शेकडो लोक अडकल्याची भीती; बचावकार्य सुरु
वायनाड : केरळच्या (Kerala) मेप्पाडी भागात मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास भूस्खलनाची घटना घडली. यामध्ये मुंडक्काई, चुरमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या चार गावांना भूस्खलनाचा तडाखा बसला. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून ४०० हून अधिक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी बचावकार्य मदतीचे काम सुरू असताना आज पहाटे पुन्हा केरळमध्ये भूस्खलन (Wayanad landslide) झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. मात्र सलग दोनवेळा भूस्खलन झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ४.१० वाजेच्या सुमारास वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात भूस्खलानाची घटना घडली. या भूस्खलनात दोन चिमुकल्यांसह १९ जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक लोक यामध्ये अडकल्याची शक्यता असून प्रशासनाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. परंतु सध्या केरळमध्ये पावसाच्या संततधार कोसळत असल्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. या दुर्घटनेनंतर १६ जणांना वायनाडमधील मेप्पाडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर या दुर्घटनेची माहिती मिळताच सरकारी यंत्रणा मदतीसाठी धावल्या असून केरळ सरकारकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेनंतर अनेक राज्यमंत्री या दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.