Monday, April 21, 2025
Homeब्रेकिंग न्यूजCM Eknath Shinde : राज्यात पावसाचे थैमान! वेळ पडली तर नागरिकांना एअरलिफ्ट...

CM Eknath Shinde : राज्यात पावसाचे थैमान! वेळ पडली तर नागरिकांना एअरलिफ्ट करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्र्यांनी घेतला पुण्यातील आणि मुंबईतील पावसाच्या स्थितीचा आढावा

आर्मी, नेव्हीच्या तुकड्या देखील सज्ज

पुणे : पुण्यात गेल्या २४ तासांपासून पावसाने हाहाकार (Pune rain) माजवला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या, पूरस्थिती निर्माण झाल्याच्या तर भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेत सर्व बचाव करणाऱ्या अधिकाऱ्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल. पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि लष्कराचे कर्नल संदीप यांच्याशी मी बोललो आहे. स्थानिक यंत्रणा, फायर ब्रिगेड देखील काम करत आहे.

तसेच याआधीच त्यांनी एनडीआरफच्या बोटी वगैरे रवाना केल्या आहेत. आर्मीला देखील अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. लष्कर देखील आता पुण्यात पोहचते आहे. एखाद्या ठिकाणी लोक अडकले असतील आणि त्यांना एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता भासली तर तीही तयारी करणार आहे, बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाईल. असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

खाण्या-पिण्याची व्यवस्था करा, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गाचा जोर आणखी वाढणार आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनला सतर्कतेचा आदेश दिले आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील बोललो आहे. मी स्वत: या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. लोकांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

मुंबईच्या परिस्थितीवर काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुंबईच्या महापालिका आयुक्तांशी झालेल्या चर्चेत मुंबईत २२२ पंप सुरु असल्याचे समजले. अंधेरीचा सबवे पाण्यामुळे बंद आहे. कुर्ला, घाटकोपरजवळ साचलेलं पाणी काढण्याचं काम सुरु आहे. बाकी रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु आहे. सर्व प्रशासन आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी फील्डवर काम करत आहेत, पुढील ३-४ तास आणखी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर बचाव कार्य व्यवस्थित सुरू –मुख्यमंत्री

मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे, मात्र जिल्हा आणि मनपा प्रशासन सज्ज असून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत. ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरु आहे. काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं, असं आवाहन मी करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, एक टीमवर्क म्हणून काम करून पूर परिस्थितीतल्या लोकांना सुरक्षित हलविणे, त्यांना अन्नाची पाकिटे देणे, औषध, पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. वेळप्रसंगी एनडीआरएफ, लष्कर, नौदल यांची मदत घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पुणे, मावळ, मुळशी येथे धरण क्षेत्रात सुद्धा पाऊस जास्त पडला आहे. त्यामुळे पुण्याला फटका बसला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे. मुंबईत कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून मी पुणे, रायगड, मुंबई जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांच्या संपर्कात आहे. पुण्याला संबंधित लष्कर व नौदल अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे. एखाद्या ठिकाणी लोक अडकले असतील तिथे प्रसंगी हेलीकॉप्टरने कसे त्यांना वाचवता येईल ते पाहण्यास सांगितले आहे.

मुंबईत कुर्ला, घाटकोपर येथे साठलेले पाणी काढण्याचे काम सुरु आहे. मुंबईत २५५ पंप सुरु आहेत. मी मुंबई मनपा आयुक्तांना संपूर्ण यंत्रणा या कामी लावण्याचे निर्देश दिले आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईत पाऊस वाढल्याने मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या यंत्रणांना सज्ज ठेवलं आहे. पाऊस आणि पूर परिस्थिती असलेल्या भागात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

माझे आपणास आवाहन आहे की, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मंत्रालय तसेच जिल्हा पातळीवरून प्रशासन परिस्थितीवर संपूर्ण नजर ठेवून आहे आणि फिल्डवर उतरून काम करीत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -