मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेबाबत (Mumbai Railway) सातत्याने नवनवीन अपडेट समोर येत असतात. रेल्वे प्रवाशांचा प्रवास सोपा व सुरळीत होण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमी कार्यरत असते. अशाच रेल्वे सेवेच्या बाबतीत येत्या काही दिवसांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. परंतु या बदलामुळे रेल्वे प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने मध्य (Central Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbor Line) मार्गावरील वाहतुकीचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्यानुसार एमयूटीपी-२ अंतर्गत सीएसएमटी ते कुर्ला असा पाचवा-सहावा मार्ग बनवण्याच्या तयारीत आहे. परंतु रुळांलगत असलेल्या जागेच्या अनुपलब्धतेमुळे सीएसएमटी ते परळ आणि कुर्ला ते परळ अशा दोन टप्प्यांत हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या संदर्भात सीएसएमटी ते परळदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे.
मात्र या चाचणीदरम्यान, हार्बर लोकल सेवेचा प्रवास सँडहर्स्ट रोड स्थानकापर्यंत व मध्य रेल्वेमार्गावरील जलद लोकल भायखळ्यात थांबणार नाहीत, अशी प्रस्ताव रेल्वेने मांडला आहे. याबाबत अद्यापही अंतिम निर्णय झाला नसलटा तरीही या प्रस्तांवाची व्यवहार्यता तपासली जात असल्याची माहिती मिळत आहे.
वाहतूक बदलण्याचे नेमके कारण काय?
सीएसएमटी स्थानकावरील जागेची मर्यादा पाहून हार्बर मार्गावरील फलाट अतिरिक्त फलाट म्हणून उपलब्ध होण्यासाठी, तसेच मध्य रेल्वेवरील भायखळा स्थानकावर जलद लोकलवरील प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे या फलाटाचा उपयोग नव्या मार्गिकांकरिता करुन घेण्यसाठी रेल्वेने असा प्रस्ताव मांडला आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
त्याचबरोबर हार्बर लोकल सँडहर्स्ट रोडपर्यंत चालवणे आणि जलद लोकलचा भायखळा थांबा हटवणे हा पर्याय सीएसएमटी ते परळदरम्यान अतिरिक्त मार्गिकांसाठी कमी खर्चात आणि निश्चित कालावधीत करणे शक्य आहे. यामुळे हार्बर मार्गावरुन सीएसएमटीपर्यंत प्रवास करणाऱ्यांना मुख्य मार्गावरील लोकल पकडून सीएसएमटी गाठणे सोपे होईल, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले.