यवतमाळ, परभणी आणि बारामतीमधील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई : शिवसेना पक्षात (Shivsena) फूट पडून दोन वर्षे उलटून गेली ठाकरे गटाकडून (Thackeray Group) तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांचा ओघ काही कमी झालेला नाही. लोकसभेत मविआला काही प्रमाणात विजय मिळाला असला तरी विधानपरिषदेत पुन्हा एकदा महायुतीने (Mahayuti) आपले अस्तित्व सिद्ध केले. यानंतर आता विधानसभा निवडणुकांचे (Vidhansabha Election) वारे वाहू लागले आहेत. सर्व राजकीय पक्ष यासाठी तयारीत असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यवतमाळ, परभणी आणि बारामतीमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत हा प्रवेशसोहळा पार पडलाय. विशेष बाब म्हणजे, बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांसह संपूर्ण सदस्यांनीच शिंदे गटात जाणं पसंत केलं आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिग्विजय काकडे यांच्यासह २२ सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे दिग्रज विधानसभा संपर्कप्रमुख आणि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी सभापती स्नेहल भाकरे यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे १७ वर्ष संचालक असलेले सुरेश तुकाराम खलाटे, २३ वर्षे संचालक असलेले विलास देवकाते, तानाजी पौंदकुले, शेतकरी आंदोलनात सक्रिय असलेले अजित जगताप, ऍड अजित काशिनाथ जगताप, तात्या कोकरे, बिट्टुबाबा कोकरे यांचाही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला. शिवसेना बारामती लोकसभा संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे यांच्या पुढाकाराने हे पक्षप्रवेश संपन्न झाले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात कोणाचा पक्षप्रवेश?
याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातील नेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबाराव राठोड, नेर तालुक्याचे शिवसेना ठाकरे गटाचे तालुका संघटक अनिल चव्हाण, अल्पसंख्याक आघाडीचे विधानसभा प्रमुख शेख मुश्ताख तसेच नीतीन बोकडे, तेजस काळे, हरिश्चंद्र रुपवणे, विठ्ठल शिनगारे, यादव राठोड, दिनेश भोयर, प्रफुल्ल सोळंके असे स्थानिक पदाधिकारी आणि सरपंच यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
राष्ट्रवादीच्या सरचिटणीसांचाही शिवसेनेत प्रवेश
परभणी जिल्ह्यातील पाथरी नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ऍड. मुंजाजी ढाले पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब फुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा प्रचार प्रमुख ह भ प सारंगधर महाराज, सोनपेठ तालुक्याचे उबाठा गटाचे उप-जिल्हाप्रमुख मधुकर निरपणे यांच्यासह, पाथरी नगर परिषदेतील विश्वनाथ भाले पाटील, किरण भाले पाटील आणि हनिफ कुरेशी हे तीन नगरसेवक आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे सरकार आहे. सत्तेमध्ये आल्यापासून घेतलेला प्रत्येक निर्णय हा सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी घेतला आहे. राज्यातील लोकांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री बहीण योजनेसह अनेक योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. या योजनांचा लाभ आपल्या भागातील जास्तीत जास्त लोकाना कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदेंनी केलं.
महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये केंद्र आणि राज्य मिळून १२ हजार रुपये आम्ही दिले, १ रुपयात पीकविमा देणारे पहिले राज्य आपले आहे, असंही यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं. यावेळी मंत्री संजय राठोड, शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष सईद शेख, हेदेखील उपस्थित होते.