सायंकाळी समाज आरतीदरम्यान पुन्हा निषेध करु, वारकऱ्यांचे म्हणणे
पुणे : ज्ञानोबा माऊलींच्या (Dnyaneshwar Mauli Palkhi) पालखीचे आज सातारा (Satara) जिल्ह्यातून पुणे (Pune) जिल्ह्यामध्ये आगमन झाले. माऊलींच्या या परतीच्या प्रवासात निरामधील दत्त घाटावर जंगी स्वागत देखील करण्यात आले. तसेच परंपरेनुसार पुरंदर तालुक्यातील निरा येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना निरास्नानही घातले गेले. परंतु या नीरास्नानानंतर दिंडीमधील वारकऱ्यांचा मोठा गोंधळ उडाला. दरवर्षीप्रमाणे यंदा काही वारकऱ्यांना पादुकांचे दर्शन न दिल्यामुळे वारकऱ्यांनी आक्रमक रुप धारण केले. तसेच तीव्र संताप व्यक्त करत ऐन पालखीसमोरच ठिय्या मांडल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
नेमके प्रकरण काय?
ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळा परतीच्या प्रवासात पादुकांना नीरा नदीच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. दरवर्षी पादुकांचे स्नान झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाच्या पुढे आणि पाठीमागे असणाऱ्या सर्व दिंड्यांतील वारकऱ्यांना दर्शन मिळण्यासाठी या पादुका प्रत्येक दिंडीपर्यंत नेतात. मात्र यंदा तसे न करता वारकऱ्यांनी रथामध्ये येऊन दर्शन करावे असे सांगण्यात आले. या गोष्टीमुळे वारकरी आक्रमक होऊन त्यांनी रथासमोरच ठिय्या मांडला. तसेच दर्शन मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असेदेखील वारकऱ्यांनी म्हटले.
दरम्यान, पालखीचा रथ आणि पालखी पुढील दिंड्या पुढे निघून गेल्या तर रथाच्या पाठीमागील दिंड्या या नीरा नदीच्या पुलावर थांबल्या होत्या. मात्र काही वेळानंतर या दिंड्या देखील मार्गस्थ झाल्याची माहिती मिळत आहे. परंतु सायंकाळी नित्याचे भजन करून समाज आरतीला आम्ही या गोष्टीचा निषेध करू असे दिंडीतील वारकऱ्यांचे म्हणणे आहे.