लाडकी बहीण योजनेवरुन टीका करणाऱ्यांना नितेश राणे यांनी लगावली चपराक
मुंबई : ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki bahin yojana) ही महायुती सरकारची (Mahayuti sarkar) अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना होत चालली आहे. राज्यातील माताभगिनींना खऱ्या अर्थाने आधार देणारी ही योजना आहे. पण जेव्हापासून ही योजना जाहीर झाली आहे तेव्हापासून मविआच्या (Mahavikas Aghadi) सर्वच पक्षांना पोटशूळ उठला आहे. राज्यातील माताभगिनींचं भलं होतंय, त्या आर्थिक सक्षम होतायत हे त्यांना बघवत नाही आहे, अशी सणसणीत टीका भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. लाडकी बहीण योजनेवरुन टीका करणाऱ्या मविआच्या नेत्यांना नितेश राणे यांनी चांगलेच धारेवर धरले.
नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे, नाना पटोले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून सातत्याने या योजनेवर टीका करण्याचं काम होतंय. आजही सकाळी संजय राजाराम राऊतने आमचं सरकार आल्यावर ही योजना बंद करु, असं विधान पत्रकार परिषदेत केलं. हे राज्यातील माताभगिनींनी अतिशय काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. एका बाजूला आमचं महायुतीचं सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करतंय, पण चुकून जर मविआचं सरकार आलं तर ही योजना बंद करेल.
आदरणीय मोदीजी आणि आदरणीय अमित शहाजी यांना महाराष्ट्राचे शत्रू म्हणायचं आणि महाराष्ट्रातल्या माताभगिनींचं काही चांगलं होत असेल तर आम्ही सत्तेत आल्यावर योजनाच बंद करु अशा पद्धतीची मानसिकता या मविआच्या नेतेमंडळींची आहे, या गोष्टीची दखल राज्यातील माताभगिनींनी घ्यावी, अशी विनंती नितेश राणे यांनी केली.
तुझा मालक स्वबळावर निवडून आला होता का?
एनडीए सरकार खंडणी देऊन उभं राहिलं आहे, पंतप्रधान मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं नाही, असं म्हणणाऱ्या संजय राऊतचा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा तो स्वबळावर निवडून आला होता का? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदीवर तसंच भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून बेईमानीने हे सत्तेमध्ये आले. स्वतःचे आमदार टिकवू शकले नाहीत. तरीही केंद्रातल्या आमच्या सरकारला नावं ठेवण्याची हिंमत संजय राऊत करतोय, म्हणून त्याला सांगेन की स्वतःची लायकी ओळखा, असं नितेश राणे म्हणाले.
राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षाबद्दल भूमिका घेतली आहे
मनसेने विधानसभा स्वबळावर लढण्याच्या भूमिकेवर नितेश राणे म्हणाले की, प्रत्येक पक्षाला आपापला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मी राज ठाकरे यांचं शिवाजी पार्कवरील भाषण ऐकलं होतं. आदरणीय मोदीजींना त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. आता त्यांनी काल जी घोषणा केली ती त्यांनी स्वतःच्या पक्षाबद्दल भूमिका घेतली आहे. थोडा वेळ थांबून आपण प्रतिक्षा करु आणि काय होतंय ते पाहू, असं नितेश राणे म्हणाले.