हेटवणे धरणाच्या ६ दरवाज्यातून ५५ घमी / से एवढा पाण्याचा विसर्ग
पेण : पेण तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हेटवणे धरण ९० टक्के भरले आहे. त्यामुळे हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडले आहेत. हेटवणे धरणाच्या ६ दरवाज्यातून ५५ घमी / से एवढा पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. हेटवणे धरणाचे दरवाजे उघडल्याने पेण तालुक्यातील भोगावती नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हेटवणे धरण भरल्याने पेण तालुका व नवी मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. हेटवणे धरणाची एकूण क्षमता १४७,४९ दशलक्ष घनमीटर एवढी आहे.
पेण तालुक्यात व धरण क्षेत्र परिसरात जोरदार पाऊस झाल्याने हेटवणे धरण भरले आहे. त्यामुळे या धरणाचे सहा दरवाजे २ फुटाने उघडले आहेत. दुपारी १ वाजता त्यातून ५५ घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. सध्या पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने यावर प्रकल्प अधिकारी व सहायक अधिकारी लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता केवळ सतर्क राहणे गरजेचे आहे. धरणाचे दरवाजे केवळ सावधानता म्हणून उघडण्यात आले असल्याची माहिती हेटवणे धरणाचे उपविभागीय अभियंता आकाश ठोंबरे यांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर पेणचे प्रांताधिकारी प्रवीण पवार व पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी खाडी व नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.