दहा मीटर पिस्तूल नेमबाजीत मनू भाकरला पहिले ऑलिम्पिक विजेतेपद मिळवण्याचा मान यंदा मिळाला. पॅरिस ऑलिम्पिक विजेती पदक खेळाडूंच्या यादीत पहिल्यांदा मनू भाकरने मान पटकावला आहे. भारतीय महिला नेमबाज मनू भाकर हिने भारताला कांस्यपदक जिंकून दिलं आहे. हे पदक आपल्या नावावर करत मनू भाकर हिने इतिहास रचला असून नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी पहिला भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदनही केलं. नेमबाज मनू भाकर हिने यंदाचे पहिले पदक मिळवले. पण तिला गेल्या ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावणी दिली होती. तिचे पिस्तूल खराब झाल्याने पुढील स्पर्धेपासून मुकावे लागले होते. यंदा मात्र तसं काही झालं नाही. तसं तर प्रत्येक खेळाडूचे हे स्वप्न असतं की त्याने ऑलिम्पिकमध्ये जाऊन पदक जिंकावं. पण गेल्या काही स्पर्धांपासून भारतीय खेळाडूंचे हे पदकांचे स्वप्न साकार होताना दिसत आहे.
मनू यंदाची पहिली ऑलिम्पिक विजेती ठरली. पण तिचा प्रवास सोपा नव्हता. तिने कितीदा तरी लढाया लढल्या आणि त्यात तिला कितीदा तरी हार पत्करावी लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले. पण मनू भाकर हिने पिस्तूल खराब झाल्यावर तिला किती निराशेला तोंड द्यावे लागले असेल हे तिचे तिलाच माहीत. ऑलिम्पिकमधील तिच्या पिस्तुलातील खराबीमुळे तिला त्या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते. याच्या वेदनाही तीच जाणू शकते. मनू भाकरचे थोडक्यासाठी रौप्य पदक हुकले आहे. पण मनू हिने जो पराक्रम केला आहे तो काही कमी महत्त्वाचा नाही. उलट हा पराक्रम तिने भारताला निराशेच्या वातावरणातून बाहेर काढणारा आहे. भारतासाठी ही कामगिरी तिची अफलातून तर आहेच. पण नव्या खेळाडूंना आणि इतर खेळांनाही प्रेरणा देणारी आहे. भारतात क्रिकेटशिवाय दुसरा खेळ खेळला जात नाही. अगदी गल्लीबोळातही क्रिकेट हा मिळेल ते सामान घेऊन चाललेला दिसतो. पण ते चित्र बदलण्याची ताकद या पदकात आहे. भारतात आता ऑलिम्पिक स्पर्धेत विजेते पद मिळवण्यासाठी खेळाडूंनी ईर्षा करण्याची गरज आहे आणि तेच चित्र सध्या दिसते आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी गेलेले खेळाडू पूर्वी जात असत आणि परत येत असत. तेव्हा भारताच्या पदरी केवळ निराशा येत असे आणि आता तर पदके घेऊन खेळाडू परत येत आहेत. हे निश्चितच बदलते चित्र स्वागतार्ह आणि सुखकारक आहे.
मनू भाकर हिने यंदाचे पहिले पदक जिंकले आणि तेही नेमबाजीत. तिला अजून चांगली कामगिरी करण्याची आशा आहे आणि ती त्यात यशस्वी होईल अशी आशाही आहे. इतर स्पर्धांतूनही भारताचे ऑलिम्पिक खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी आशा मनूच्या यशामुळे निर्माण झाली आहे. मध्यंतरी मनू भाकर ही नेमबाजी सोडणार होती. तिला माजी महान खेळाडू जसप्रीत राणा हिचा फोन आला. त्याने तिचे आयुष्य बदलून गेले. या फोन कॉलमुळे मनूच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आला आणि तिने नेमबाजी न सोडण्याचा निर्णय घेतला. अन्यथा तिने चांगल्या ठिकाणी नोकरी स्वीकारायची असे ठरवले होते. पण तसे झाले नाही आणि भारताला एक ऑलिम्पिक पदक विजेती मिळाली. मनूला जसप्रीत राणाने केलेला फोन कॉल हाच तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला हेच आता सर्वश्रुत झाले आहे. जसप्रीत राणा मनूला प्रशिक्षण द्यायला लागले आणि त्यानी तिच्याकडून पुन्हा सर्व तयारी पूर्ण करू घेतली. मनू आता ऑलिम्पिक स्टार झाल्याचे श्रेय संपूर्ण भारतवासीयांना आहे. तसेच ते तिच्या जिद्दीला, तिच्या चिकाटीला आणि तिच्या आई-वडिलांनाही आहे. मनू भाकर हिला ऑलिम्पिक विजेती करण्याच्या कामी तिच्या गुरूंनी जी अपरंपार मेहनत घेतली आहे त्यापेक्षाही तिचे कष्ट मोलाचे आहेत. मनू भाकरने २२१.७ गुणांचा वेध घेत पहिले कांस्यपदक जिंकले. तिने तिसरे स्थानही पटकावले, तर जिन योह आणि येजी किम या कोरियन नेमबाजांनी सुवर्ण आणि रजत पदक पटकावले. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीत पहिले ऑलिम्पिक पदक मिळाले होते. तेव्हा बिंद्रा, राजवर्धन राठोड आणि गगन नारंग यांनी नेमबाजीत पदक जिंकले होते. त्यानंतर मनू ही पहिली ऑलिम्पिक विजेती ठरली आहे. मनू या स्पर्धेच्या बाहेर पडली तेव्हा तिची स्पर्धक कोरियन येजीच्या फक्त ०.१ गुणांनी मागे होती. याचा अर्थ तिचे रौप्यपदक थोडक्यात हुकले. टोकियो ऑलिम्पिकमध्येही मनू भाकर पदकाची प्रबळ दावेदार होती. पण तिच्या पिस्तुलात तांत्रिक बिघाड झाला आणि ती पदकांच्या शर्यतीतून बाहेर झाली. मनू भाकर हिला आता उत्तुंग यश मिळाले आहे. पण तिने हवा डोक्यात जाऊ दिलेली नाही. तिला आता मोठमोठ्या स्पर्धा जिंकायच्या आहेत.
भारतातील खेळाचे चित्र तिच्या या यशामुळे पालटले जाणार आहे. अनेक मुली तिच्या ऑलिम्पिक यशामुळे भारावून तिच्या या यशाकडे आशेने पाहणार आहेत. तिच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार आहेत. त्यामुळे मनू भाकर ही आता नवी स्टार झाली आहे आणि आयडॉल झाली आहे. भारताच्या मरगळलेल्या खेळाच्या चित्राकडे मनूचे यश नवीन आशा घेऊन आले आहे. पिस्तूल खराब झाल्याने एकेकाळी निराश झालेली आणि स्पर्धेतून बाहेर पडावी लागलेली ही स्पर्धक आज यशाचा नवा तारा म्हणून झळाळून उठली आहे, हे काही कमी यश नव्हे. मनू भाकरला भावी वाटचालीच्या शुभेच्छा! त्याबरोबर तिने अधिकाधिक पदके मिळवावी आणि भारताचे नाव रोशन करावे हीच शुभकामना.