जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
आनंद वाटता वाटता, आनंद लुटण्यासाठी आपण जन्माला सतत येतच असतो, हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. आपण जन्माला का आलो, याचे उत्तर काय? तर आपण आनंद वाटता वाटता, आनंद लुटण्यासाठीच जन्माला आलो. हे कोणीही सांगत नाही. लोक मोक्षाच्या गोष्टी करतात, मात्र ही साधी पण महत्त्वाची गोष्ट सांगत नाहीत. जीव हा आनंदस्वरूप व सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे तो ही स्फुरद्रूप आहे. जोपर्यंत हा आनंद आहे व तो स्फुरद्रूप आहे, तोपर्यंत जीवन हे असणारच. तो Eternal आहे. तो नाही असे कधीच होणार नाही. माणूस जन्माला येतच राहणार. तो आपले शरीर बदलतच राहणार. याचीच तिसरी बाजू सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,
“आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी; बोलले जे ऋषी, साच भावे वर्ताया
झाडू संताचे मार्ग, आदराने भरले जग; उच्छिष्ठाचा भाग, शेष उरला तो सेवू”
आम्ही वैकुंठात राहणारे, आम्ही जन्माला कशासाठी आलो? पृथ्वीवर कशासाठी आलो? लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, लोकांना आनंद देण्यासाठी पृथ्वीतलावर आलो. लोकांना मार्गदर्शन केले आणि योग्य मार्ग सापडला की आनंद होतो. आडरानी शिरलेल्यांना राजमार्गावर आणण्यासाठीच आम्ही जन्माला आलो.
नामदेव महाराजही तेच सांगतात.
“नामा म्हणे केशवा, अहोजी तुम्ही दातारा; जन्मोजन्मी द्यावी, हीच चरणसेवा”
यातून नामदेव महाराजांनी मागितले की, जन्मोजन्मी तुमची सेवा करायला मिळावी. एकच जन्म नव्हे तर अनेक जन्म हवेत. तुकाराम महाराजही एके ठिकाणी म्हणतात, “मज दास करी त्यांचा, संतांच्या दासांचा दास”. म्हणजेच वाटेल तितके जन्म दे चालेल पण आम्हाला संत संगती दे. सतत संत संगत पाहिजे.
“हेचि दान देगा देवा,
तुझा विसर ना व्हावा,
गुण गाईन आवडी हेचि
माझी सर्व जोडी,
ना लगे मुक्ती धन संपदा,
संत संग देई सदा”
आम्हाला जन्म हवा, मुक्ती नको असे म्हटलेले आहे. कारण लोकांना आनंद देण्यासाठी, सुखी करण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेऊन शरीर धारण केलेच पाहिजे. म्हणून तुम्ही जन्म हवा म्हणा किंवा नको म्हणा, तरीही तुम्ही जन्माला येणारच हा जीवनविद्येचा सिद्धान्त आहे.