Wednesday, April 23, 2025

वनमाळी चित्ती धरा

प्रपंचाचा त्याग करून, जपजाप्य करून, तीर्थाटन करून किंवा होमहवन करत ईश्वराचा शोध घेत फिरणाऱ्या संन्याशांपेक्षाही जगाकडे बघण्याची आपली दृष्टी जोवर निकोप होणार नाही, जोवर आपल्या माता-भगिनींना निर्धोक आयुष्य आपण प्रदान करू शकणार नाही, म्हणजेच आपल्यातील कुटिल अश्वत्थाम्याचा जोवर नाश होणार नाही तोपर्यंत आपला धर्म मग तो कोणताही असो तो आपल्याला संपूर्ण समजला नाही असेच म्हणावे लागेल.

ऋतुराज – ऋतुजा केळकर

आज अश्वत्थाम्याची एक कथा अचानक आठवली. महाभारतात दारूण पराभव झाल्यानंतर अश्वत्थाम्याने एका रात्री जंगलात एका वटवाघळाने अनेक निद्रिस्त कावळ्यांना ठार मारलेले पाहिले, त्यावरून प्रेरीत होऊन, कुटिल वृत्तीने, एका रात्री निद्रिस्त असलेल्या पांचालांना त्याने ठार मारण्याचे निंदनीय कृत्य केले.

खरोखरंच धर्म-अधर्म, निती-अनितीच्या पल्याड गेलेल्या धर्माचाराचे सोंग घेणाऱ्या आजच्या धर्मगुरूंना पाहिले की, या अश्वत्थाम्याचीच आठवण येते. आजचा धर्म हा आपण लहानपणी खेळत असलेल्या ‘कानगोष्टी’ या खेळात सारखा झाला आहे. मूलतः पूर्वीच्या काळी कुठल्याही धर्मात अगर पंथात स्त्रीला अतिशय मानाचे स्थान होते. पण आता काही समाजकंटकांनी सर्वच धर्मांतील नितीमूल्ये आपल्या फायद्यासाठी तोडून मोडून आपल्याला हवी तशी लोकांसमोर ठेवली आहेत. कुणी धर्मांध जातीपातीच्या आरक्षणाच्या नावाखाली आपला मथितार्थ साध्य करून घेतात तर कुणी दुधासारखा पौष्टिक आहार गोरगरिबांना फुकट देण्याऐवजी रस्त्यावर ओतून टाकून अन्नदेवतेचा अवमान करतात.

आता स्त्रीच्या अस्तित्वाचा तिच्या अस्मितेचा येथपर्यंत प्रश्न येतो तिथे आजही तळागाळात स्वाती नक्षत्रातील पावसाच्या थेंबांइतकी पायस असलेल्या स्त्रीला भोग्य वस्तू समजले जाते. अगदी साधं सोपं उदाहरण द्यायचे झाले तर कुठलीही जाहिरात घ्या, त्या उत्पादनाशी दुरान्वयानेही संबंध नसतानाही जाहिरातीत स्त्रीचा वापर केला जातो. आज माणसाच्या देहवासनेनुसार संकल्प आणि सिद्धी यात फरकच राहिलेला नाही. या सुखलोलुपतेला चटावलेल्या कुणीही व्यक्तीने संकल्प केलाच तरी त्याची पूर्तता म्हणजे सिद्धी होईलच असे नाही.

अगदी परवा परवाच आपण गुरुपौर्णिमा साजरी केली. त्यात आपला प्रथम गुरू म्हणजे आपली ‘माता’ हिच्या सन्मानार्थ आपण गोडवे गायले. अगदी मीडियावर छान छान फोटो, कविता, कथा ही टाकल्या पण ‘रात गई बात गई’ या उक्तीनुसार सकाळी पुन्हा आपण पूर्व पदावर आलो. या चराचराची ज्या प्रकृतीमुळे उत्पत्ती झाली आहे त्या त्रिगुणात्मक महद्ब्रह्माचे केंद्रबिंदू असलेली ही ‘माया’… या ‘सत्यरूपिणी’च्या चरणाशी नतमस्तक होणे गरजेचे आहे. पण आज शारदीय चांदण्यांच्या सौम्य सुंदर किरणांसारखे आयुष्य त्यांनाच प्राप्त होते ज्यांच्या घरात स्त्रियांना मान दिला जातो, जिथे घरातील स्त्रियांचा आदर केला जातो. तेच घर आणि घरातील लोक सुखी आणि समृद्ध होतात. ज्या स्त्रीच्या निर्मळ तसेच प्रसन्न मंद हास्याने अमृतानंद घरात भरून राहातो त्याच घरात सुख-शांती- समाधान नांदते. स्त्री म्हणजे ‘माया’. स्त्री म्हणजे ‘पावित्र्य’. ही ब्रह्मनिर्मित माया चैतन्यस्वरूप आहे. म्हणूनच सुप्रभाती देखील

“कराग्रे वसते लक्ष्मी
करमध्ये सरस्वती
करमुले तू गोविंदम्
प्रभाते कर दर्शनम्”
या श्लोकाने आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतो. या श्लोकातही हेच सांगितले आहे की, जो लक्ष्मी मातेचा मान राखून आपल्या सद्सदविवेक बुद्धीने म्हणजेच अनुभवांती आलेल्या ज्ञानाने तद्वतच सरस्वतीला शरण जाऊन नितीवान आचरण आचरील त्यांच्या संसाराचा भवसागर तारण्यास स्वतः श्रीमत् विष्णू भगवान सज्ज राहतील आणि जर का आपल्या तळहातांवर साक्षात देवच विराजमान आहेत अशी धारणा ठेवली तर मग आपण वाममार्गाला जाण्याचा प्रश्नच येणार नाही. अखेरीस इतकंच म्हणेन की, प्रपंचाचा त्याग करून, जपजाप्य करून, तीर्थाटन करून किंवा होमहवन करत ईश्वराचा शोध घेत फिरणाऱ्या संन्याशांपेक्षाही जगाकडे बघण्याची आपली दृष्टी जोवर निकोप होणार नाही, जोवर आपल्या माता-भगिनींना निर्धोक आयुष्य आपण प्रदान करू शकणार नाही, म्हणजेच आपल्यातील कुटिल अश्वत्थाम्याचा जोवर नाश होणार नाही तोपर्यंत आपला धर्म मग तो कोणताही असो तो आपल्याला संपूर्ण समजला नाही असेच म्हणावे लागेल. म्हणजेच माझ्याच शब्दांत सांगायचे
झाले तर…

‘वनमाळी चित्ती धरा…
घरची जना…
कान्होपात्रा न उपहासा…
तेव्हाच मार्ग होई…
सुकर मुक्तीचा…
सुकर मुक्तीचा…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -