भारताला मिळवून दिले कांस्य पदक
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Paris Olympic 2024) सध्या सुरु असताना यादरम्यान एक आनंदाची बातमी हाती लागली आहे. भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरने (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये आज दुपारी पार पडलेल्या नेमबाज स्पर्धेत मनू भाकरने कांस्य पद कमावले आहे. भारताची शूटर मनू भाकर ही पहिल्या तीनमध्ये येऊन अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आणि ती आज तिसऱ्या स्थानकावर येऊन कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तर कोरियन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले.
मनू भाकरने अंतिम सामन्यात २२१.७ गुणांसह हे पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. मनू भाकर २१व्या शॉटने दुसऱ्या स्थानावर पोहोचली होती, मात्र अवघ्या काही गुणांनी ती अखेरीस तिसऱ्या स्थानावर राहिली. मात्र मनू भाकर ही नेमबाजीमध्ये भारताला पदक जिंकवून देणारी पहिली महिला ठरली आहे.
दरम्यान, भारताच्या मनू भाकरने काल १० मीटर एअर पिस्तूल महिलांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ती ५८० गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली. तर भारताची दुसरी नेमबाज रिदिमा सांगवान ५७३ गुणांसह १५व्या स्थानी राहिली होती. अव्वल स्थानी राहिलेले आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. फायनलमध्ये अंतिम क्षणात मनू भाकर दुसऱ्या स्थानी आल्याने भारताला पदक मिळणार हे निश्चित झाले होते. अखेर २२ वर्षीय मनूने कांस्य पदकाला गवसणी घातली.