२० महिला आणि ६० पुरुष अशा ८० कैद्यांचा समावेश
कोल्हापूर : काल राज्यभरात पावसाने धुमाकूळ (Heavy Rain) घातला. पुण्यात (Pune) पुराचा धोका निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झालं. तर आता सांगलीमध्येही (Sangli) पुराचा धोका उद्भवला आहे. सांगली, कोल्हापूरमध्ये (Kolhapur) मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. यामुळे सांगलीतील जिल्हा कारागृहातील कैद्यांना कोल्हापुरातील कळंबा जेलमध्ये हलवण्यात आलं आहे. यामध्ये २० महिला कैदी आणि ६० पुरुष कैदी अशा ८० कैद्यांचा समावेश आहे.
सांगली कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. ४५ फूटांच्या आसपास पाणी गेल्यानंतर कारागृहात पाणी जाण्यास सुरूवात होते. कृष्णा नदीची पाणी पातळी लक्षात घेऊन आणखी काही कैद्यांना हलवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय कारागृहातील अन्न धान्य , कागदपत्रे, शास्रात्रे, दारुगोळा सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला आहे.
महादेव होरे म्हणाले की, सांगली जिल्हा कारागृह संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास आवश्क तो अन्नधान्यसाठा आणि इतर वस्तूंचा साठा करून ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर कारागृहातील संगणक कक्ष, कागदपत्रे सर्व गोष्टी पाणी पोहोचणार नाही अशा ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.