Wednesday, August 6, 2025

Pune News : घरभर चिखल, पिण्याच्या पाण्याचे वांदे, वीज खंडित; पुणेकरांचे होतायत मोठे हाल!

Pune News : घरभर चिखल, पिण्याच्या पाण्याचे वांदे, वीज खंडित; पुणेकरांचे होतायत मोठे हाल!

जाणून घ्या पुणेकरांची सध्याची परिस्थिती काय?


पुणे : काल राज्यभर पडलेल्या मुसळधार पावसाने चांगलेच रौद्र रुप दाखवले होते. मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यात थैमान (Heavy Rain) घातलेल्या पावसाने आज सकाळपासून काहीशी विश्रांती घेतली त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही कालच्या अतिवृष्टीचा फटका नागरिकांना आजही सोसावा लागत आहे. काल पुण्यात (Pune Rain) पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. तसेच खडकवासला धरणातूनही मोठ्या प्रमाणात होणारा विसर्ग घटला आहे. परंतु घराघरात चिखल झाला असून पिण्याच्या पाण्यासह वीजेचा खंड पडल्यामुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत.



खडकवासला धरणातून विसर्ग कमी


खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा करण्यात कमी आला आहे. याआधी ३१ हजार क्यूसेकवरून पाण्याचा विसर्ग कमी करत तो केवळ १३ हजार क्युसेक करण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस थांबल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला.



एकता नगरमध्ये वीज खंडित


पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगरमध्ये वीज खंडित पडली आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासह वापरण्यासाठीही पाणी उरले नसल्यामुळे या परिसरातील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. तसेच महानगरपालिकेकडून पोहोचवण्यात येणारे पिण्याचे पाणी अजूनही लोकांपर्यंत पोहोचले नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.



महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर


पुण्याला हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. तसेच सुट्टीच्या कालावधीत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे अशा सूचनाही केल्या आहेत.



मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्याही रद्द


हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई-पुणे दरम्यान धावणारी (१२१२७) इंटरसिटी एक्सप्रेस, (१२१२४) डेक्कन क्वीन आणि (१२१२६) प्रगती एक्स्प्रेस या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गाड्या रद्द केल्याने प्रवाशांची ऐनवेळी गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना माहिती देण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात रेल्वेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रवाशांना पर्यायी गाड्यांची माहिती देण्याची व्यवस्था या कक्षाच्या माध्यमातून केली जात आहे



पावसामुळे सहा जणांना मृत्यू


शहरात मुसळधार पावसाने रौद्ररुप धारण केले होते. यामुळे पुण्यातील डेक्कन परिसरात पुलाची वाडी येथे शॉक लागून तीन तरुणांचा मृत्यू झाला. तर कात्रज तलावात बुडून दोघांचा तसेच ताम्हिनी घाटात एका तरुणाचा मृत्यू झाला.

Comments
Add Comment