Tuesday, April 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूजFrance Train Network attack : ऑलिम्पिकपूर्वी फ्रान्समध्ये मोठा राडा! रेल्वे नेटवर्कवर हल्ला

France Train Network attack : ऑलिम्पिकपूर्वी फ्रान्समध्ये मोठा राडा! रेल्वे नेटवर्कवर हल्ला

पॅरिसला जाणाऱ्या ३ हायस्पीड रेल्वे मार्गांवर जाळपोळ आणि तोडफोड

८ लाख प्रवासी स्टेशनवर अडकल्याची माहिती

पॅरिस : फ्रान्समध्ये आजपासून ऑलिम्पिक स्पर्धेला (Paris Olympics 2024) सुरुवात होत आहे. मात्र स्पर्धेसाठी उद्धाटन समारंभाच्या अवघ्या १० तासांपूर्वीच फ्रान्समधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पॅरिसमधील रेल्वे नेटवर्कवर (France Paris Train Network Attack) शुक्रवारी हल्ला झाला. पॅरिसच्या वेळेनुसार पहाटे ५:१५ वाजता, अनेक रेल्वे मार्गांवर तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या हल्ल्यामुळे जवळपास ८ लाख प्रवासी स्थानकांवर अडकून पडले. फ्रान्सची सरकारी रेल्वे कंपनी SNCF ने सर्व प्रवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे, तसेच त्यांना स्टेशनवर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, रेल्वे रुळांवर हल्ला कोणी केला आणि का केला याची माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर अर्ध्या तासात पॅरिसला जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. अनेक गाड्या ९० मिनिटे उशिराने धावत आहेत. SNCF ने आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना ट्रेन सिस्टम दुरुस्त करण्यासाठी कामावर लावले आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने आपल्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल ॲडव्हायजरी जारी केली आहे. फ्रान्सच्या रेल्वे मार्गांचा वापर न करण्यास सांगितले आहे.

लंडन ते पॅरिसपर्यंत जाणाऱ्या रेल्वे मार्गांना सर्वाधिक फटका

युरोस्टार रेल्वे कंपनीने सांगितले की त्यांनी अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. या हल्ल्यामुळे लंडन ते पॅरिसपर्यंत जाणाऱ्या रेल्वे मार्गांना सर्वाधिक फटका बसला आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या सर्व गाड्या वळवल्या आहेत. फ्रान्सचे वाहतूक मंत्री पॅट्रिस व्हर्जराइट यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे हल्ल्याचा निषेध केला आहे. एसएनसीएफच्या सतत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

एका मार्गावरील हल्ला हाणून पाडण्यात यश

फ्रान्सच्या नॅशनल रेल्वे कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, देशात असलेल्या ४ प्रमुख हाय-स्पीड ट्रेन लाइन्सपैकी ३ लाईन्सवर हल्ला झाला. तर एका मार्गावरील हल्ला हाणून पाडण्यात आला. ज्या लाईन्सवर हल्ला झाला त्यात अटलांटिक, नॉर्दर्न आणि ईस्टर्न लाईन्सचा समावेश होता. पॅरिसपासून १६० किमी अंतरावर असलेल्या फ्रान्सच्या अरास शहरात हा हल्ला झाला. यानंतर, कोर्टलेन शहरातील टूर्स आणि ले मॅन्स लाइनवर दुसरा हल्ला झाला. हे शहर पॅरिसपासून १४४ किमी अंतरावर आहे.

एसएनसीएफ प्रमुख म्हणाले की, रात्री आमचे रेल्वे नेटवर्क आणि वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पॅरिसच्या पश्चिम, उत्तर आणि पूर्वेला चालणाऱ्या TGV लाईन्सवर तीन आगी लागल्या आहेत. दक्षिणेकडे ल्योन आणि भूमध्य समुद्राकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर जाळपोळ करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

फ्रान्समध्ये आज होणार ऑलिम्पिकचं उद्धाटन 

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आजपासून ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहेत. पॅरिस ऑलिम्पिक २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला सुमारे ३ लाख प्रेक्षक आणि १० हजार ५०० खेळाडू उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळा सीन नदीवर खुल्या हवेत होणार आहे. त्याच्या सुरक्षेसाठी ४५ हजार सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेच्या सुरक्षेसाठी पॅरिसमध्ये ३५ हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -