि उत्साही सहकारी अनुराग ठाकूर यांचे हे भाषण आहे, जे ऐकायलाच हवे. त्यात तथ्यांचा समावेश आहे. यातून इंडिया आघाडीचे घाणेरडे राजकारण उघड होत आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीअर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याही भाषणाचा व्हिडीओ शेअर केला. पंतप्रधान मोदींनी श्री ठाकूर यांच्या भाषणाचे कौतुक केले आणि ते "ऐकलेच पाहिजे" असे सांगितले. या वर्षीचा अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकासाठी काय देतो याचे एक अतिशय व्यापक चित्र सादर करतो. विकास आणि सुधारणांसाठी आमच्या सरकारच्या वचनबद्धतेचा अर्थमंत्री निर्मला सीतारमन पुनरुच्चार करत आहेत," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.





लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारची महाभारतात रचलेल्या ‘चक्रव्यूहा’ची तुलना करून हल्लाबोल केला. आताच्या आधुनिक चक्रव्यूहात आधुनिक अभिमन्यूंना अडकवले जात असल्याचे म्हणत राहुल गांधी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. दुसऱ्या दिवशी चर्चेदरम्यान, मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचे कौतुक केले आहे.


राहुल गांधी यांच्या भाषणानंतर मंगळवारी संसदेत खूप गोंधळ उडाला. लोकसभेत मंत्री अनुराग ठाकूर यांचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यात जोरदार वाद झाला. त्यावरुनच सत्ताधारी आणि विरोध एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनीही अनुराग ठाकूर यांनी सभागृहात दिलेल्या भाषणाचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी अनुराग ठाकूर यांच्या संसदेतील भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.


लोकसभेत सोमवारी राहुल गांधी यांनी कमळाचा हिंसाचाराशी संबंध जोडला होता. त्यानंतर अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या वक्तव्यावर पलटवार करत, कमळाला राजीवसुद्धा म्हणतात, त्यामुळे ते राजीव गांधींनाही वाईट मानतात का? असा सवाल केला. ज्यांची जात कोणाला माहिती नाही, ते आज जातीनिहाय जनगणनेच्या गोष्टी करत आहे, असंही म्हणत त्यांनी राहुल गांधी यांना लक्ष केले. दरम्यान, अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर केलेल्या वक्तव्यानंतर कन्नौजचे खासदार आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि ठाकूर यांच्यात जोरदार वादावादी झाली. अनुराग ठाकूर सभागृहात कोणाच्याही जातीबद्दल कसे बोलू शकतात, असा सवाल अखिलेश यादव यांनी केला.

Comments
Add Comment