अकोला : शेगाव येथून अकोल्याकडे येत असलेल्या शिवशाही बसला महामार्ग क्रमांक ६ वरील तुषार हॉटेल जवळ भीषण आग लागली. या आगीत बस जळून खाक झाली. या बसमध्ये ४४ प्रवासी होते, मात्र चालकाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले.
चालक गाडी चालवत असताना अचानक जळाल्याचा वास आल्याने, चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी करून, सर्व प्रवाशांना बाहेर काढले आणि पाहता पाहता बसमधील आगीने रौद्ररूप धारण केले.
चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या टँकर मधील सिलेंडरच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला तर काही नागरिकांनीही मदत केली, मात्र आगीवर नियंत्रण न मिळवता आल्याने शिवशाही बस जळून खाक झाली.
सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र बस जळून खाक झाल्याने नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.