Monday, April 21, 2025
HomeदेशNarendra Modi : दहशतवाद्यांचे नापाक मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत!

Narendra Modi : दहशतवाद्यांचे नापाक मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत!

कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा इशारा

कारगिल : भारताने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कारगिल युद्धात (Kargil war) विजय मिळवला होता, या घटनेला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu And Kashmir) द्रास येथे कारगिल वॉर मेमोरियलला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शहिदांना आदरांजली वाहिली. त्यांनी देशवासियांशी संवाद साधला, तसेच पाकिस्तानवर सडकून टीका केली. पाकिस्तानचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही, अशी ग्वाही देताना त्यांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांना इशारा दिला आहे.

जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवण्याला पाच वर्षे पूर्ण होऊनही इथल्या दहशतवादी कारवाया थांबलेल्या नाहीत. सातत्याने इथे अनेकदा दहशतवादी हल्ले होत असल्याने अनेक भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “कारगिल विजय दिवस आम्हाला सांगतो की राष्ट्रासाठी दिलेलं बलिदान अमर होतात. दिवस, महिने, वर्षे ,शतके जातात, परिस्थिती बदलते पण राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्यांची नावे कायम अमर राहतात”.

“हा देश आमच्या लष्कराच्या पराक्रमी महानायकांचा सदा सर्वदा ऋणी आहे. हा देश त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे. माझं सौभाग्य आहे की कारगिल युद्धाच्या वेळी मी देशाचा सामान्य नागरिक म्हणून आपल्या सैनिकांच्या मध्ये होतो. मला आठवतंय कशा पद्धतीने आमच्या लष्कराने एवढ्या उंचीवर, एवढं कठीण युद्ध ऑपरेशन लढलं होतं. मी देशाला विजयी करणाऱ्या अशा सर्व शूरवीरांना आदरपूर्वक प्रणाम करतो. मी शहीदांना नमन करतो की ज्यांनी कारगिलमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं”, असंही ते म्हणाले.

पूर्ण ताकदीने शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल

भारताने २५ वर्षांपूर्वी कारगिल युद्ध केवळ जिंकलं नाही, तर सत्य, संयम आणि सामर्थ्याचं दर्शन घडवलं आहे. तुम्हाला माहिती आहे की भारत तेव्हा शांततेसाठी प्रयत्न करत होता. त्या बदल्यात पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला अविश्वासू चेहरा दाखवला. परंतु, सत्याच्या समोर असत्य आणि आतंक्यांचा पराभव झाला. पाकिस्तानने जेवढे दुप्रयास केले त्या सर्वांना चारी मुंड्या चीत केले. भूतकाळातील सर्व नापाक प्रयत्नांमध्ये पाकिस्तान अयशस्वी ठरला होता, पण आता दहशतवाद आणि प्रॉक्सी अर्थात तिसऱ्याच्या मदतीने भारताविरुद्ध कारस्थानं करण्याचा प्रयत्न करत आहे.

पाकिस्तान आपल्या इतिहासातून काहीही शिकलेला नाही. आज मी अशा ठिकाणाहून बोलत आहे जिथे दहशतवादाचे सूत्रधार थेट माझा आवाज ऐकू शकतील. मला दहशतवादाच्या या समर्थकांना सांगायचे आहे की, नापाक मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत. आमचे सैनिक दहशतवादाला चिरडून टाकतील. पूर्ण ताकदीने शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -