Wednesday, August 6, 2025

Ganeshotsav 2024 : गणरायाच्या स्वागतासाठी BMC सज्ज! लवकरच मिळणार मंडप उभारण्याची परवानगी

Ganeshotsav 2024 : गणरायाच्या स्वागतासाठी BMC सज्ज! लवकरच मिळणार मंडप उभारण्याची परवानगी

मुंबई : मुंबईकरांच्या घरी आणि विविध परिसरांमध्ये यंदा ७ सप्टेंबरपासून लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन (Ganeshotsav 2024) होणार आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईतील मोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन होण्यास सुरुवात होते. मात्र त्यासाठी मंडळांना महापालिकेकडून (BMC) दोन महिने आधीपासूनच मंडप बांधण्याची परवानगी घ्यावी लागते. मात्र यंदा मुंबई महापालिकेने परवानगी देण्यास विलंब केल्यामुळे गणेशोत्सव मंडळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र आता महापालिका लवकरच गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी ऑनलाइन एक खिडकी योजना राबवून देणार आहे. त्यामुळे मंडळांना आता आणखी कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मुंबई महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव मंडळांसाठी मंडप उभारणी परवानगीसाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे. त्याचसोबत अर्ज प्राप्त झाल्यापासून मंडळांना पाच ते सात दिवसांत परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न देखील करण्यात येणार आहे.


दरम्यान, या प्रक्रियेसाठी मंडळांकडून ऑनलाइन अर्ज केल्यानंतर महापालिका, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलिसांची परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र हे विभाग कार्यालयातील एका खिडकीवरच उपलब्ध होते किंवा त्यासाठी मंडळांच्या सदस्यांना प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागते. तर काहीवेळा सदस्य वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस किंवा अन्य विभागतही जाऊन परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र घेतात. परंतु मंडळांचा होणारा खटाटोप वाचवण्यासाठी महापालिकेकडून मंडळांना विविध परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्रही मंडळांना ऑनलाइनच देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Comments
Add Comment