नागरिकांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा
कोल्हापूर : मागच्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर धरला होता. त्यातच कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. संपूर्ण आठवडाभर पावसाची संततधार (Heavy Rain) कोसळत असल्यामुळे कोल्हापूरमध्ये पूरस्थिती (Flood) निर्माण झाली होती. यामध्ये अनेकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असल्यामुळे येथील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु आता पुन्हा पावसाच्या मुसळधार सरी कोसळत असल्यामुळे कोल्हापूरवर आणखी एकदा पूराचे सावट ओढले गेले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. या पावसामुळे ७० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच राधानगरी धरणही १०० टक्के भरल्यामुळे येथील ७ स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. या धरणातून भोगावती नदीमध्ये ११,५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यासोबत पंचगंगा नदी देखील धोक्याच्या पातळीवर असल्यामुळे या पाणीपातळीत कधीही वाढ होण्याची शक्यता आहे, यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात पूरस्थिती अजूनही कायम राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. त्यातच पुन्हा पूर येण्याची शक्यता असल्यामुळे सर्व नागरिक आणखी चिंतेत आले आहेत. त्यामुळे आम्हाला सरकारी अनुदान नको पण या पुराचा कायमचा बंदोबस्त करा, अशी विनंती शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना केली जात आहे.