रिलायन्स फाऊंडेशनने दिली अधिकृत माहिती
पॅरिस : नुकतंच मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा शाही विवाहसोहळा पार पडला. राधिका मर्चंटसह (Radhika Merchant) तो लग्नबंधनात अडकला. हा लग्नसोहळा देशभरातच नव्हे तर विदेशातही प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. यानंतर आता नीता अंबानी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (International Olympic Committee) त्यांना पुन्हा एकदा सदस्या बनण्याचा बहुमान दिला आहे. रिलायन्स फाऊंडेशनने (Reliance Foundation) समाजमाध्यमावर अधिकृतपणे तशी माहिती दिली आहे.
सध्या जगभरात पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेची चर्चा आहे. या स्पर्धेत भारत कशी कामगिरी करणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) सदस्य म्हणून पुन्हा एकदा निवड झाली आहे. रिलायन्स फाऊंडेशनने आपल्या समाजमाध्यम खात्यावर या निवडीची अधिकृत घोषणा केली आहे. नीता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत.
काय म्हणाल्या नीता अंबानी?
“आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर पुन्हा एकदा निवड झाल्यामुळे मला फार सन्मानित झाल्यासारखं वाटत आहे. राष्ट्रपती थॉमस बाक आणि आयओसीच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. या आनंदाच्या आणि अभिमानाच्या क्षणाला भारतीय नागरिकांसोबत शेअर करायचे आहे. भारत तसेच जगभरात ऑलिम्पिकचा आणखी प्रचार आणि ऑलिम्पिकच्या मजबुतीकरणाच्या प्रयत्नांना कायम ठेवण्यासाठी मी तत्पर आहे,” अशा भावना नीता अंबानी यांनी व्यक्त केल्या आहेत.
याआधी २०१६ साली झाली होती निवड
नीता अंबानी यांची सर्वप्रथम २०१६ साली रिओ येथील ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान आयओसीच्या सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा या समितीच्या सदस्य होण्याचा सन्मान नीता अंबानी यांना मिळाला आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य होण्यासाठी त्यांना सर्व ९३ मतदारांनी पाठिंबा दिला.
क्रीडा क्षेत्रात मोठी गुंतवणूक
नीता अंबानी या आयपीएलमधील सर्वाधिक प्रसिद्ध संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्स या संघाच्या मालकीण आहेत. त्या फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडच्या संस्थापक आणि अध्यक्षा आहेत. या संस्थेकडून इंडियन सुपर लीगचे (ISL) आयोजन केले जाते. मुंबई इंडियन्स या संघासह त्या मुंबई एमआय केप टाउन (२०२२), एमआय अमिरात (२०२२) आणि मुंबई इंडियन्स महिला संघाच्या (२०२३) सह-मालकीण आहेत.