पावसाचे तांडव…

Share

पावसाने गेल्या काही दिवसांपासून चांगलीच हजेरी लावली. मुंबई शहर, उपनगर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, वसई, विरार, अंबरनाथ-बदलापूर, कर्जत-कसारा, नवी मुंबई, पनवेल, उरण, खोपोली, खंडाळा घाट, माळशेज घाट परिसर, ठाणे ग्रामीणसह कोकण, पुण्यालाही पावसाने चांगलेच झोडपले आहे. महाराष्ट्राच्या काही ग्रामीण भागामध्येही पावसाच्या तांडवाचे चित्र पाहावयास मिळत आहे. अजूनही महाराष्ट्राच्या काही ग्रामीण भागामध्ये पावसाने आता कुठे सुरुवात केली आहे. पाऊस वेळेवर न पडल्याने, सुरुवातीच्या काळात दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली. मुंबई शहर व उपनगरामध्ये पाऊस गेल्या काही दिवसांपासून पडत असल्याने जनसामान्यांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे.

मुंबईकरांची लाईफलाईन असलेली रेल्वे सेवा काही दिवसांपासून संथ गतीने सुरू आहे. रेल्वे रुळावरही ठिकठिकाणी पाणी साचलेले व रेल्वे गाड्या काही ठिकाणी उभ्या असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मुसळधार पावसातही मुंबईचे जीवनमान पूर्णपणे थांबले नसून हळूहळू मार्गाक्रमण करत आहे. पावसामुळे राज्याच्या ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यांतून तसेच परराज्यातून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या फळे-भाज्यांच्या आवकावरही परिणाम झाला आहे. आवक मंदावल्याने भाज्यांच्या किमतीतही वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा आटल्याने काही दिवस मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पावसाने दडी मारल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार होती; परंतु गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईकरांपुढे उभे ठाकलेली पाणीबाणीची समस्या आता पूर्णपणे संपुष्ठात आलेली आहे. सततच्या पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणीसाठ्यातही कमालीची वाढ झाली आहे. मुंबईकरांना ज्या सात तलावांतून पाणीपुरवठा केला जातो, त्यातील तुळशी व तानसा ही दोन्ही धरणे आताच ‘ओव्हरफ्लो’ होऊन वाहू लागली. अजून पाऊस सव्वादोन महिने राहण्याची शक्यता असल्याने पाण्याच्या बाबतीत मुंबईकर आता निर्धास्त झाले आहेत. हे चित्र केवळ मुंबईतच नाही तर मुंबईलगत असलेल्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार व लगतच्या अन्य शहरी भागातही होते, पण सतत पडणाऱ्या पावसाने त्यांनाही दिलासा दिल्याने पाण्याच्या बाबतीत त्यांचे चेहरे उजळलेले दिसून येत आहेत. कोकणात दरवर्षीच पाऊस पडतो. घरातील एखाद्या लाडक्या मुलाचे गोडकौतुक व्हावे, तशाच स्वरूपात पाऊस कोकण भागावर वर्षाव करत असतो; परंतु कोकणात पावसाचे पाणी जमिनीतच जिरवण्याचे, तलाव-धरणे बांधण्याचे राज्य सरकारकडून प्रयोजनच केले जात नसल्याने या पडणाऱ्या पावसाचा वर्षानुवर्षे कोकणवासीयांना फारसा फायदा होत नाही. पावसाचे पाणी वाहून जाते. हे पाणी जमिनीतच जिरवण्यासाठी कोकणवासीयांनी प्रयत्न केल्यास कोकणच्या जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. पाण्याची वाढलेली पातळी पिण्याच्या पाण्यासाठी व तेथील शेतीसाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे कोकणात रिक्त असलेल्या जागांवर त्या त्या तालुक्यातील जनतेने तलाव, बंधारे तयार करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. मध्यंतरी नदीजोड प्रकल्पाबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा झाली होती. वाजपेयी सरकारच्या काळात प्रशासकीय पातळीवर नदीजोड प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली होती, पंरतु पुढे त्या योजनेला गतीच मिळाली नाही.

गेल्या काही दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. रेल्वे स्टेशनवर आल्यावर रेल्वेचे बिघडलेले वेळापत्रक, रेल्वेगाड्यांना होणारा विलंब, रेल्वेत बसल्यावर कोठे तरी मध्येच रेल्वेचे बराच वेळ थांबणे हा त्रासही पावसाळा कालावधीत मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या अंगवळणी पडलेला आहे. रेल्वे स्टेशनवर गर्दी, गर्दीतच करावा लागणारा दररोजचा प्रवास, प्रवासातच जाणारा चार-पाच तासांचा वेळ हे पाहिल्यावर मुंबईला ये-जा करणाऱ्या दररोजच्या रेल्वे प्रवाशांच्या संयमाची खरोखरीच प्रशंसा करायला हवी. रेल्वे स्टेशनबाहेर पडल्यावर साचलेल्या पाण्यातूनच ये-जा करणे एकप्रकारचे अग्निदिव्यच असते. रूळ परिसरात असणाऱ्या नाल्याच्या सफाईवरून महापालिका व रेल्वे प्रशासन नेहमीच एकमेकांवर दोषारोप करत असते. तुंबलेल्या नाल्याची, रेल्वे रुळावर साचलेल्या पाण्याची जबाबदारी कोणीही स्वीकारत नाही. यामध्ये हाल केवळ रेल्वे प्रवाशांचेच होतात. बसेसचा प्रवासही एक प्रकारचे आव्हानात्मक कार्य आहे. बसेसलाही विलंब होत असतो. पावसामध्ये बससाठी थांब्यावर उभे राहिल्यावर भरून येणारी बस ही थांब्यावर न थांबल्यावर प्रवाशाची होणारी अवस्था ही सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशा स्वरूपाची असते. पावसाच्या पाण्यात सतत भिजल्यामुळे आजारी पडणे, साथीच्या आजारांची लागण होणे या प्रकाराचाही मुंबईकरांना सामना करावा लागत आहे. त्यातच डोंगराळ भागात राहणाऱ्या, दरड प्रवण भागात राहणाऱ्या, धोकादायक इमारतीत राहणाऱ्या लोकांच्या डोक्यावर पावसाळा कालावधीत मृत्यूची टांगती तलवार कायम असते.

पालिकेने या धोक्याची वारंवार लेखी सूचना देऊनही आर्थिक कारणास्तव इतरत्र सोय न झाल्याने आहे त्याच ठिकाणी त्यांना वास्तव्य करावे लागत आहे. कल्याणमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळण्याची घटना घडलेली आहे. घाटकोपर खंडोबाचा डोंगर, विक्रोळीतील पार्क साईट येथील डोंगरभागावर असलेली चाळीतील घरांवर मृत्यूची आजही टांगती तलवार आहे. ठाणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे दुपारच्या सत्रातील शाळा न भरवण्याची घोषणा करण्याची वेळ प्रशासनावर आली. मुंबईपाठोपाठ गुरुवारी पुण्यातही पावसाचे तांडव सुरूच होते. मुसळधार पावसामुळे पुण्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. पुण्यात वरुण राजाचा उद्रेक पाहिल्यावर प्रशासनाला फिल्डवर जाऊन काम करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Tags: heavy rain

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

4 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

4 hours ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

4 hours ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

4 hours ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

5 hours ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

5 hours ago